Wednesday, 12 May 2021

पिक्चर मुंबईच्या रस्त्यावरचा....!

पिक्चर  मुंबईच्या रस्त्यावरचा....!



 काही दिवसांपूर्वी पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील जुने छायाचित्र मिळाले , आणि मन जवळ जवळ ४०-४५ वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख 
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी मुंबईत रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा.गणपतीमधे १० दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे.प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे.त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 
आम्ही कुठे कुठे जायचो कसेही कुठेही बसायचे रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो.त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही.घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची.गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लहान मोठ्या मुली व बायका बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण लहान मोठी तरुण मुल पुरुष ,तर नेहमी विरुद्ध बाजूला त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची.हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर खडीवर बसून बघावे लागायचे ती खडी टोचायची.जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे.सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे त्यांना टेबल फॅन असायचा.त्यांचा खूप हेवा वाटायचा.

 त्यावेळी.सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब.मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे इंग्रजी मध्ये स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो.एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर.इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड.पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.

केश्तो असितसेन , मेहमूद , असरानी , जगदीप राजेंद्रनाथ , यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची.गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे.शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची.सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे.शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम,तिसरी मंझिल.वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.

  मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर , राजा गोसावी ,निळू फुले., सूर्यकांत रमेश देव , अशोक सराफ , दादा कोंडके , रवींद्र महाजनी ,सीमा , चित्रा , रेखा , जयश्री गडकर , रंजना ,उमा यांचे पिक्चर असायचे.सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या.त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
 १९८२ साली भारतात एशियाड खेळाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदा रंगीत टि.व्ही चा जमाना सुरु झाला . त्यावेळी सघन घरातल्यांकडे 'कलर टी.व्ही असायचा सोबत व्ही.सी.आर प्लेअर वा व्ही.सी.पी प्लेअरवर रंगीत सिनेमे कँसेट आणून पाहिले जात . पण सामान्यासाठी रस्त्यावरच्या पिच्करची क्रेज काही कमी झाली नाही . हे सगळ १९९० सालापर्यत सुरु होते पुढे केबल टी.व्हीचा जमाना आला व सगळच इतिहासजमा झाल. .
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात.कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
 
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही.आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉपकॉर्नला येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.


मिलिंद आरोलकर -

2 comments:

  1. खरचं लहानपणी आम्हीही पहायचो
    बालपणात डोकावल्यासारख वाटल

    ReplyDelete

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...