Monday, 17 May 2021

श्री देव वेतोबा , आरवली , वेंगुर्ला -जिल्हा सिंधुदुर्ग.




   ।। ॐ नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः ।।

💐 वैशाख शुक्ल पंचमी दिवस श्री देव वेतोबा ह्यांचा जन्मदिवस म्हणून आदराने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो 💐

श्री देव वेतोबा आरवली :-
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. तसेच जपानमध्ये सुद्धा ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. गुजरातमध्ये आईला ‘बा’ म्हणण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे वेताळ या शब्दातील ‘ळ’ हा शब्द जाऊन आदरार्थी ‘बा’ हा शब्द आला व त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान ‘श्री वेतोबा’ या नावाने रूढ झाले.
वेताळ या शब्दातील महात्म्यसुद्धा अर्थपूर्ण आहे. या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘ताळ’, दुसरे अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘वेळ’, तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो ‘वेता’, ‘वेता’ म्हणजे वेत व अर्थातच वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ. या वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. यामुळेच आरवलीतील या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

दीड ते दोन फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात. काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. ज्या-ज्या वेळी संकटांचे तांडव सुरू होते. तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावे. म्हणजे संकटे आपला मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या पायात चपला सरकवतात. आरवली वेतोबाकडे गेल्यावर लाखो चपलांच्या जोडांचा ढीग दिसतो. केळयाचे घड लक्ष वेधून घेतात. कोकणातल्या श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे हे एक भक्कम श्रद्धास्थान आहे.

विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात ‘हरवल्ली’ नावाने अस्तित्वात असलेले गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. ‘हर’ म्हणजे ‘शिव’ व ‘वल्ली’ या शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. पूर्वी या क्षेत्राच्या आसपास सोमेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर इ. शंकराच्या मंदिरांची मालिका असावी, असे जाणकार सांगतात. हे वेंगुर्ले तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून शिरोडा-टांक हम रस्त्यावर वसले आहे.
रस्त्यावरून मुख्य द्वारातून डोकावले असता देव वेतोबाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. पूर्वी देव वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. दर १०० वर्षाने मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापणा केली जायची. यानंतर अलीकडेच १९९६ मध्ये भक्तांच्या सहाय्याने वेतोबाची पंचधातूपासून बनविलेली मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. हातामध्ये तलवार घेऊ न उभा असलेल्या या देव वेतोबाचे वार्षिक उत्सव मोठया दिमाखात व धार्मिक वातावरणात साजरे होतात.

पूर्वी वेतोबाला फणसाचे झाड वापरले जायचे. यामुळे जेथे फणस असायचा ते स्थान वेतोबाचे असे समजले जायचे. आरवलीतील अनेक ग्रामस्थ वेतोबाकडे तातडीने जाता येत नसेल आणि त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली तर कुठच्याही फणसाच्या झाडाखाली उभे राहतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात. फणसाच्या झाडासमोर बोललेली कोणतीही इच्छा वेतोबा समोर पोहोचते अशी त्यांची श्रद्धा आहे.

पंचक्रोशीत फणसाच्या झाडावर कुणीही शस्त्र चालवत नाही. या परिसरात फणसाचे अभयारण्यच म्हणायला हवे. कारण जेथे फणस असतो तेथे वेतोबाचा अंश समजून त्याची जपणूक केली जाते. निसर्गत: झाड तुटले तर बाजूला केले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झाड तोडणे गरजेचेच असेल तर वेतोबाला साकडे घातले जाते. त्याच्याकडून कौलप्रसाद घेतला जातो. नंतरच सन्मानाने झाड तोडले जाते. तरीही फणसाच्या झाडाचे कोणतेही फर्निचर वापरताना आरवली पंचक्रोशीतील बांधव दक्षता घेतात.

बैठकीचे पाट अथवा घराचा दरवाजा फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये, असा अलिखित नियम पाळला जातो. या भागातील बांधव जगाच्या कुठच्याही कानाकोप -यात असले तरी फणसाच्या झाडाची पूजाअर्चा करतात. अशा झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे घालतात. काही मंडळींनी अनवधानाने फणसाच्या झाडाचा गैरवापर केला. मात्र त्यांना त्रास झाल्याने पुन्हा अशी चूक करण्याचे धाडस करत नाही.

वेतोबाला भक्तगण पादत्राणांचा नवस बोलतात, तसा केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. त्याची जत्रा तर ‘केळीच्या घडांची’ जत्रा अशी संबोधली जाते. कुठच्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असे कधी होत नाही. त्याशिवाय साखर, पेढे, लाडू वगैरे गोड जिन्नस, धोतरजोडी, उपरणी, पुतळी आदी नवसही बोलला जातो. मार्गशीर्ष महिन्यात होणा -या या देवाचा वार्षिक जत्रोत्सवास भक्तांची गर्दी असते.

देवाचे मंदिर शके १५८२ (इ.स. १६६०)मध्ये बांधल्याचा दाखला सापडतो. या देवळाचा सर्व मंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० या दरम्यान बांधला गेला असावा असा जाणकार मंडळींचा अंदाज आहे. श्रीदेव वेतोबाच्या मूर्तीस सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद (कौल) लावण्याची वहिवाट आहे. पीडित भक्तगण आपल्या समस्या सोडविण्यासाठी व नवीन कार्यारंभ करण्याच्या वेळी देवाचा कौल लावण्यासाठी मोठया संख्येने वेतोबाच्या दरबारात पोहोचतात.

वेतोबाच्या भल्या मोठया पादुकांचे सर्वच भक्तांना आश्चर्य वाटते. सुमारे २०० वर्षापूर्वीपासूनची पादत्राणे पाहायला मिळतात. काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली ही पादत्राणे पाहताना भक्तगण हरखून जातो.

वेतोबाच्या सिंहासनासमोरील डाव्या हाताच्या खिडकीकडे या पादत्राणांचा खच पडलेला असतो. यातली हवी ती पादत्राणे तो उचलतो आणि आपल्या चतु:सीमेतील भक्ताचे रक्षण करण्यासाठी अदृष्य रूपाने फिरत असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. याची प्रचिती देवाला वाहिलेली नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसते. ही पादत्राणे याच गावातील चव्हाण परिवार पिढयान् पिढया करत आहे. वेतोबाच्या पादत्राणांसाठी सुचिर्भूत होऊन पवित्र मनाने बैठक मांडली जाते. दीड ते दोन दिवसात पादत्राणे तयार होतात. ही पादत्राणे विशिष्ट जागेवर ठेवली जातात.

या जागेवरून वेतोबा आपल्याला हवा तो जोड उचलतो. वेतोबाच्या प्रांगणात पादुकांचा खच पडलेला असतो. मग जुनी पादत्राणे आरवलीच्या डोंगर भागात विशिष्ट ठिकाणी जाऊन मंत्रोच्चाराने जमिनीत पुरली जातात. अलीकडे वेतोबाच्या चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत.
मंदिर परिसरातून फूल आणि अंगा -याशिवाय भक्तांना कोणतीही वस्तू दिली जात नाही. काही भक्त मंडळींनी वेतोबाच्या स्मृती जपण्यासाठी पादत्राणे पूजेसाठी मिळावी असे साकडे घातले होते. मात्र वेतोबाने त्यासाठी परवानगी दिली नाही. या वेतोबाच्या दरबारात पोहोचल्यानंतरच त्याची खरी अनुभूती घ्यावी आणि अविश्वसनीय अशा मोठया आकाराच्या चामडयाच्या चप्पलांचा ढीग पाहावा. चपलांचे झीजलेले तळ पाहावे आणि देवासमोर नतमस्तक व्हावे.

सिंधुदुर्गातील वेतोबाचे स्थान हे असे विलक्षण आहे. जिल्ह्यात वेतोबाचा भक्त सांप्रदायही मोठा आहे. आरवलीच्या वेतोबाप्रमाणे, परुळेचेही वेतोबाचे स्थान प्रसिद्ध आहे.



मिलिंद आरोलकर.

No comments:

Post a Comment

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...