Wednesday, 27 October 2021

"हिन्दू " शब्दाचा अर्थ.





"हिन्दू!" 

"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.
खरे म्हणजे 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती 'वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे.म्हणून हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे अवश्य जाणून घेऊयात.कारण
गेली कित्त्येक वर्षं असा भ्रम पसरविला गेलाय की,'हिन्दू' हा शब्द 'सिन्धू' या फारसी शब्दापासून निर्माण झालाय.खरे म्हणजे हे धादान्त असत्य आहे.
आपल्या 'वेद' आणि 'पुराणात'ही 'हिन्दू' या शब्दाचा उल्लेख सापडतो.
आज आपण 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूयात.
'बृहस्पति अग्यम'(ऋग्वेद)मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे.
“हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l"
म्हणजे-
'हिमालयापासून इन्दू सरोवरा(हिन्दी महासागर)पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान('हिन्दूं'चे स्थान)होय.
केवळ 'वेदांत'च नव्हे,पण 'शैव' ग्रंथातही 'हिन्दू' शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो-
"हीनं च दूष्यतेव्,हिन्दुरित्युच्च ते प्रिये।”
म्हणजेच-"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय."
कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक 'कल्पद्रुमा'तही आढळतो-
"हीनं दुष्यति इति हिन्दूः।”
म्हणजे-
"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते."
"पारिजात हरण"या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-
"हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्टं।
हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुर्भिधियते।।”
म्हणजे-
"जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय."
"माधव दिग्विजय,"मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय-
“ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन्म द्रढ़ाश्य:।
गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।"
म्हणजे-
"जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो,
तो हिन्दू आहे."
केवळ एव्हढेच नव्हे,तर आपल्या
ऋग्वेदात(८:२:४१)विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे,ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि 'ऋग्वेद मंडला'तही त्याचा उल्लेख येतो.
"हिनस्तु दुरिताम्।"
'वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच
आहेत.'



मिलिंद आरोलकर.





         
    

Monday, 25 October 2021

भारतातील साबणाचा प्रवेश आणि त्याचा दिवाळीशी असलेल्या संबंधा बद्दल .




  भारतातील साबणाचा प्रवेश आणि त्याचा दिवाळीशी असलेल्या संबंधा बद्दल ..


“साबणाचा जन्म !

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही.! 

     अंघोळीची अशी तऱ्हा होती, तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, सनलाईट सोप नावाचा.! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स.! हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही.! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.! 

    या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.! 

     आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता,.टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेलतर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत, १० रुपयांना १०० वड्या.! 

     नावही ठरलं..५०१..बार.! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिश.! टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.! लिव्हर ची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची.! आणि त्या साबणाच नाव होतं ५००.! ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले... मग आपल्या साबणाचे नाव ५०१.! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.! 

     बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला.! त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली.! त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता.! टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती.! टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.! टाटा या स्पर्धेत तरले.! या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम... तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो... त्या मोती साबणाची निर्मिती केली.! ✍🏻

     इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही माहिती महत्त्वाची.!


मिलिंद आरोलकर.-

Wednesday, 29 September 2021

पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा कोणी सुरू केली.



."पुणेरी पाट्या लावण्याची"
परंपरा या कोणी सुरू केली...
      
मला कधी कधी प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी ह्या व्यक्तीची आठवण काढतो आणि 
मस्त फ्रेश होतो.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. 
*कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करून, घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ, पुणे!*

     आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली,  
या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील. 
पण पहिली फेमस पाटी कोणी लावली, 
त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

     *प्रभाकर बाळकृष्ण जोग*
*म्हणजे प्र.बा.जोग.* 

*विद्वान माणूस विक्षिप्त असतो, अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे.*

*प्र. बा. जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते!*

     ते मूळचे *वकील.* शिवाय 
*क्रिकेट सामन्याचे अंपायर,* 
*पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा.*

पण त्यांचा सगळ्यात 
*आवडता छंद "भांडणे"* होता.

    पेशाने ते वकील , 
त्यात सदाशिव पेठ त्यात 
भांडण्याची खुमखुमी असलेले . 

*म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा!*

    भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. 
अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली,  
या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. 

*पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून, तात्विक असायची.*

    गंमत म्हणजे यातूनच त्यांनी 
*'मी हा असा भांडतो'* नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं. 
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी 
*घरात प्रवेश करतानाच काही "पाट्या" लिहून ठेवल्या होत्या.*

*माझ्यावर विश्वास असेल तर या,* 
*नाही तर कायमचे कटा!* (गणगोतासह).
या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून *‘कटण्याचा मार्ग’ही* दाखवलेला! 
अशी पाटी पाहून, 
आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, 
तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. 
त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

*‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’*

*‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.*
     
*तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.*
*खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,*
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :-

*“वरील सूचना सर्वासाठी आहेत.* 
*गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!”*
– प्र. बा. जोग

     प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.

सगळेजण त्यांना घाबरायचे,
पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

*पुण्यात पाट्यांचा आद्य जनक, म्हणून त्यांना ओळखलं गेलं.*

     त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. 
पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची,
*पण त्यांना बोलू दिलं जात नसे!*

     *त्यामुळे चिडून त्यांनी आपल्या चार चाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता!*

आणि स्वतःची 
*"पसंत व्याख्यानमाला"* 
सुरू केली.
      
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत 
व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

     त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

     स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता. 
तिथे काही तरी राजकारण करून, प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, 
एवढंच काय तर ते येऊन, 
भांडतील म्हणून मैदानात सुद्धा 
प्रवेश करू दिला नाही.

     यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरी पेक्षाही उंच असे मचाण बांधले.
      आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून, लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. 
जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

     त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. 
मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 
दारुबंदी केली आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

     *‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’*
अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. 
या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला की,
त्यांनी आपल्या घराला 
*‘मोरारजी कृपा’* } नाव दिले.
     
त्यांनी विधानसभेच्या अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. 
पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. 
सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

     पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. 
पी जोग क्लासेस चे सुहास जोग, 
अस्थि शल्यविशारद विलास जोग, 
बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग, 
ही प्र.बा. जोग यांची मुले होत. 
बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र. बा. जोग यांचा नातू.

     आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल 
प्र. बा. जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. 
ते प्रचंड हुशार होते, 
त्यांच्या कडक शिस्तीचा,
त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल 
*पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता!*

*त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून, पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला!*

*तेच ते तेच ते पेक्षा...
*बरंय थोडं वेगळं.....


मिलिंद आरोलकर -

Friday, 10 September 2021

घाली लोटांगण वंदीन चरण...


🙏घाली लोटांगण वंदीन चरण......🙏
      ||वैशिष्ट्ये व अर्थ||
बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते .अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.
वैशिष्ट्ये 
(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. 
(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.
(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४)बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. 
(५)सर्व कडवी कृष्णाला उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.
 आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया
(१) घाली लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
    प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
    भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे
अर्थ..
कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन .
(२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
    त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी
गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे .हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
 अर्थ..
तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस .
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |     
   करोमि यद्येत सकल परस्मै |
     नारायणापि समर्पयामि ||

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ...
श्रीकृष्णाला उद्देशून
हे नारायणा ,माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
 कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
 श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
 जानकी नायक रामचंद्र भजे ||
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ...
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला .
हरे राम हरे राम |राम राम हरे हरे|
 हरे कृष्ण हरे कृष्ण |कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र" कलीसंतरणं" यातील  ( ख्रिस्तपूर्व काळातील असावा.) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.
          अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे .तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो .
           🙏राम कृष्ण हरी🙏


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 1 September 2021

मरीन ड्राईव्ह आपल्या एका मराठी इंजिनियरने उभारलाय ..!!त्याचंच नाव एका धरणाला देखील देण्यात आलंय ..!



                 १९३० सालातील छायाचित्र.

शिवाजी पार्क येथील सेनापती बापट यांच्या पुतळ्यासमोर असलेला टुमदार बंगला  "उद्यम " हे नानासाहेब मोडक यांचे निवास स्थान . सध्या तिथे फडके लॅब आहे .
                २०२१ सालातील  छायाचित्र. 

This is about Queen’s necklace.........

मरीन ड्राईव्ह आपल्या एका मराठी इंजिनियरने उभारलाय ..!!

त्याचंच नाव एका धरणाला देखील देण्यात आलंय ..!!

मरीन ड्राइव्ह म्हणजे धावत्या मुंबईची ओळख .. मायानगरीच्या गळ्याचा हा नेकलेस ..!! रोज येथून शेकडो गाड्या प्रवास करत असतात. या शहरात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती, एकदा तरी कां होईना, हे मुंबईचं झळाळतं वैभव पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला येऊन जातेच ..!!

मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावरून, रात्रीच्या वेळी चकाकणारी मुंबई, अनेकांच्या मनांत, उद्याची स्वप्ने रंगवत असते ..!!

समुद्रालगत, नरीमन पॉईंटला सुरू होऊन, गिरगांव चौपाटीपर्यंत, इंग्रजी सी (C) आकारात पसरलेला हा किनारा, जागतिक दर्जाचे आकर्षण केंद्र बनला आहे ..!! पण, याचा निर्माता कोण, हे आपल्या पैकी अनेकांना माहित नसते ..!!

मरीन ड्राईव्हच्या इंजिनियरचे नाव एन. व्ही. मोडक म्हणजेच नानासाहेब मोडक ..!!
Mr. Narayan Vinayak Modak🙏💐

नानासाहेब मोडक, हे जन्मले १८९० मध्ये .. त्याकाळी, मुंबई विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हाच्या 'बॉम्बे म्युनिसिपालटी'मध्ये अभियंता म्हणून रुजू झाले .. टाऊन प्लॅनिंग, सांडपाण्याची व्यवस्था, यांत त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांचें कर्तृत्व पाहून, इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील, मुंबईच्या प्लॅनिंग मध्ये, त्यांचा शब्द प्रमाण मानला ..!!

मुंबई महानगरपालिकेचे 'स्पेशल इंजिनियर' या पदावर त्यांची नेमणूक झाली होती ..!! 

मुंबईची भुयारी गटारे, आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. झोपडपट्टीक्षेत्राचा विकास, समुद्र हटवून त्यात भराव घालणे अशा अनेक मोठ्या, मोठ्या योजना, त्यांच्या संकल्पनेतून साकारल्या होत्या .. मुंबई विद्यापीठात सिव्हिल इंजिनियरिंग डिपार्टमेंटचे 'डीन' म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं ..!!

१९३८ साली भरलेल्या, 'मुंबई इंजिनियर्स काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्यांनी मेयर अल्बर्ट यांच्या सोबत बनवलेला Outline of the Master Plan for Greater Bombay हा रिपोर्ट, आजही मुंबईच्या नगर विकासात, 'मान स्तंभ' मानला जातो ..!!

श्री. एन. व्ही. मोडक यांच्याच संकल्पनेतुन, मरीन ड्राईव्ह साकार झाले .. याचे प्लॅनिंग त्यांनी बनवलं तर कॉन्ट्रॅक्ट, शापूरजी पालनजी व भागोजी कीर यांच्याकडे दिले होते ..!! 

१९५० साली मरीन ड्राईव्ह बांधून तयार झाले .. या जवळपास ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला सुरवातीला 'क्वीन्स नेकलेस' म्हणून ओळख मिळाली होती .. आज त्याचेच नांव, नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग असे आहे ..!!

नानासाहेब मोडक यांचे कार्य मात्र एवढ्यापुरतेच सीमित राहात नाही ..!! मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला, याचं श्रेय सुद्धा मोडक यांनाच जाते. त्यांच्याच कारकिर्दीत महानगरपालिकेने तानसा, वैतरणा व भातसा ही धरणें उभारली ..!!

नानासाहेब मोडक यांनी धरण बांधण्यापूर्वी नाशिक, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यांची पाहणी केली आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीहून, ठाणे जिल्ह्यात खडीर्पर्यंत वाहत येणाऱ्या वैतरणा नदीला, पाण्याचा चांगला ओघ असल्याचे त्यांना दिसले .. त्यांनी तिथे जवळच, त्या नदीला बांध घातला आणि तलाव तयार केला ..!! 

शनिवार-रविवारी केवळ एक शिपाई बरोबर घेऊन, नानासाहेब मोडक ह्यांनी, वैतरणा धरणासाठीचे सर्वेक्षण चालून पूर्ण केले ..!! त्यासाठी, ते मुंबईहून रेल्वेने जात. त्यांच्याच जिद्दी मुळें, १९५६ साली, हे धरण उभे राहिले. त्या तलावातून १९५७ पासून दररोज ११४२ दशलक्ष लिटर पाणी, मुंबईत येऊ लागले ..!! 

या कर्तृत्वान इंजिनियरची आठवण म्हणून', मुंबई महानगरपालिकेतर्फे, नानासाहेबांच्या पश्चात, या तलावाला ‘मोडकसागर’ असे नांव देण्यात आले ..!!

आज काल कोणत्याही प्रकल्पाचे उदघाटन झाले तर, त्याला नेते मंडळीचे नाव दिले जाते .. परंतु तो प्रकल्प उभा राहावा म्हणून राबलेले लोक, कायम पडद्यामागेच राहतात ..!! अशावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर इतरत्रही, इंजिनियरचे नांव दिलेलं हे एकमेव धरण असेल.!!



मिलिंद आरोलकर.

संकलित माहिती
फोटो स्त्रोत गुगल -

Friday, 27 August 2021

‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.


‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.

‘सफरचंद’ या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कोठून आला असेल याचे मला नेहमी कुतूहल वाटे. कारण फारशी भाषेत सफरचंदाला 'सेब' असे नाव आहे. हिंदी उर्दू मध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे 'सफरचंद' नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मलाच काय अनेकांना अनेक वेळा पडलेला आहे. त्याचं उत्तर अचानकच सापडलं. 
मदिना शहरी सौदी अरेबियात. तिथल्या एका मॉलमध्ये 'सफरजल' या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली पहावयास मिळतात. . पण ती काही सफरचंदं नाहीत . त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे ‘बिही’ असे म्हणतात असे पुढे समजले. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी ही फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं ‘सफरजल’ हे नाव त्या फळांना होतं. आपण ज्याला ‘सफरचंद’ म्हणतो त्याला मात्र अरबीत 'तुफैहा' असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून ? सफरचंदाला गुजराती लोक 'सफरजन' म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव. माझ्यामते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं. गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सुरत वैगेरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल. या फळांची बंदरांवरून आवक-जावक असावी. किंवा सुरतेवरून हजयात्रेसाठी जाणं-येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी हि फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी. मोहम्मद पैगंबरांनी सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत. सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच 'सफरजन' हा शब्द त्यासाठी वापरात घेतला. मराठी लोकांनी गुजराती 'सफरजन' चे शेठीया नावाच्या जवळ जाणारे रूपांतर करून 'सफरचंद' केले. रायचंद, हिराचंद, लखीचंद सारखे सफरचंद. 

जगात सर्वप्रथम सफरचंदं माहित होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कज़ाख़िस्तानाच्या डोंगराळ भागात. तिथून हे फळ जगभर पसरले. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंदं या प्रदेशात उत्पन्न केली आहेत कि संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात. हे प्राचीन फळ आहे. सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध. बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि इव्ह हे फळ खातात आणि स्वर्गातून हाकलून दिले जातात अशी कथा आहे.
 
आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंदं होती पण भारतभर हि फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंदं होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेनं आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंदं आंबट असल्यामुळे ती इतकी प्रसार पावली नाहीत. सफरचंदं भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचे श्रेय जाते सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयास. 

या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा अध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला. शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथले अठरा विश्वे दारिद्र्य, अन्नान दशा पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचे ठरवले. अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसे पोषक हवामान आहे तसेच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्ष्यात आले आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड केली जाऊ शकते आणि तसे झाले पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फीयाहुन उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला. आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा थोर आहे. 

पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सत्यानंद हे नाव स्वीकारले आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ऍपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.



मिलिंद आरोलकर.

फोटो स्त्रोत गुगल -

Wednesday, 25 August 2021

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.




फोटो स्त्रोत गुगल -

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.


डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. पण गंमत अशी की आपल्या पैकी प्रत्येकाला वाटत की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तस नाही. वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत.

भागवत घराणे हे मुळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतल. मट्रीकच्या परीक्षेवेळी कष्टाने त्यांना मानाची ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवान बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी नारायणरावांचा जन्म १८८६ मध्ये झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होते. नारायणरावांनादेखील आपल्या वडिलांच्या प्रमाणे ‘जगन्नाथ शंकरशेठ’ स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले,

‘नारायणा, तुझी आíथक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस’

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मुलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पासआउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा इब्राहीमभाई लालजी यांचा साबणाचा कारखाना होता. तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरवण शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकाकडून मात्र या मार्गारीन पेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते. विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले,

‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पीटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सातवर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती पण ‘वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय त्यांना आपल्या देशालाच द्यायचे या हट्टापायी त्यांनी नाकारली.

याकाळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळल.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचे नाव ठेवलं

‘टाटा केमिकल्स’. टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबरसाबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘अनार अँड कंपनी’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफ्कचरिंग नावाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्ट्री सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,
वनस्पती तुपाचा शोध नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपण ही विसरून गेलो.

नारायण राव भागवतांच्या मुलीनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाच नाव अजरामर राहिले आहे.




मिलिंद आरोलकर -

फोटो स्त्रोत गुगल -

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...