Monday 28 June 2021

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.




                 Photo share by facebook

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

१) आळंदी - पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद.पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 

२) पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)

३) दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड* या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे  यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. 

४) सासवड - वड म्हणजे *सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र* या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे *सासवडचा* मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन *सोपानदेवांच्या* समाधीचे दर्शन घ्यावे.

५) जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र ,
जोरी = जास्त त्रास न घेणे.
म्हणजेच *जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.* 

६) वाल्ह्या - भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न* झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)

७) लोणंद - त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 

८) तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल* या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला* येते. 

९) फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर

१०) बरड - संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते. 

११) नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त *श्रीविठ्ठलाचा* होतो.

१२) माळशिरस - माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने *मानसिक* तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या  श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 

१३) वेळापूर -त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते. 

१४) वाखरी - वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.

१५) नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो.

       🙏 "पांडुरंग... पांडुरंग "🙏



मिलिंद आरोलकर.

Monday 14 June 2021

आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


झिरमिर पावसात नव्या रेनकोट मध्ये आपलं जुनंच दप्तर कोंबून , चिखल तुडवत आज च्या दिवशी नव्या गणवेशात शाळेत जायचो आपण आठवतंय का ?
नवा वर्ग , नवी रांग , नवा बेंच आणि नवे मित्र आठवतंय का ?
" एक साथ नमस्ते आम्ही आपले स्वागत करतो " ह्या वाक्याने नव्या शिक्षकांचं स्वागत करायचो आपण आठवतंय का ?
नवा हजेरी पट आणि त्यावर आपलं नाव चुकून जर का आलं नाही तर वाटणारी भीती आठवते का ?
नव्या वह्या पुस्तकांचा वास आज ही नाकात तसाच आहे ,
सगळ्या वाह्यांच ब्राऊन कव्हर आणि त्यावर मारलेल्या स्तेपलर च्या पिना आठवतायत का ?
मधल्या सुट्टी त मुतारी बाहेरची रांग , हाथ धुवायची लगबग आणि नव्या डब्यातल्या जाम चपाती ची चव आठवते का ? 
वर्ग विसरून चुकून दुसऱ्याच वर्गात जाऊन बसल्यावर होणारी फजिती आठवते का ?
आपल्या वर्गाला जेव्हा मैदानावर जायला मिळायचं तेव्हा बाकीच्या वर्गातल्या पोरांना दाखवलेल्या जिभा , खेळताना फुटलेलं ढोपर आणि त्यावर डेटॉल चा कापूस लावल्यावर होणारी आग आठवते का ?
शाळा सुटताना होणारं वंदे मातरम् आणि " जय हे , जय हे " यायच्या आधीच दप्तरात अडकवलेले हाथ , उद्या लवकर ये रे अशी मित्राला घातलेली साद , मुख्याध्यापिकांनी वटारलेले डोळे आणि छडीचा मार आठवतोय का ?
.
.
काहीसा असा असायचा आपला शाळेचा पहिला दिवस आठवतंय का ?
१३ जुन ही तारीख आठवतेय का ????
जर का आठवले असतील ते दिवस तर आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण करा जरा ❣️
.
.
# शाळा #


मिलिंद आरोलकर. 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो. 

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो.... मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही...

 जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

 नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा - गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे 'नवरत्ना' तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही .

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी  "ऋणानुबंध "असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया.... 
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे... 

ते आले की उतरावेच लागते... 
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!! 

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी जिवलग मित्र लाभले ते भाग्यवान....


मिलिंद आरोलकर -

Wednesday 2 June 2021

भाड्याची सायकल

                
                🚲  भाड्याची सायकल 🚲

आज जागतिक सायकल दिन . सायकल चालवा आरोग्य सुधारा व पर्यावरणाचा समतोल साधा असा सल्ला दिला जातो. पण सुमारे चाळीस वर्षापूर्वी सायकल खरेदी करणे ही सर्वसामान्याच्यां ही आवाक्यातली बाब नव्हती त्या काळातील रंजक आठवणी ....
१९८०-९० चा काळ होता तो...
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...
बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. 
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...

 भाड्याचे नियम कडक असायचे. 
● जसे पंच्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... 
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. 
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.  
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं 
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
 आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. 
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , 
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो... 

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 
पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही....  

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर 
आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही...

गेले ते दिवस...
राहिल्या त्या आठवणी...... 
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .


मिलिंद आरोलकर.

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...