Wednesday 29 September 2021

पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा कोणी सुरू केली.



."पुणेरी पाट्या लावण्याची"
परंपरा या कोणी सुरू केली...
      
मला कधी कधी प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी ह्या व्यक्तीची आठवण काढतो आणि 
मस्त फ्रेश होतो.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. 
*कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करून, घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ, पुणे!*

     आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली,  
या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील. 
पण पहिली फेमस पाटी कोणी लावली, 
त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

     *प्रभाकर बाळकृष्ण जोग*
*म्हणजे प्र.बा.जोग.* 

*विद्वान माणूस विक्षिप्त असतो, अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे.*

*प्र. बा. जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते!*

     ते मूळचे *वकील.* शिवाय 
*क्रिकेट सामन्याचे अंपायर,* 
*पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा.*

पण त्यांचा सगळ्यात 
*आवडता छंद "भांडणे"* होता.

    पेशाने ते वकील , 
त्यात सदाशिव पेठ त्यात 
भांडण्याची खुमखुमी असलेले . 

*म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा!*

    भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. 
अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली,  
या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. 

*पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून, तात्विक असायची.*

    गंमत म्हणजे यातूनच त्यांनी 
*'मी हा असा भांडतो'* नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं. 
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी 
*घरात प्रवेश करतानाच काही "पाट्या" लिहून ठेवल्या होत्या.*

*माझ्यावर विश्वास असेल तर या,* 
*नाही तर कायमचे कटा!* (गणगोतासह).
या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून *‘कटण्याचा मार्ग’ही* दाखवलेला! 
अशी पाटी पाहून, 
आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, 
तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. 
त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

*‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’*

*‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.*
     
*तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.*
*खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,*
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :-

*“वरील सूचना सर्वासाठी आहेत.* 
*गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!”*
– प्र. बा. जोग

     प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.

सगळेजण त्यांना घाबरायचे,
पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

*पुण्यात पाट्यांचा आद्य जनक, म्हणून त्यांना ओळखलं गेलं.*

     त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. 
पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची,
*पण त्यांना बोलू दिलं जात नसे!*

     *त्यामुळे चिडून त्यांनी आपल्या चार चाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता!*

आणि स्वतःची 
*"पसंत व्याख्यानमाला"* 
सुरू केली.
      
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत 
व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

     त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

     स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता. 
तिथे काही तरी राजकारण करून, प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, 
एवढंच काय तर ते येऊन, 
भांडतील म्हणून मैदानात सुद्धा 
प्रवेश करू दिला नाही.

     यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरी पेक्षाही उंच असे मचाण बांधले.
      आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून, लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. 
जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

     त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. 
मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 
दारुबंदी केली आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

     *‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’*
अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. 
या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला की,
त्यांनी आपल्या घराला 
*‘मोरारजी कृपा’* } नाव दिले.
     
त्यांनी विधानसभेच्या अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. 
पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. 
सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

     पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. 
पी जोग क्लासेस चे सुहास जोग, 
अस्थि शल्यविशारद विलास जोग, 
बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग, 
ही प्र.बा. जोग यांची मुले होत. 
बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र. बा. जोग यांचा नातू.

     आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल 
प्र. बा. जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. 
ते प्रचंड हुशार होते, 
त्यांच्या कडक शिस्तीचा,
त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल 
*पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता!*

*त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून, पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला!*

*तेच ते तेच ते पेक्षा...
*बरंय थोडं वेगळं.....


मिलिंद आरोलकर -

No comments:

Post a Comment

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...