Wednesday 6 February 2019

दुःखाचे कारण

सर्वात दुःखदायक घटना किंवा गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. ते स्वाभाविकच आहे. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःखच जास्त बोचरे असते. शारीरिक दुःखावर औषधोपचार करता येतो, जखमा भरल्या जातात आणि ते दुःख नष्ट केले जाते . मानसिक दुःख तसे नसते. ते दुःख नष्ट होत नाही. त्या दुःखाचे विस्मरणही होत नाही. फक्त त्या दुःखाला कुरवाळण्यासाठी दिला जाणारा वेळ आपण कमी करतो एवढेच.
मानसिक दुःख होण्याचे कारण एक व एकच  असते. व्यक्ती तितक्या प्रकूती  या नियमानुसार प्रत्येकाच्या मानसिक दुःखाचे दूश्य,श्राव्य कारण वेगवेगळे असले तरी अंतस्थ कारण एकच असते. लहानमोठ्या गोष्टीबद्दल मानसिक अपेक्षाभंग किंवा मानसिक इच्छापूर्ती झालेली नसल्यामुळेच  हे दुःख झालेले असते. प्रत्येकाला भिडणारे दुःख  हे याच एका कारणाने झालेले असते. एखाद्या क्षणी एखादा थेंब आपल्याला अपेक्षित असतो, पण तो न मिळाल्याने आपल्याला दुःख मात्र हौदभर होते. नंतर केव्हातरी त्याच द्रवाच्या हौदात आपण  अंघोळ करीत असतो, पण आपल्याला आठवत असतो ,सतावत असतो  तो पूर्वी न मिळालेला एक थेंब . त्या न मिळालेल्या  छोट्याशा थेंबाने  आपला अपेक्षाभंग झालेला असतो. आपली इच्छापूर्ती झालेली नसते. त्या थेंबाशी आपल्याला देणेघेणे नसते. आपल्याला दुःख होते ते इच्छापूर्ती झालेली नसल्याने. मनासारखे झाले नाही तर  होणारे दुःख फार मोठे असते.
आपले मन अपेक्षा किंवा इच्छा जोपासते याचे कारण  आपली स्वार्थी बुद्धी हे आहे. मी,माझे, मलाच्या स्वार्थाच्या जाळ्यात माणूस अडकला की मन इच्छा-अपेक्षा करु लागते. इच्छा- अपेक्षांच्या पूर्तीसाठी माणूस प्रयत्न करु लागतो.त्या प्रयत्नांचे पापी प्रयत्नांत रूपांतर होऊन माणूस माणूसपण हरवतो.अशा प्रयत्नानंतरही इच्छापूर्ती होत नाही .मनासारखे  होत नाही त्यामुळे होणारे दुःख देहदंडाहूनही वाईट व भयानक असते. स्वार्थबुध्दीच्या  नियंत्रणाने मानसिक अपेक्षा-इच्छांचे  नियंत्रण होते. त्यामुळे अपेक्षाभंगाचा अनुभव येत नाही. म्हणून दुःखही उद्भवत नाही.


मिलिंद आरोलकर.

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...