Wednesday, 29 September 2021

पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा कोणी सुरू केली.



."पुणेरी पाट्या लावण्याची"
परंपरा या कोणी सुरू केली...
      
मला कधी कधी प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी ह्या व्यक्तीची आठवण काढतो आणि 
मस्त फ्रेश होतो.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. 
*कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करून, घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ, पुणे!*

     आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली,  
या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील. 
पण पहिली फेमस पाटी कोणी लावली, 
त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

     *प्रभाकर बाळकृष्ण जोग*
*म्हणजे प्र.बा.जोग.* 

*विद्वान माणूस विक्षिप्त असतो, अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे.*

*प्र. बा. जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते!*

     ते मूळचे *वकील.* शिवाय 
*क्रिकेट सामन्याचे अंपायर,* 
*पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा.*

पण त्यांचा सगळ्यात 
*आवडता छंद "भांडणे"* होता.

    पेशाने ते वकील , 
त्यात सदाशिव पेठ त्यात 
भांडण्याची खुमखुमी असलेले . 

*म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा!*

    भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. 
अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली,  
या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. 

*पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून, तात्विक असायची.*

    गंमत म्हणजे यातूनच त्यांनी 
*'मी हा असा भांडतो'* नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं. 
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी 
*घरात प्रवेश करतानाच काही "पाट्या" लिहून ठेवल्या होत्या.*

*माझ्यावर विश्वास असेल तर या,* 
*नाही तर कायमचे कटा!* (गणगोतासह).
या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून *‘कटण्याचा मार्ग’ही* दाखवलेला! 
अशी पाटी पाहून, 
आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, 
तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. 
त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

*‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’*

*‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.*
     
*तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.*
*खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,*
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :-

*“वरील सूचना सर्वासाठी आहेत.* 
*गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!”*
– प्र. बा. जोग

     प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.

सगळेजण त्यांना घाबरायचे,
पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

*पुण्यात पाट्यांचा आद्य जनक, म्हणून त्यांना ओळखलं गेलं.*

     त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. 
पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची,
*पण त्यांना बोलू दिलं जात नसे!*

     *त्यामुळे चिडून त्यांनी आपल्या चार चाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता!*

आणि स्वतःची 
*"पसंत व्याख्यानमाला"* 
सुरू केली.
      
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत 
व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

     त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

     स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता. 
तिथे काही तरी राजकारण करून, प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, 
एवढंच काय तर ते येऊन, 
भांडतील म्हणून मैदानात सुद्धा 
प्रवेश करू दिला नाही.

     यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरी पेक्षाही उंच असे मचाण बांधले.
      आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून, लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. 
जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

     त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. 
मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 
दारुबंदी केली आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

     *‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’*
अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. 
या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला की,
त्यांनी आपल्या घराला 
*‘मोरारजी कृपा’* } नाव दिले.
     
त्यांनी विधानसभेच्या अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. 
पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. 
सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

     पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. 
पी जोग क्लासेस चे सुहास जोग, 
अस्थि शल्यविशारद विलास जोग, 
बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग, 
ही प्र.बा. जोग यांची मुले होत. 
बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र. बा. जोग यांचा नातू.

     आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल 
प्र. बा. जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. 
ते प्रचंड हुशार होते, 
त्यांच्या कडक शिस्तीचा,
त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल 
*पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता!*

*त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून, पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला!*

*तेच ते तेच ते पेक्षा...
*बरंय थोडं वेगळं.....


मिलिंद आरोलकर -

Friday, 10 September 2021

घाली लोटांगण वंदीन चरण...


🙏घाली लोटांगण वंदीन चरण......🙏
      ||वैशिष्ट्ये व अर्थ||
बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते .अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.
वैशिष्ट्ये 
(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. 
(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.
(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४)बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. 
(५)सर्व कडवी कृष्णाला उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.
 आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया
(१) घाली लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
    प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
    भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे
अर्थ..
कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन .
(२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
    त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी
गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे .हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
 अर्थ..
तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस .
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |     
   करोमि यद्येत सकल परस्मै |
     नारायणापि समर्पयामि ||

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ...
श्रीकृष्णाला उद्देशून
हे नारायणा ,माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
 कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
 श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
 जानकी नायक रामचंद्र भजे ||
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ...
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला .
हरे राम हरे राम |राम राम हरे हरे|
 हरे कृष्ण हरे कृष्ण |कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र" कलीसंतरणं" यातील  ( ख्रिस्तपूर्व काळातील असावा.) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.
          अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे .तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो .
           🙏राम कृष्ण हरी🙏


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 1 September 2021

मरीन ड्राईव्ह आपल्या एका मराठी इंजिनियरने उभारलाय ..!!त्याचंच नाव एका धरणाला देखील देण्यात आलंय ..!



                 १९३० सालातील छायाचित्र.

शिवाजी पार्क येथील सेनापती बापट यांच्या पुतळ्यासमोर असलेला टुमदार बंगला  "उद्यम " हे नानासाहेब मोडक यांचे निवास स्थान . सध्या तिथे फडके लॅब आहे .
                २०२१ सालातील  छायाचित्र. 

This is about Queen’s necklace.........

मरीन ड्राईव्ह आपल्या एका मराठी इंजिनियरने उभारलाय ..!!

त्याचंच नाव एका धरणाला देखील देण्यात आलंय ..!!

मरीन ड्राइव्ह म्हणजे धावत्या मुंबईची ओळख .. मायानगरीच्या गळ्याचा हा नेकलेस ..!! रोज येथून शेकडो गाड्या प्रवास करत असतात. या शहरात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती, एकदा तरी कां होईना, हे मुंबईचं झळाळतं वैभव पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला येऊन जातेच ..!!

मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावरून, रात्रीच्या वेळी चकाकणारी मुंबई, अनेकांच्या मनांत, उद्याची स्वप्ने रंगवत असते ..!!

समुद्रालगत, नरीमन पॉईंटला सुरू होऊन, गिरगांव चौपाटीपर्यंत, इंग्रजी सी (C) आकारात पसरलेला हा किनारा, जागतिक दर्जाचे आकर्षण केंद्र बनला आहे ..!! पण, याचा निर्माता कोण, हे आपल्या पैकी अनेकांना माहित नसते ..!!

मरीन ड्राईव्हच्या इंजिनियरचे नाव एन. व्ही. मोडक म्हणजेच नानासाहेब मोडक ..!!
Mr. Narayan Vinayak Modak🙏💐

नानासाहेब मोडक, हे जन्मले १८९० मध्ये .. त्याकाळी, मुंबई विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हाच्या 'बॉम्बे म्युनिसिपालटी'मध्ये अभियंता म्हणून रुजू झाले .. टाऊन प्लॅनिंग, सांडपाण्याची व्यवस्था, यांत त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांचें कर्तृत्व पाहून, इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील, मुंबईच्या प्लॅनिंग मध्ये, त्यांचा शब्द प्रमाण मानला ..!!

मुंबई महानगरपालिकेचे 'स्पेशल इंजिनियर' या पदावर त्यांची नेमणूक झाली होती ..!! 

मुंबईची भुयारी गटारे, आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. झोपडपट्टीक्षेत्राचा विकास, समुद्र हटवून त्यात भराव घालणे अशा अनेक मोठ्या, मोठ्या योजना, त्यांच्या संकल्पनेतून साकारल्या होत्या .. मुंबई विद्यापीठात सिव्हिल इंजिनियरिंग डिपार्टमेंटचे 'डीन' म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं ..!!

१९३८ साली भरलेल्या, 'मुंबई इंजिनियर्स काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्यांनी मेयर अल्बर्ट यांच्या सोबत बनवलेला Outline of the Master Plan for Greater Bombay हा रिपोर्ट, आजही मुंबईच्या नगर विकासात, 'मान स्तंभ' मानला जातो ..!!

श्री. एन. व्ही. मोडक यांच्याच संकल्पनेतुन, मरीन ड्राईव्ह साकार झाले .. याचे प्लॅनिंग त्यांनी बनवलं तर कॉन्ट्रॅक्ट, शापूरजी पालनजी व भागोजी कीर यांच्याकडे दिले होते ..!! 

१९५० साली मरीन ड्राईव्ह बांधून तयार झाले .. या जवळपास ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला सुरवातीला 'क्वीन्स नेकलेस' म्हणून ओळख मिळाली होती .. आज त्याचेच नांव, नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग असे आहे ..!!

नानासाहेब मोडक यांचे कार्य मात्र एवढ्यापुरतेच सीमित राहात नाही ..!! मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला, याचं श्रेय सुद्धा मोडक यांनाच जाते. त्यांच्याच कारकिर्दीत महानगरपालिकेने तानसा, वैतरणा व भातसा ही धरणें उभारली ..!!

नानासाहेब मोडक यांनी धरण बांधण्यापूर्वी नाशिक, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यांची पाहणी केली आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीहून, ठाणे जिल्ह्यात खडीर्पर्यंत वाहत येणाऱ्या वैतरणा नदीला, पाण्याचा चांगला ओघ असल्याचे त्यांना दिसले .. त्यांनी तिथे जवळच, त्या नदीला बांध घातला आणि तलाव तयार केला ..!! 

शनिवार-रविवारी केवळ एक शिपाई बरोबर घेऊन, नानासाहेब मोडक ह्यांनी, वैतरणा धरणासाठीचे सर्वेक्षण चालून पूर्ण केले ..!! त्यासाठी, ते मुंबईहून रेल्वेने जात. त्यांच्याच जिद्दी मुळें, १९५६ साली, हे धरण उभे राहिले. त्या तलावातून १९५७ पासून दररोज ११४२ दशलक्ष लिटर पाणी, मुंबईत येऊ लागले ..!! 

या कर्तृत्वान इंजिनियरची आठवण म्हणून', मुंबई महानगरपालिकेतर्फे, नानासाहेबांच्या पश्चात, या तलावाला ‘मोडकसागर’ असे नांव देण्यात आले ..!!

आज काल कोणत्याही प्रकल्पाचे उदघाटन झाले तर, त्याला नेते मंडळीचे नाव दिले जाते .. परंतु तो प्रकल्प उभा राहावा म्हणून राबलेले लोक, कायम पडद्यामागेच राहतात ..!! अशावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर इतरत्रही, इंजिनियरचे नांव दिलेलं हे एकमेव धरण असेल.!!



मिलिंद आरोलकर.

संकलित माहिती
फोटो स्त्रोत गुगल -

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...