Monday, 28 June 2021

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.




                 Photo share by facebook

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

१) आळंदी - पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद.पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 

२) पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)

३) दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड* या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे  यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. 

४) सासवड - वड म्हणजे *सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र* या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे *सासवडचा* मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन *सोपानदेवांच्या* समाधीचे दर्शन घ्यावे.

५) जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र ,
जोरी = जास्त त्रास न घेणे.
म्हणजेच *जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.* 

६) वाल्ह्या - भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न* झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)

७) लोणंद - त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 

८) तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल* या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला* येते. 

९) फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर

१०) बरड - संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते. 

११) नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त *श्रीविठ्ठलाचा* होतो.

१२) माळशिरस - माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने *मानसिक* तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या  श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 

१३) वेळापूर -त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते. 

१४) वाखरी - वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.

१५) नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो.

       🙏 "पांडुरंग... पांडुरंग "🙏



मिलिंद आरोलकर.

Monday, 14 June 2021

आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


झिरमिर पावसात नव्या रेनकोट मध्ये आपलं जुनंच दप्तर कोंबून , चिखल तुडवत आज च्या दिवशी नव्या गणवेशात शाळेत जायचो आपण आठवतंय का ?
नवा वर्ग , नवी रांग , नवा बेंच आणि नवे मित्र आठवतंय का ?
" एक साथ नमस्ते आम्ही आपले स्वागत करतो " ह्या वाक्याने नव्या शिक्षकांचं स्वागत करायचो आपण आठवतंय का ?
नवा हजेरी पट आणि त्यावर आपलं नाव चुकून जर का आलं नाही तर वाटणारी भीती आठवते का ?
नव्या वह्या पुस्तकांचा वास आज ही नाकात तसाच आहे ,
सगळ्या वाह्यांच ब्राऊन कव्हर आणि त्यावर मारलेल्या स्तेपलर च्या पिना आठवतायत का ?
मधल्या सुट्टी त मुतारी बाहेरची रांग , हाथ धुवायची लगबग आणि नव्या डब्यातल्या जाम चपाती ची चव आठवते का ? 
वर्ग विसरून चुकून दुसऱ्याच वर्गात जाऊन बसल्यावर होणारी फजिती आठवते का ?
आपल्या वर्गाला जेव्हा मैदानावर जायला मिळायचं तेव्हा बाकीच्या वर्गातल्या पोरांना दाखवलेल्या जिभा , खेळताना फुटलेलं ढोपर आणि त्यावर डेटॉल चा कापूस लावल्यावर होणारी आग आठवते का ?
शाळा सुटताना होणारं वंदे मातरम् आणि " जय हे , जय हे " यायच्या आधीच दप्तरात अडकवलेले हाथ , उद्या लवकर ये रे अशी मित्राला घातलेली साद , मुख्याध्यापिकांनी वटारलेले डोळे आणि छडीचा मार आठवतोय का ?
.
.
काहीसा असा असायचा आपला शाळेचा पहिला दिवस आठवतंय का ?
१३ जुन ही तारीख आठवतेय का ????
जर का आठवले असतील ते दिवस तर आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण करा जरा ❣️
.
.
# शाळा #


मिलिंद आरोलकर. 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो. 

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो.... मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही...

 जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

 नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा - गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे 'नवरत्ना' तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही .

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी  "ऋणानुबंध "असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया.... 
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे... 

ते आले की उतरावेच लागते... 
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!! 

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी जिवलग मित्र लाभले ते भाग्यवान....


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 2 June 2021

भाड्याची सायकल

                
                🚲  भाड्याची सायकल 🚲

आज जागतिक सायकल दिन . सायकल चालवा आरोग्य सुधारा व पर्यावरणाचा समतोल साधा असा सल्ला दिला जातो. पण सुमारे चाळीस वर्षापूर्वी सायकल खरेदी करणे ही सर्वसामान्याच्यां ही आवाक्यातली बाब नव्हती त्या काळातील रंजक आठवणी ....
१९८०-९० चा काळ होता तो...
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...
बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. 
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...

 भाड्याचे नियम कडक असायचे. 
● जसे पंच्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... 
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. 
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.  
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं 
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
 आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. 
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , 
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो... 

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 
पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही....  

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर 
आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही...

गेले ते दिवस...
राहिल्या त्या आठवणी...... 
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .


मिलिंद आरोलकर.

Sunday, 30 May 2021

चल मेरी लूना




                         चल मेरी लूना


ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे.
१ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.

डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.

 
“लुना कडून हरण्याचा विक्रम”

लुना कोणाला माहित नाही? पुणेकर (मुळचे अहमदनगर चे) फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.

१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.

 
वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.

सुरवातीला अनेकांना शंका होती की,

भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?

यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.
टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली. 

फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.

यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं.

अनेकांना गंमत वाटली. ५० सीसी ची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.

 
सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली.
त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला. 

लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही.

 
पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला.
अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सी साठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.

 
लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादर मध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.

पण हे खरोखर घडल. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन क्वींनच्या आधी दादर स्टेशनला पोहचली.
तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिट लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती. मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती.

त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडव येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.



मिलिंद आरोलकर.

Thursday, 27 May 2021

उंबरा




                        उंबरा



उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. 

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.

या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. 

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. 

काही लोक याच "उंब-याला उंबरठा "असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. 

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. 

उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही माझ्या मते उंबरा असते एक मर्यादा. 

उंबरा असते एक सीमारेषा.
उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट.

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.

उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. 

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.

पण 

उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं.

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.,......



मिलिंद आरोलकर

Tuesday, 25 May 2021

उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.



उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.


 तुम्ही असे कोणतेही मंदिर ऐकले आहे की जेथे मस्तक न घेता गणपतीची पूजा केली जाते? होय, आपण हे ऐकलेच आहे! असे एक मंदिर आहे जेथे अनुयायी त्याच्या शीरविरहित गणेशची उपासना करत आहेत. आज मी तुम्हाला गणपतीच्या मुंडकातीय मंदिराबद्दल सांगत आहे, संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत वाचा.   

 

                  मुंडाकट्या मंदिर

 हे केदार खोऱ्यातील , मुंडाकट्या मंदिरात आहे. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे डोक्याशिवाय गणपतीची पूजा केली जाते. उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील चमोली जिल्ह्यातील सोनप्रयागपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर देवभूमी म्हणूनही ओळखले जाते.


 शिवपुराणानुसार, भगवान शिवशंकर आपले वडील आहेत याची जाणीव नसल्यामुळेच गणपतीने आपल्या वडिलांना पार्वतीदेवीच्या खोलीत प्रवेश करण्यापासून रोखले होते.


 आणि ही ती जागा आहे जिथे गणपतीच्या धड्यावर हत्तीचे डोके ठेवले होते. मंदिराचे नाव कसे ठेवले गेले? मुंडाकटिया हे नाव मुंडा (डोके) आणि कातिया (विच्छिन्न) या दोन शब्दाचे संयोजन आहे जेव्हा मंदिराला मुंडकटिया मंदिर असे नाव दिले गेले.

 शिव पुराणानुसार पार्वती देवी स्नानासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी अंगावरील मळ व हळदीच्या मिश्रणातून मानवी रूप तयार केले आणि त्या शरीरात आपल्या तपोसामर्थ्याव्दारे प्राण उत्पन्न केले ., तेव्हा पार्वती देवीने त्यांना आपला मुलगा म्हणून स्वीकारले आणि आपल्या खोलीत कोणाकडेही न येण्याचे आदेश दिले.
 
 मग गणपतीने द्वार पहारा करायला सुरवात केली आणि त्यानंतर भगवान शिव शंकर तेथे पोहोचले आणि गणेशाला खोलीच्या आत जाण्यासाठी निघण्यास सांगितले. पण जेव्हा त्यांनी जाण्यास नकार दिला, तेव्हा भगवान शिव रागावले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले. नंतर भगवान पार्वती जींनी गणेश जीवनाच्या आग्रहाखातर भगवान शिवने हत्तीचे डोके भगवान गणेशाच्या धड वर ठेवले आणि नंतर भगवान शिवने स्वतः त्यांना जीवन दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला.


 केदारनाथला जुन्या मार्गावर केदारनाथला जाणारे भक्त इथेच प्रार्थना करण्यासाठी पूर्वी थांबत असत. परंतु आता नवीन मार्ग परिचित असल्याने यामार्गाने जाणारे भक्त फार कमी झालेत., केदार खोऱ्याच्या जंगलाच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिराच्या खालून मंदाकिनी नदी वाहते, हे अतिशय सुंदर विहंगम असे दृश्य पहावयास मिळते .




मिलिंद आरोलकर

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...