पूर्वी मुंबईत जेव्हा चाळ संस्कृती होती तेव्हा तिथे राहणाऱ्या कुटुंबांना "बिऱ्हाड" म्हणत. अशी अनेक "बिऱ्हाडं" त्या चाळींमधून दाटीवाटीने रहात असत.
खोल्यांचा आकार स्क्वेअर फुटात मोजायची पद्धत तेव्हा रूढ नव्हती. तेव्हा त्या लहान लहान सिंगल आणि डबल रूम म्हणजे घरं होती. त्यात राहणाऱ्या लोकांचीच नाही तर चाळीतील सर्वांची.
अनेकदा अनेक घरांना वर्षानुवर्षे कुलूप लागत नसे. एकतर घरात इतकी लोकं असत की कोणी ना कोणीतरी घरात सदैव असे. तसेच कोणीच नसेल तेव्हा कुलूप लावण्यापेक्षा "वहिनी / काका मी जरा बाजारात जाऊन येते आहे. जरा लक्ष ठेवा."
इतके शेजाऱ्याना सांगून दार सत्ताड उघडे टाकून जाण्याइतपत विश्वास असलेला शेजार तेव्हा होता.
वर्षानुवर्षे, दोनेक पिढ्या एकत्र राहिलेली, फक्त सिंगल विटांच्या भिंतीने वेगळी असलेली अनेक लोकं "चाळकरी' नामक एका मोठ्या कुटुंबाचा भाग होती!
हळूहळू फ्लॅट संस्कृती बोकाळू लागली. गरज, चैन, दिखावा अश्या विविध कारणांनी लोकं मुंबई सोडून उपनगरात जाऊ लागली.
मग एखाद्या सकाळी चाळीच्या दाराजवळ एक ट्रक लागायचा. 'अमुक एक बिऱ्हाड चाळ सोडून जातंय...' अशी खबर यायची. चाळीतील तमाम मंडळी सार्वजनिक गॅलरीत उभी राहून "बिऱ्हाड जाण्याचा" कार्यक्रम बघत असायची.
कामाला आलेले हमाल एकेक कपाट, पलंग, खुर्च्या, टेबल्स, भांडीकुंडी, खेळणी, कपडे अश्या वस्तू जिन्यावरून उतरवत ट्रक मध्ये मांडून ठेवायला सुरुवात करत. त्यातील कित्येक भांडी कित्येकदा चाळीतील अनेकांच्या घरात काहीतरी गोडधोड भरून आलेली असायची. एखादी बॅग किंवा खेळणं एखाद्या वाढदिवस किंवा लग्नात चाळकऱ्यानीच भेट दिलेलं असायचं!
हळूहळू घर रिकामं व्हायचं. भिंतीवर, छतावर आणि जमिनीवर त्या कुटुंबाच्या वास्तव्याच्या अनेक खुणा दाखवत असलेलं ते घर आता एक भकास खोली बनून राहायचं. त्या घरात खेळलेली मुले, गप्पा आणि चहाड्यांचे फड जमवलेल्या शेजारणी, गणपतीच्या आरतीत चुरशीने देवे म्हणलेली तरुण पोरे त्या घराचे काही तासात संपलेले अस्तित्व चाळीच्या कठड्यावर हनुवटी टेकवून बघत राहायची.
ट्रक भरला की ते कुटुंब सर्वांचा निरोप घ्यायला यायचे. इतका वेळ धरून ठेवलेले भावनांचे बांध फुटायचे. एकमेकांना मिठ्या मारून -
"रविवारी, गणपतीला भेटूच..... फार लांब नाहीये..... ट्रेनने तासभर आणि स्टेशन पासून चालत दहा मिनिटे..... नक्की या, येऊ....! काळजी घ्या रे बाबांनो....!" अश्या प्रकारचे संवाद व्हायचे.
कुटुंब त्याच ट्रकमध्ये बसून सर्वांना शेवटचा टाटा करून काळाच्या ओघात गुडुप व्हायला निघून जायचे. चाळीतील उरलेले आपापल्या आयुष्यात गर्क व्हायचे. त्या खोलीत मग एखादे नवे बिऱ्हाड यायचे. त्या खोलीचा कायापालट व्हायचा.
अशी बिऱ्हाडं येत जात राहायची. पण मूळ रहिवाश्यांशी असलेलं ते नातं परत क्वचितच तयार व्हायचं!
आजही ती माणसं मनात घर करून आहेत. अनेक वर्षांपूर्वी जाताना जशी दिसायची तीच छबी अजून मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेली आहे. काळ पुढे सरकला तरी खुणा मागे ठेवून गेला आहे!
बिऱ्हाडं केव्हाच गेली असली तरी त्यांच्या आता थोड्याश्या अंधुक झालेल्या आठवणी आजही मनात "बिऱ्हाड" थाटून आहेत!
मिलिंद आरोलकर.
खुप छान
ReplyDeleteछान लेख
ReplyDelete-अशोक सावंत
छान 👍 गावी एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी कुटुंब राहायला आले तर बिऱ्हाड घेऊन आले का असं विचारलं जातं....
ReplyDelete