Sunday, 30 May 2021

चल मेरी लूना




                         चल मेरी लूना


ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे.
१ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.

डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.

 
“लुना कडून हरण्याचा विक्रम”

लुना कोणाला माहित नाही? पुणेकर (मुळचे अहमदनगर चे) फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.

१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.

 
वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.

सुरवातीला अनेकांना शंका होती की,

भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?

यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.
टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली. 

फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.

यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं.

अनेकांना गंमत वाटली. ५० सीसी ची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.

 
सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली.
त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला. 

लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही.

 
पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला.
अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सी साठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.

 
लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादर मध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.

पण हे खरोखर घडल. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन क्वींनच्या आधी दादर स्टेशनला पोहचली.
तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिट लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती. मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती.

त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडव येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.



मिलिंद आरोलकर.

Thursday, 27 May 2021

उंबरा




                        उंबरा



उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. 

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.

या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. 

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. 

काही लोक याच "उंब-याला उंबरठा "असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. 

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. 

उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही माझ्या मते उंबरा असते एक मर्यादा. 

उंबरा असते एक सीमारेषा.
उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट.

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.

उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. 

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.

पण 

उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं.

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.,......



मिलिंद आरोलकर

Tuesday, 25 May 2021

उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.



उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.


 तुम्ही असे कोणतेही मंदिर ऐकले आहे की जेथे मस्तक न घेता गणपतीची पूजा केली जाते? होय, आपण हे ऐकलेच आहे! असे एक मंदिर आहे जेथे अनुयायी त्याच्या शीरविरहित गणेशची उपासना करत आहेत. आज मी तुम्हाला गणपतीच्या मुंडकातीय मंदिराबद्दल सांगत आहे, संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत वाचा.   

 

                  मुंडाकट्या मंदिर

 हे केदार खोऱ्यातील , मुंडाकट्या मंदिरात आहे. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे डोक्याशिवाय गणपतीची पूजा केली जाते. उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील चमोली जिल्ह्यातील सोनप्रयागपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर देवभूमी म्हणूनही ओळखले जाते.


 शिवपुराणानुसार, भगवान शिवशंकर आपले वडील आहेत याची जाणीव नसल्यामुळेच गणपतीने आपल्या वडिलांना पार्वतीदेवीच्या खोलीत प्रवेश करण्यापासून रोखले होते.


 आणि ही ती जागा आहे जिथे गणपतीच्या धड्यावर हत्तीचे डोके ठेवले होते. मंदिराचे नाव कसे ठेवले गेले? मुंडाकटिया हे नाव मुंडा (डोके) आणि कातिया (विच्छिन्न) या दोन शब्दाचे संयोजन आहे जेव्हा मंदिराला मुंडकटिया मंदिर असे नाव दिले गेले.

 शिव पुराणानुसार पार्वती देवी स्नानासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी अंगावरील मळ व हळदीच्या मिश्रणातून मानवी रूप तयार केले आणि त्या शरीरात आपल्या तपोसामर्थ्याव्दारे प्राण उत्पन्न केले ., तेव्हा पार्वती देवीने त्यांना आपला मुलगा म्हणून स्वीकारले आणि आपल्या खोलीत कोणाकडेही न येण्याचे आदेश दिले.
 
 मग गणपतीने द्वार पहारा करायला सुरवात केली आणि त्यानंतर भगवान शिव शंकर तेथे पोहोचले आणि गणेशाला खोलीच्या आत जाण्यासाठी निघण्यास सांगितले. पण जेव्हा त्यांनी जाण्यास नकार दिला, तेव्हा भगवान शिव रागावले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले. नंतर भगवान पार्वती जींनी गणेश जीवनाच्या आग्रहाखातर भगवान शिवने हत्तीचे डोके भगवान गणेशाच्या धड वर ठेवले आणि नंतर भगवान शिवने स्वतः त्यांना जीवन दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला.


 केदारनाथला जुन्या मार्गावर केदारनाथला जाणारे भक्त इथेच प्रार्थना करण्यासाठी पूर्वी थांबत असत. परंतु आता नवीन मार्ग परिचित असल्याने यामार्गाने जाणारे भक्त फार कमी झालेत., केदार खोऱ्याच्या जंगलाच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिराच्या खालून मंदाकिनी नदी वाहते, हे अतिशय सुंदर विहंगम असे दृश्य पहावयास मिळते .




मिलिंद आरोलकर

Monday, 17 May 2021

श्री देव वेतोबा , आरवली , वेंगुर्ला -जिल्हा सिंधुदुर्ग.




   ।। ॐ नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः ।।

💐 वैशाख शुक्ल पंचमी दिवस श्री देव वेतोबा ह्यांचा जन्मदिवस म्हणून आदराने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो 💐

श्री देव वेतोबा आरवली :-
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. तसेच जपानमध्ये सुद्धा ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. गुजरातमध्ये आईला ‘बा’ म्हणण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे वेताळ या शब्दातील ‘ळ’ हा शब्द जाऊन आदरार्थी ‘बा’ हा शब्द आला व त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान ‘श्री वेतोबा’ या नावाने रूढ झाले.
वेताळ या शब्दातील महात्म्यसुद्धा अर्थपूर्ण आहे. या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘ताळ’, दुसरे अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘वेळ’, तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो ‘वेता’, ‘वेता’ म्हणजे वेत व अर्थातच वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ. या वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. यामुळेच आरवलीतील या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

दीड ते दोन फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात. काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. ज्या-ज्या वेळी संकटांचे तांडव सुरू होते. तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावे. म्हणजे संकटे आपला मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या पायात चपला सरकवतात. आरवली वेतोबाकडे गेल्यावर लाखो चपलांच्या जोडांचा ढीग दिसतो. केळयाचे घड लक्ष वेधून घेतात. कोकणातल्या श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे हे एक भक्कम श्रद्धास्थान आहे.

विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात ‘हरवल्ली’ नावाने अस्तित्वात असलेले गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. ‘हर’ म्हणजे ‘शिव’ व ‘वल्ली’ या शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. पूर्वी या क्षेत्राच्या आसपास सोमेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर इ. शंकराच्या मंदिरांची मालिका असावी, असे जाणकार सांगतात. हे वेंगुर्ले तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून शिरोडा-टांक हम रस्त्यावर वसले आहे.
रस्त्यावरून मुख्य द्वारातून डोकावले असता देव वेतोबाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. पूर्वी देव वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. दर १०० वर्षाने मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापणा केली जायची. यानंतर अलीकडेच १९९६ मध्ये भक्तांच्या सहाय्याने वेतोबाची पंचधातूपासून बनविलेली मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. हातामध्ये तलवार घेऊ न उभा असलेल्या या देव वेतोबाचे वार्षिक उत्सव मोठया दिमाखात व धार्मिक वातावरणात साजरे होतात.

पूर्वी वेतोबाला फणसाचे झाड वापरले जायचे. यामुळे जेथे फणस असायचा ते स्थान वेतोबाचे असे समजले जायचे. आरवलीतील अनेक ग्रामस्थ वेतोबाकडे तातडीने जाता येत नसेल आणि त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली तर कुठच्याही फणसाच्या झाडाखाली उभे राहतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात. फणसाच्या झाडासमोर बोललेली कोणतीही इच्छा वेतोबा समोर पोहोचते अशी त्यांची श्रद्धा आहे.

पंचक्रोशीत फणसाच्या झाडावर कुणीही शस्त्र चालवत नाही. या परिसरात फणसाचे अभयारण्यच म्हणायला हवे. कारण जेथे फणस असतो तेथे वेतोबाचा अंश समजून त्याची जपणूक केली जाते. निसर्गत: झाड तुटले तर बाजूला केले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झाड तोडणे गरजेचेच असेल तर वेतोबाला साकडे घातले जाते. त्याच्याकडून कौलप्रसाद घेतला जातो. नंतरच सन्मानाने झाड तोडले जाते. तरीही फणसाच्या झाडाचे कोणतेही फर्निचर वापरताना आरवली पंचक्रोशीतील बांधव दक्षता घेतात.

बैठकीचे पाट अथवा घराचा दरवाजा फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये, असा अलिखित नियम पाळला जातो. या भागातील बांधव जगाच्या कुठच्याही कानाकोप -यात असले तरी फणसाच्या झाडाची पूजाअर्चा करतात. अशा झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे घालतात. काही मंडळींनी अनवधानाने फणसाच्या झाडाचा गैरवापर केला. मात्र त्यांना त्रास झाल्याने पुन्हा अशी चूक करण्याचे धाडस करत नाही.

वेतोबाला भक्तगण पादत्राणांचा नवस बोलतात, तसा केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. त्याची जत्रा तर ‘केळीच्या घडांची’ जत्रा अशी संबोधली जाते. कुठच्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असे कधी होत नाही. त्याशिवाय साखर, पेढे, लाडू वगैरे गोड जिन्नस, धोतरजोडी, उपरणी, पुतळी आदी नवसही बोलला जातो. मार्गशीर्ष महिन्यात होणा -या या देवाचा वार्षिक जत्रोत्सवास भक्तांची गर्दी असते.

देवाचे मंदिर शके १५८२ (इ.स. १६६०)मध्ये बांधल्याचा दाखला सापडतो. या देवळाचा सर्व मंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० या दरम्यान बांधला गेला असावा असा जाणकार मंडळींचा अंदाज आहे. श्रीदेव वेतोबाच्या मूर्तीस सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद (कौल) लावण्याची वहिवाट आहे. पीडित भक्तगण आपल्या समस्या सोडविण्यासाठी व नवीन कार्यारंभ करण्याच्या वेळी देवाचा कौल लावण्यासाठी मोठया संख्येने वेतोबाच्या दरबारात पोहोचतात.

वेतोबाच्या भल्या मोठया पादुकांचे सर्वच भक्तांना आश्चर्य वाटते. सुमारे २०० वर्षापूर्वीपासूनची पादत्राणे पाहायला मिळतात. काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली ही पादत्राणे पाहताना भक्तगण हरखून जातो.

वेतोबाच्या सिंहासनासमोरील डाव्या हाताच्या खिडकीकडे या पादत्राणांचा खच पडलेला असतो. यातली हवी ती पादत्राणे तो उचलतो आणि आपल्या चतु:सीमेतील भक्ताचे रक्षण करण्यासाठी अदृष्य रूपाने फिरत असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. याची प्रचिती देवाला वाहिलेली नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसते. ही पादत्राणे याच गावातील चव्हाण परिवार पिढयान् पिढया करत आहे. वेतोबाच्या पादत्राणांसाठी सुचिर्भूत होऊन पवित्र मनाने बैठक मांडली जाते. दीड ते दोन दिवसात पादत्राणे तयार होतात. ही पादत्राणे विशिष्ट जागेवर ठेवली जातात.

या जागेवरून वेतोबा आपल्याला हवा तो जोड उचलतो. वेतोबाच्या प्रांगणात पादुकांचा खच पडलेला असतो. मग जुनी पादत्राणे आरवलीच्या डोंगर भागात विशिष्ट ठिकाणी जाऊन मंत्रोच्चाराने जमिनीत पुरली जातात. अलीकडे वेतोबाच्या चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत.
मंदिर परिसरातून फूल आणि अंगा -याशिवाय भक्तांना कोणतीही वस्तू दिली जात नाही. काही भक्त मंडळींनी वेतोबाच्या स्मृती जपण्यासाठी पादत्राणे पूजेसाठी मिळावी असे साकडे घातले होते. मात्र वेतोबाने त्यासाठी परवानगी दिली नाही. या वेतोबाच्या दरबारात पोहोचल्यानंतरच त्याची खरी अनुभूती घ्यावी आणि अविश्वसनीय अशा मोठया आकाराच्या चामडयाच्या चप्पलांचा ढीग पाहावा. चपलांचे झीजलेले तळ पाहावे आणि देवासमोर नतमस्तक व्हावे.

सिंधुदुर्गातील वेतोबाचे स्थान हे असे विलक्षण आहे. जिल्ह्यात वेतोबाचा भक्त सांप्रदायही मोठा आहे. आरवलीच्या वेतोबाप्रमाणे, परुळेचेही वेतोबाचे स्थान प्रसिद्ध आहे.



मिलिंद आरोलकर.

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य माहिती आहे का?

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य माहिती आहे का?

⚫🔵🔴⚪

अशा खूप कमी व्यक्ती असतील की, त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या ४ ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.

वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व
प्रत्येक वर्तमानपत्रात खाली ४ ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही.        

पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच की, मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिपक्यामध्ये रंगाचा क्रम सर्वात अगोदर निळा, गुलाबी, पिवळा आणि शेवटी काळा रंग येतो.

वर्तमानपत्रातील हे चार ठिपके रेजिस्ट्रेशन मार्क्स असतात, जे की वर्तमानपत्रांची छपाई व्यवस्थित झालीये का नाही हे तपासण्यासाठी उपयोगी पडतात. हे ठिपके एका लाईनमध्ये असतात त्यामुळे वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्या आणि इमेज वेगवेगळया रंगात अचूकपणे छापल्या का नाही हे सुद्धा कळते. या रंगामध्ये थोडीही गडबड झाली तर समजून जायचं की वर्तमानपत्राच्या छपाई मध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. या ठिपक्याचे एक स्थान अगोदरच ठरलेले असते. त्या स्थानावर जर हे ठिपके छापले नाही गेले तर छपाई मध्ये चूक झालेली समजते.

+ प्लसचे चिन्ह सुद्धा कधी कधी वापरले जाते
या ठिपक्यासोबत तुम्हाला बरेच वेळा प्लस(+) चे चिन्ह सुध्दा बघितले असेल. या चिन्हालाही या ठिपक्यासारखे महत्व आहे. या चिन्हामुळे वर्तमानपत्रातील माहिती व्यवस्थित ठरलेल्या रेषेत छापली गेली आहे का नाही कळते. या चिन्हामुळे वर्तमानपत्राचे कॉर्नर सुद्धा कळतात.


मिलिंद आरोलकर.

Friday, 14 May 2021

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु 
         
भारत हा चमत्कारांनी भरलेला देश आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही
 ना काही चमत्कारिक वस्तू दिसतेच.संस्कृतीने भरलेल्या ह्या देशात खुप अशा घटना ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणांत असून त्या कुठे तरी पुराव्यााच्या स्वरूपात आढळतांना दिसतात .आज आपण अशाच एका जागेची माहीती घेणार आहोत जी जागा झारखंड राज्यात असून तिथे आजही भगवान परशुरामांचा परशु दृष्टीस पडतो.हा तोच परशु आहे ज्याने परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मीय प्रवृत्तीचा पराभव करून धर्माचे रक्षण केले.
     टांगीनाथ धाम झारखंड राज्यात गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. इथे आज ही भार्गवरामांचा परशु जमिनित गाडलेला आहे. 
परशुला झारखंडच्या भाषेत टांगी म्हटल जात. ह्यावरूनच ह्या जागेत नाव टांगीनाथ अस पडल.त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा दिसतात.

श्री परशुराम आणि टांगीनाथ ह्यांची अख्यायिका:- 
        सितास्वयंवरा वेळी मर्यादा पुरूषोत्तमाच्या हातून जेव्हा महादेवाचं धनुष्य भंग पावत आणि हे जेव्हा परशुरामांना कळत तेव्हा ते क्रोधावस्थेत तिथे येतात आणि रामावर त्या क्रोधाचा वर्षाव करतात परंतु ह्या क्रोधाला राम शांतपणे सामोरे जात असतामना लक्षमणाला मात्र ते सहन होत नाही व तिथे लक्ष्मण आणि श्रीपरशुराम ह्यांच्यात शाब्दिक द्वंद होत त्यावेळी श्री परशुरामांना ज्ञात होत की श्रीराम हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात सृष्टी पालनकरता ज्यांचा अवतार आपण स्वतः ही आहोत अशा विष्णुंचाच अवतार आहे तेव्हा स्वतःच्या अशा वागण्याच्या त्यांना पश्चाताप होतो व त्याच प्रायश्चित करण्यासाठी ते तपश्चर्येला एका घनदाट वनात जातात .इथे येऊन ते महादेवाची स्थापना करतात..व तिथे तपश्चर्येस बसतात बसतेवेळी त्यांच्याजवळील परशु ते जमिनीत गाडतात..ह्याच जागेला आज टांगिनाथ म्हणून ओळखले जाते..

   
      जागेसंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी :-

   १)इथे असलेल्या परशुबद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब आहे ती म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थतेत अजून ही सुस्थितीत आहे.
२) दुसर आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असा अनुमान आहे..
३) सांगितल जात कीएक वेळा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याचा हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला ह्याने भयभीत झालेली त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही.
           सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी तांब्याचा डबा ज्यात काळीतीळ आणि तांदूळ होते .ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत...
     टांगीनाथ येथे आढळलेल्या असंख्य अवशेष व वस्तूंवरून एक बाब ध्यानात येत ती म्हणजे हे स्थळ कधीकाळी हिंदूच एक प्रमुख तिर्थ स्थळ असाव . सरकारची उदासिनता आणि परिसरात असेलेल्या नक्षलवादाच्या प्रभावामुळे ह्या क्षेत्राकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ह्या परशुरामांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पवित्र झालेल्या ह्या तिर्थक्षेत्राची माहीती लोकापर्यंतलपोहचण शक्य झालेले दिसत नाही..कदाचीत सरकारने ह्याकामी लक्ष घातले तर ह्या संबंधित अधिक माहिती वैदिक महत्व लोकांना कळू शकते.
        
    जय परशुराम..!


मिलिंद आरोलकर - 

Wednesday, 12 May 2021

पिक्चर मुंबईच्या रस्त्यावरचा....!

पिक्चर  मुंबईच्या रस्त्यावरचा....!



 काही दिवसांपूर्वी पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील जुने छायाचित्र मिळाले , आणि मन जवळ जवळ ४०-४५ वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख 
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी मुंबईत रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा.गणपतीमधे १० दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे.प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे.त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 
आम्ही कुठे कुठे जायचो कसेही कुठेही बसायचे रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो.त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही.घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची.गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लहान मोठ्या मुली व बायका बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण लहान मोठी तरुण मुल पुरुष ,तर नेहमी विरुद्ध बाजूला त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची.हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर खडीवर बसून बघावे लागायचे ती खडी टोचायची.जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे.सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे त्यांना टेबल फॅन असायचा.त्यांचा खूप हेवा वाटायचा.

 त्यावेळी.सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब.मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे इंग्रजी मध्ये स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो.एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर.इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड.पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.

केश्तो असितसेन , मेहमूद , असरानी , जगदीप राजेंद्रनाथ , यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची.गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे.शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची.सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे.शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम,तिसरी मंझिल.वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.

  मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर , राजा गोसावी ,निळू फुले., सूर्यकांत रमेश देव , अशोक सराफ , दादा कोंडके , रवींद्र महाजनी ,सीमा , चित्रा , रेखा , जयश्री गडकर , रंजना ,उमा यांचे पिक्चर असायचे.सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या.त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
 १९८२ साली भारतात एशियाड खेळाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदा रंगीत टि.व्ही चा जमाना सुरु झाला . त्यावेळी सघन घरातल्यांकडे 'कलर टी.व्ही असायचा सोबत व्ही.सी.आर प्लेअर वा व्ही.सी.पी प्लेअरवर रंगीत सिनेमे कँसेट आणून पाहिले जात . पण सामान्यासाठी रस्त्यावरच्या पिच्करची क्रेज काही कमी झाली नाही . हे सगळ १९९० सालापर्यत सुरु होते पुढे केबल टी.व्हीचा जमाना आला व सगळच इतिहासजमा झाल. .
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात.कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
 
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही.आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉपकॉर्नला येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.


मिलिंद आरोलकर -

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...