बेस्ट (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) बस वाहतूक सुरु झाली.
बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणार्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७४ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडीबंदर (नंतरचे बोरीबंदर आणि आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो.
मुंबई शहराच्या इतिहासात १९ वे शतक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शतकाने सात बेटांच्या या शहरात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणले. ही सात बेटे एकत्रित करून भौगोलिकदृष्टय़ा त्यांचे एक शहर करण्याची प्रक्रिया १८३०मध्ये म्हणजे १९व्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्ण झाली. त्यानंतर या शतकाच्या उत्तरार्धाची सुरुवात होतानाच १८५३ मध्ये मुंबईत रस्ते आणि रेल्वे या दोन गोष्टींची भर पडली. त्यामुळे एक बंदर आणि व्यावसायिक केंद्र म्हणून शहराचा विकास झाला. शहरातील कापड गिरण्या आणि नव्याने सुरू झालेले मुंबई विद्यापीठ यांमुळे शहराकडे येणारे लोंढे वाढत होते. त्यातच जगाच्या दुसऱ्या टोकाला, अमेरिकेत १८६१ मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धामुळे भारतातील कापडाची मागणी खूपच वाढली. याचा परिणाम एकंदरीत शहराच्या वाढीवर न होता, तरच नवल! १८२६ मध्ये केवळ १,६२,५७० एवढीच असलेली या शहराची लोकसंख्या १८७२ मध्ये, म्हणजेच केवळ ४६ वर्षांच्या कालावधीत ६,४४,४०५ एवढी वाढली. एकेकाळी मलेरिया, ताप यांचे शहर अशी ओळख असलेली मुंबई हळूहळू कात टाकत होती.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १८७४ साली बाँम्बे ट्रॅम अँक्ट मंजूर होऊन `बाँम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रँमवेज कंपनी"कडे दोनशे घोडे व वीस ट्रॅमगाड्या आल्या. १९२० साली दुमजली ट्रॅम गाड्या मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या होत्या.ट्रॅम वाहतुकीच्या पाहणीत १९१३ साली रिमिंग्टन या अधिकार्याने मुंबईत ट्राँली बस आणायची सूचना केली होती. १९२६ पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही. डारडिंपल नावाच्या साहेबाने मात्र जोर लावल्यामुळे मुंबईत ट्राँली बस आणावी की मोटारबस यावर पुन्हा एकदा चर्चा झडली. शेवटी पहिली बस १५ जुलै १९२६ या दिवसापासून प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये पहिली मोटारबस धावू लागली. हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. दादर टीटीपासून पारशी काँलनीतून किंग्ज सर्कलपर्यंत, आँपेरा हाऊसपासून लँमिंग्टन रोडपर्यंत असे त्या मोटारबसचे काही मार्ग होते. मोटारबस सुरु झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी हे भाड्याचे वाहन रूढ झाले होते. ३१ डिसेंबर १९२६पर्यंत बाँम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रॅम कंपनीकडे २४ बसगाड्या झाल्या होत्या. १९२७ सालपर्यंत मुंबईत ४९ लाख प्रवाशांनी या बससेवेचा फायदा घेतलेला होता.
सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. त्याकाळी सिंगलडेकर बसमध्ये ३६ प्रवाशांची सोय होत असे. मात्र डबलडेकर बसमध्ये ५८ प्रवासी बसू लागले. दुसर्या महायुद्धाच्या काळात अपरिहार्यता म्हणून बेस्टने सिंगलडेकर गाड्यांच्या टपावर बसण्याची सोय केली. या बसमधून ६० प्रवासी जाऊ शकत. मात्र उन्हाळा व पावसाच्या काळात टपावरील प्रवाशांना बसायला त्रास होऊ लागल्याने हळूहळू ही सुविधा बंद करण्यात आली.मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या व कमी बसेस यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती. त्यातून मार्यामार्याही होत असत. म्हणून बेस्ट प्रशासनाला शेवटी बसमध्ये प्रवेश करणार्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणणारा कायदा करावा लागला.
छोट्या अंतराच्या प्रवाशांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून १९६७ साली बेस्टने आँल स्टॅंडिंग बसचा प्रयोग केला. या बसमध्ये मोकळ्या जागांच्या व्यतिरिक्त सर्व प्रवासी उभे राहात. पण ही बस लोकांना आवडली नाही. लोक तिला बकरा गाडी म्हणूलागले. ही बस १९७०मध्ये बंद झाली. पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. दुसर्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले. बेस्ट देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे. बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली. मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था. मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो. तो शिलकीच असतो, हे महत्वाचे.
सध्या काही नालायक, स्वार्थी राजकारणी स्वत:च्या व भांडवलदारांच्या स्वार्थाकरीता ‘बेस्ट' जाणूण बूजूनबंद पाडू पाहत आहेत. आता आपण तमाम मुंबईकरांनी एकत्र येऊन ‘बेस्ट' वाचवलीच पाहीजे. ‘बेस्ट‘ ही मुंबईची शान होती, आहे आणि यापुढेही ती तशीच अबाधीत राहीलीच पाहिजे.
मिलिंद आरोलकर .
khup chan mahiti
ReplyDelete