Wednesday 28 April 2021

गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर




गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर

महाराष्ट्रातील शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेले कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदि‍र आणि आश्रम परिसर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदि‍र आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही. 

बेट कोपरगांव ) हे ब्रम्हदेव पुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र  
व दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्‍थान असून त्‍यांनी तप व वास्‍तव्‍य केलेला हा परिसर आहे. त्‍यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्‍त्‍व प्राप्‍त झाले असून त्‍याची आख्यायिका अशी आहे. 
समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्‍यामुळे देवांना अमरत्‍व प्राप्‍त झाले. त्‍यामुळे दैत्‍य कुळांचा नाश हा निश्‍चित झाला. तो होऊ नये व दैत्‍य कुळ पुढेही चालू रहावे त्‍यासाठी दैत्‍यांनाही अमरत्‍व प्राप्‍तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्‍याने दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्‍चर्या करुन गायत्री व महामृत्‍यूंजया पासून तयार झालेला " संजीवनी " मंत्र की , ज्‍या योगे मृत झालेली व्‍यक्‍ती पुन्‍हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्‍त करुन घेतला व त्‍या मंत्राच्‍या आधारे ते मृत झालेल्‍या दैत्‍यांना पुन्‍हा जिवंत करुन देवांविरुध्‍द युध्‍दासाठी संजीवन करत असत. त्‍यामुळे दैत्‍यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्‍तच झाले. त्‍यासाठी देवांनी बृहस्‍पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्‍पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्‍य पुन्‍हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्‍हणून सर्व देव व बृहस्‍पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्‍तगत करण्‍यासाठी बृहस्‍पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्‍यास गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्‍तीसाठी आला ते हे स्‍थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्‍थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्‍या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्‍थान गोदावरीच्‍या पैलतीरावर होते. ते स्‍थान कचेश्‍वर मंदीर म्‍हणून प्रसिध्‍द असून ते शुक्‍लेश्‍वर मंदीराच्‍या उत्‍तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्‍वर यांचे एकत्रित पिंडीच्‍या स्‍वरुपात स्‍थापित आहे. गोदावरीच्‍या ऐलतीरावर गुरुचे स्‍थान व पैलतीरावर शिष्‍याचे स्‍थान आहे. पूर्वीच्‍या नदीवरील घाट व त्‍याच्‍या खुणा अजूनही मंदीराच्‍या समोरील श्री विष्‍णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्‍याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडून कच व देवयानी यांना हा " संजीवनी " मंत्र मिळविल्‍याचे संजीवनी पाराचे स्‍थान असून त्‍यात मंत्र मिळाल्‍यानंतर स्‍वर्गातील देवगण कचेश्‍वरावर पुष्‍पवृष्‍टी करण्‍यासाठी आले. त्‍यामुळे इतर देवांच्‍याही पिंडीच्‍या स्‍वरुपात प्रतिकात्‍मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्‍थान अत्‍यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्‍तांची धारणा आहे. 

गुरुची सेवा करण्‍यासाठी सर्व शिष्‍य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्‍हणजे हल्‍लीच्‍या शुक्‍लेश्‍वर मंदीराचे स्‍थानावर नित्‍यनियमाने येत असत. या शिष्‍यांना नदीच्‍या विशाल पात्रातून येण्‍या -जाण्‍याचा त्रास होऊ नये म्‍हणून शुक्राचार्यांनी आपल्‍या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्‍या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्‍यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्‍याची आख्‍यायिका आहे. 

सर्व शिष्‍यांमध्‍ये कच हा अत्‍यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्‍यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्‍यांमध्‍ये गुरुचा लाडका शिष्‍य होता. ही गोष्‍ट इतर दानवांना सहन होत नसे. त्‍यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्‍टी होती. द्वेषापोटी त्‍यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्‍या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्‍यामुळे तिने कचास दोन्‍ही वेळा वडि‍लांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परि‍णामी सर्व दैत्‍य संतापले व त्‍यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्‍याचे ठरविले. पुन्‍हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्‍यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्‍यांचे गुरु असल्‍यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्‍याचा गैरफायदा घेवून दैत्‍यांनी डाव साधला. कच दिसेना म्‍हणून देवयानीने आपल्‍या वडिलांकडे कचासाठी पुन्‍हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्‍यानंतर त्‍यांच्‍या असे लक्षात आले की कच हा आपल्‍याच पोटात आहे. ही गोष्‍ट त्‍यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्‍या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्‍याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्‍यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्‍यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्‍यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्‍या योगे मी तो मंत्र म्‍हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्‍या हट्टाने व मद्य व्‍यसनामुळे जी गोष्‍ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्‍या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्‍या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्‍हा त्‍यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदि‍रासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्‍यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्‍लक न राहि‍ल्‍यामुळे दैत्‍यांना पुन्‍हा-पुन्‍हा जिवंत करण्‍याची शक्‍ती शुक्राचार्यांमध्‍ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्‍य झाल्‍यामुळे मूळ देवलोकी जाण्‍यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्‍यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्‍यामुळे तिने त्‍यास लग्‍नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडि‍लाच्‍या उदरातून बाहेर आल्‍यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्‍यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्‍टीचा राग येवून वअपेक्षाभंगाच्‍या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्‍त करुन चाललास त्‍या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकूल आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे यावर क्रोधीत होऊन कचदेव हि देवयानीस शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल. अशारितीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावतो व कचदेव हे देवलोकी निघून जातात. 

पुढे ही शापवाणी खरी ठरुन शुक्राचार्य ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील " ययाती " राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे. 
कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते. एकदा वनविहारास गेली असताना असूर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानी एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते. आपला जीव वाचविण्यासाठी धावा करित असताना तेथे शिकारीसाठी आलेले महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती' आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवितात. हात हातात घेतल्याने त्यांच्यावर 'पाणीग्रहण संस्कार' होतात. (पाणिग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीया कुठल्याही परपुरुषांच्या हातात आपला हात देत नसत. जर चुकूनहि हात हातात घेतला गेला तरि त्यांचे 'पाणिग्रहण संस्कार' झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे.) पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हिस क्षत्रिय राजा ययाती यांच्या बरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते. पाणीग्रहण झाले त्यावेळी ग्रह, नक्षत्र अनुकूल नव्हते व सिंहस्थ काळ असल्यामुळे कुठलाहि शुभमुहूर्त निघत नव्हता. म्हणून गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातीरी 'विवाह सिद्ध होम' करुन आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करुन ग्रह नक्षत्र अनुकूल करुन घेतले व या पावन भूमीस असे वरदान दिले की, यापुढे केव्हाही या भूमीत कोणतेही पवित्र कार्य (विवाह, इत्यादी शुभकार्य) करण्यास कुठलाही मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वेळ व सिंहस्थकाळ पहावा लागणार नाही व येथे केलेले शुभकार्य हे विशेष यशस्वी होतील.

हि कथा हजारो-हजारो वर्षापूर्वी घडलेली असून गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या तपाने पावन झालेली हल्लीची बेट कोपरगांव पावन भूमी आहे. अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज व परम शिष्य कचदेव यांच्या कोटीकोटी आशिर्वादास प्राप्त व्हावे. 

महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती यांचेशी विवाहबद्ध झाली त्यांच्या पुढील झालेल्या यदु वंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती आणि त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य, पांडव, कौरव यांचा जन्म झालेला आहे. 

आजही शुक्राचार्यांचे हे स्‍थान त्‍यांच्‍या तपोबलाने पुनीत झाल्‍यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्‍यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्‍हाही विवाह होतात.  

या सर्व गोष्‍टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्‍या ओव-या पूर्वी येथे असलेल्‍या पेशव्‍यांच्‍या वाडयाच्‍या अवशेषातून बांधलेल्‍या आहेत. तसेच समोर श्री विष्‍णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्‍णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्‍या पायथ्‍याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्‍याच्‍या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्‍ही मंदि‍राच्‍या मध्‍यात " संजीवनी पार " म्‍हणजे येथे कचास " संजीवनी " विद्या प्राप्‍त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्‍याचे हे स्‍थान असून याचे उत्‍तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्‍य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्‍वर मंदिर) असून त्‍या स्‍थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्‍वर) गुप्‍त रुपाने तेथे आल्‍यामुळे त्‍यांचेही श्री त्रिंबकेश्‍वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्‍त रुपाने आल्‍यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्‍थापना झालेली नाही. कचेश्‍वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्‍याचा रिवाज आहे. 

( लेखक वि.स .खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मुळ शुक्राचार्य ,कच आणि देवयानी यांच्या जीवनावर आधारित असून कोपरगाव येथे गुरु शुक्राचार्य मंदिर परीसरात या सर्व घडलेल्या प्राचीन घटनास्थळ आजही अस्तित्व दाखवत आहे. )


मिलिंद आरोलकर -

Saturday 10 April 2021

10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन





भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे. ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वताचे पासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण 37 वर्षात पूर्ण झाले.सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी मराठयांकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एलन्फिस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला.
40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त
ई-मोजणी, ई-फेरफार,
ई-चावडी,ई-अभिलेख,
ई-अभिलेख, ई-नकाशा,
ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई-भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.


मिलिंद आरोलकर -

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...