Saturday, 30 November 2019

मुलांना काय हवे असते..!

मुलं ही स्वावलंबी नसतात, मुलांना शेवटपर्यंत आईवडील आणि आईवडिलांनासुध्दा  मुलं  सोबत हवी असतात. ते  एकमेकांवर अवलंबून राहतात. त्याच्यां  आयुष्यात  त्यांना  काही  मिळालं नाही,तर  आईवडिलांना दोष देतात,त्यांच्याकडे लहानसहान हट्ट करतात. मोठं झाल्यानंतर आईवडिलांचा सांभाळ ही करीत नाही.  अनेक कुटुंब असे असतात जिथे फक्त  रक्ताच नात असतं.म्हणून एकत्र राहतात. कोणाला  कोणाविषयी  फारशी आपुलकी नसते. नातं कायम ठेवायच एवढ्यासाठी एकत्र असतात फक्त.
पूर्वी मनाचा तेवढा विचार केला जात नव्हता. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनाचा विचार करीत असते.  त्यामुळे कुटुंबात ताणतणाव  जास्तच वाढलेले दिसतात. फक्त संपत्ती ,पैसा  यापेक्षाही  काहीतरी हवं असतं आजच्या पिढीतील मुलांना,  त्यामुळे ते सतत अस्वस्थ असतात. कुटुंबात  सर्वांना बांधून ठेवणारा  सर्वात महत्वाचा धागा असतो तो म्हणजे प्रेम . कुटुंबातील प्रत्येकाचे  प्रत्येकावर प्रेम असतं ; परंतु ते व्यक्त  कशातूनही करता येत नाही.  कारण कुणाला कुणासाठी वेळच नसतो.  प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतात.   मुलांना आईवडिलांचा  सहवास हवा  असतो तेव्हा तो त्यांना मिळत नाही  आणि आईवडिलांना जेव्हा  मुलांचा सहवास  हवा असतो,तेव्हा  मुलं त्यांच्यापासून दूर असतात. आजच्या मुलांना स्वातंत्र्य हवं असतं त्यांना कुटुंब ही हवं असतं, पण  ते रक्तांच नात आहे म्हणून नाही तर मनाने ,जवळ नाही असं त्यांना वाटतं  खरंतर एकमेकांच्या सहवासाच्या अभावामुळे  त्यांना असं वाटतं . पूर्वी आईवडील जवळ नसले ,तर आजीआजोबा ,काका काकू ,  आत्या त्यांची मुलं  हा सर्व गोतावळा घरात असायचा.  मूल जरा रडायला लागल की, एवढी सर्व माणसं  त्याचे लाड करायची. त्यामुळे एकटेपण नावाची गोष्ट तेव्हा नव्हती.
आज तर सिंगल चाईल्डचाच  काळ आहे.  त्यामुळे त्यांना  सोबत कोणाचीच नसते . मग त्यांच वागणं बदलत जात ,  ते एकटं पडत जात ,त्याचवेळी मनाचा विचार जास्त करू लागत व अस्वस्थ होत जात. कारण आज मुलांच्या गरजा बदलल्या आहेत , त्यांना प्रेम हवं असत ,माया करणारी माणसं हवी असतात.  पूर्वी हे सहज मिळत  असल्यामुळे  ती त्यांची गरज आहे , या पातळीवर विचार करण्याची संधी कधीच मिळत नव्हती . त्यामुळे त्यांच्या मनाचे नेमक काय बिनसलय  हे त्यानांही  कळत नाही त्यामुळेच डिप्रेशन म्हणजेच विमनस्कता  याचे प्रमाण  मुलांमध्ये वाढत चाललय . जो शब्द पूर्वीच्या काळी  मुलांना माहितही नसायचा  आज डिप्रेशनने म्हणजेच विमनस्कतेने  त्यांच्याभोवती  वेढा घातला आहे.


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 6 February 2019

दुःखाचे कारण

सर्वात दुःखदायक घटना किंवा गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. ते स्वाभाविकच आहे. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःखच जास्त बोचरे असते. शारीरिक दुःखावर औषधोपचार करता येतो, जखमा भरल्या जातात आणि ते दुःख नष्ट केले जाते . मानसिक दुःख तसे नसते. ते दुःख नष्ट होत नाही. त्या दुःखाचे विस्मरणही होत नाही. फक्त त्या दुःखाला कुरवाळण्यासाठी दिला जाणारा वेळ आपण कमी करतो एवढेच.
मानसिक दुःख होण्याचे कारण एक व एकच  असते. व्यक्ती तितक्या प्रकूती  या नियमानुसार प्रत्येकाच्या मानसिक दुःखाचे दूश्य,श्राव्य कारण वेगवेगळे असले तरी अंतस्थ कारण एकच असते. लहानमोठ्या गोष्टीबद्दल मानसिक अपेक्षाभंग किंवा मानसिक इच्छापूर्ती झालेली नसल्यामुळेच  हे दुःख झालेले असते. प्रत्येकाला भिडणारे दुःख  हे याच एका कारणाने झालेले असते. एखाद्या क्षणी एखादा थेंब आपल्याला अपेक्षित असतो, पण तो न मिळाल्याने आपल्याला दुःख मात्र हौदभर होते. नंतर केव्हातरी त्याच द्रवाच्या हौदात आपण  अंघोळ करीत असतो, पण आपल्याला आठवत असतो ,सतावत असतो  तो पूर्वी न मिळालेला एक थेंब . त्या न मिळालेल्या  छोट्याशा थेंबाने  आपला अपेक्षाभंग झालेला असतो. आपली इच्छापूर्ती झालेली नसते. त्या थेंबाशी आपल्याला देणेघेणे नसते. आपल्याला दुःख होते ते इच्छापूर्ती झालेली नसल्याने. मनासारखे झाले नाही तर  होणारे दुःख फार मोठे असते.
आपले मन अपेक्षा किंवा इच्छा जोपासते याचे कारण  आपली स्वार्थी बुद्धी हे आहे. मी,माझे, मलाच्या स्वार्थाच्या जाळ्यात माणूस अडकला की मन इच्छा-अपेक्षा करु लागते. इच्छा- अपेक्षांच्या पूर्तीसाठी माणूस प्रयत्न करु लागतो.त्या प्रयत्नांचे पापी प्रयत्नांत रूपांतर होऊन माणूस माणूसपण हरवतो.अशा प्रयत्नानंतरही इच्छापूर्ती होत नाही .मनासारखे  होत नाही त्यामुळे होणारे दुःख देहदंडाहूनही वाईट व भयानक असते. स्वार्थबुध्दीच्या  नियंत्रणाने मानसिक अपेक्षा-इच्छांचे  नियंत्रण होते. त्यामुळे अपेक्षाभंगाचा अनुभव येत नाही. म्हणून दुःखही उद्भवत नाही.


मिलिंद आरोलकर.

Sunday, 27 January 2019

शाळा - महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा घसरता दर्जा.

दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात  महाविद्यालयात स्नेहसंमेलने होतात.काही महाविद्यायालयांनी स्नेहसंमेलन म्हणजे नुसती " उठाठेव नि डोकेदुखी " बंद केली आहेत. त्यांनी खर म्हणजे अशा संस्कृती- उध्दारक कार्यक्षम शाळा - महाविद्यालयांचा आदर्श घ्यायला हवा , निदान कानठळ्या बसविणाऱ्या  ह्दयविकाराचा तीव्र झटका आणणाऱ्या , गर्भातल्या बाळालाही घाबरवून सोडणाऱ्या  डीजे चे कार्यक्रम वारंवार घ्यावेत . म्हणजे अकारण ज्ञान , विज्ञान , शिस्त , संस्कार आणि सुप्त कलागुणांना वाव  सांस्कृतिक उपक्रम असल्या अनाठायी गप्पानां पूर्णविराम मिळेल.नाही तर अशा धांगडधिंगाणा छाप कार्यक्रमांना वाव कुठे मिळतो ? विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या सांस्कृतिक स्पपर्धामध्ये एकांकिका , एकपात्री प्रयोग , सुगम संगीत ,चित्रकला,कोलाज यासारखे ज्याला साधना लागते असेच कार्यक्रम  आणि स्पर्धा असतात.
पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची,त्यामध्ये तर प्राध्यापकांच्या पुढाकाराने तीन अंकी नाटक महिना महिना तलीम  घेऊन  बसविले जायचे.
त्यात रंगभूमीला स्टेजवरचे  आणि बँकस्टेजचे कलाकार निर्माण करण्याची क्षमता असायची.रंगभूमीची शिस्तही अशा मुलामुलींच्या अंगी बाणावली  जायची .आपल्याला स्नेहसंमेलनाच्या  एकांकिकेत  एखादा रोल मिळावा , म्हणून महाविद्यालयात होणाऱ्या  निवडचाचणीसाठीही जय्यत तयारी व्हायची. एकपात्री , सुगम संगीत गायन , नाट्यसंगीत  अशा विविध गुणांचे दर्शन संमेलनामध्ये असायचे. त्याकलेबाबत  मार्गदर्शन , अभ्यास , आणि कष्टपूर्वक तयारी हे  अपरिहार्यच असे. स्नेहसंमेलन आणि पारितोषिक  वितरण सोहळा म्हणजे मर्मबंधातल्या आठवणींचा खजिना असे . काळाच्या ओघात हे सगळे कुठे लुप्त झाले,कळलेच नाही. आता विचारवंत नको , प्रमुख अतिथी म्हणून  लोकप्रिय अभिनेता वा अभिनेत्री हवी असते. सगळ्या उपक्रमांचे कधी बारा वाजले ,हे लक्षातच आले नाही.
फारसे शास्त्रीय अधिष्ठान नसलेली उठवळ गाणी मोठ्या आवाजात वाजवायची. त्यावर स्टेज हादरवून सोडणारी नूत्ये करायची त्याला नूत्य म्हणता तरी येईल का  हा प्रश्न पडतो. असतात ते आचकट विचकट चाळे  आणि लोकांना कर्णबधीर करुन सोडायचे . अशा कार्यक्रमांच्या सादरीकरणात कला अजिबात अंगी नसते , एखाददुसरे नूत्य  खरेच चित्रपटातील नूत्याहूनही सुंदर असू शकते . पण सरसकट पाहिले तर  सावळागोंधळ नि धांगडधिंगाणा  यासदरात मोडणारा  सगळा प्रकार असतो. निदान ज्याला सूजनाची आणि साधनेची गरज एकाग्रता व कष्टाचे मोल द्यावे लागते असे  काही सादर होताना अलिकडे दिसत नाही. म्हणजे  " ती फुलराणी " किंवा " प्रेमा तुझा रंग कसा ? " यातील १० मिनिटांचा प्रवेश सादर करायचा तर उच्चारण ,पाठांतर ,वाचिक ,कायिक अभिनय ,आवाजातले आरोह - अवरोह  ( चढ-उतार ) ,प्रेक्षकांना खिळवून ठेविल अशी नजर आणि मुद्राभिनय  हे सगळे आले .त्यापेक्षा " झिंग झिंग झिंगाट "  हे मोठया आवाजात लावायचे . नि एकानेच काय  १०/२० जणांनी स्टेजतोड नाच करायचा हे कसे सोपे आहे ,छान आहे  आनंद  म्हणावा तर तो गाण्यातला आहे ,चमचमणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा , प्रकाशरेषांचा आहे ,थोडाफार नाचातला ही आहे  सारे कसे झिंग आणणारे  असते ,कसली मज्जा असते,जल्लोष असतो. ते ज्या आमच्यासारख्या अरसिकांना  आवडत नाही , ते ओरडत असतात. स्नेहसंमेलनातला स्नेह संपला ,विविध गुणदर्शनातले गुणदर्शन संपले,गुण उधळण राहिली . पण अशा मतांना कस्पटासमान लेखले पाहिजे.
अलिकडे शाळांच्या स्नेहसंमेलनातसुध्दा ९/१० वर्षाच्या चिमुकल्या मुली " अप्सरा आली " किंवा  "चोली के पिछे क्या है "  अशा गाण्यावर नाचवले जाते आईवडिलांना त्याचे किती कौतुक चार शब्द बोलता  नाही आले स्टेजवर तरी चालेल .पण गाण्यावर नाचता आले पाहिजे .ही मुलंमुली त्यालाच कलागुण समजत राहतात , आणि त्याच्या सूजनाच्या आणि साधनेच्या वाटाच बंद होतात. शाळांमध्ये तरी  कलागुणांचे विकसन व्हावे असे उपक्रम व्हावेत कि नाही ? त्यासाठी वेळच नाही. गाणी वाजवायला वेळ लागत नाही ,गाण शिकायला वेळ लागतो . तरुण मंडळे ,राजकीय पक्ष संघटना इत्यादीसुध्दा धार्मिक झिंग आणणारे उपक्रम  आणि रेकॉर्ड डान्स  स्पर्धा चेच  आयोजन करतात. नाहीतर माणसं गोळा कशी होणार.
हल्ली प्रोफेशनल काँलेजेसमध्ये वेलकम् , फेअरवेल असले कार्यक्रम अधूनमधून होत असतात. भरमसाठ वर्गणी वसूल करुन खानपान ,नूत्यधिंगाणा यात रात्र जागविणाऱ्या कार्यक्रमाची तयारी त्यात असते . अगदी महाविद्यालयातील टँँडिशनल डेज् मध्ये सुध्दा डीजेच्या  जोडीला  मद्य ही  आले ,ही गोष्ट आता सर्वश्रुत झाली आहे.सर्वच चांगल्या  उपक्रमाचे " वाजले कि बारा " म्हणायचे फक्त ,की भडक नि भव्य धिंगाणाग्रस्त  उपक्रमांना हद्दपार करून छोटे पण कलासक्ती वूध्दींगत करणारे  कार्यक्रम घ्यायचे ,हे अजूनही शाळा - महाविद्यालय यांच्या हातात आहे .त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी !



मिलिंद आरोलकर.

Sunday, 6 January 2019

बेपर्वाईचे बळी..!

मुंबई  शहर व आसपासच्या परीसरात गेल्या काही वर्षापासून विस्तारिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक मोठे रस्ते शहरातून जातात,महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांस अनेक रस्ते  येऊन मिळतात.शहरातील अरूंद रस्ते  काही ठिकाणी चाललेल त्याच विस्तारीकरणाचे काम होत असतानाच  अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाढलेल्या वाहनांची संख्या मोठी असून ,गेल्या वर्षभरात  झालेल्या अपघातात विद्यार्थी व तरुणांचा  झालेला मूत्यू हा चिंतेचा विषय ठरला आहे . मुलांच्या हाती वाहन म्हणजे मूत्यूची चावीच झाली असून ,त्याचा कुटुंब व समाज व्यवस्थेवर गंभीर परीणाम होत आहे.  शहरातील रस्त्याच्या बाजूस गूहनिर्माण संस्था, व्यावसायिक इमारती  व शैक्षणिक संकुलही मोठ्या प्रमाणावर आहेत . शहरात व शहराबाहेर असलेल्या व्यावसायिक शिक्षण संकुलात जाणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थीनीचीं संख्या लक्षणीय असून ,हे विद्यार्थी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यापेक्षा मोटारसायकलने ये-जा करताना  दिसतात. पालकही मुलांचा येण्याजाण्याचा त्रास  व वेळ वाचावा   या उद्देशाने मोटारसायकल वा अन्य  वाहन घेऊन देतात.मात्र,मुलांकडे हे मोटारसायकल चालविण्याची क्षमता आहे की नाही हे तितकेसे पाहत नाही त. याबाबत पालकही बेफिकीर असून ,आपला मुलगा किंवा मुलगी  वाहन कसे चालवितात याकडे पहायला व विचारायलाही त्यांच्याकडे वेळ नाही.
अनेक मुले व तरुण  पालकांना  चुकवून वाहने घेऊन जातात.नियम व गतीची माहिती नसतानाही शहरात  शहराबाहेर सुसाट वेगाने वाहने चालवितात.त्यामुळे पहाणाऱ्याच्या मनात ही अपघाताची धडकी भरते. मुंबई  महाराष्ट्रातील लहान मोठ्या शहरातील तरुण वर्ग  महाविद्यालयात जाताना सर्रास वापरत असल्याचे पहावयास मिळते. विद्याथ्र्यांनी गाडी वापरण्यास दुमत नाही , परंतु वापरताना,चालविताना जी बेफिकिरी पाहवयास मिळते ती मात्र काळजी करणारी आहे. त्यामुळे मोटारसायकल चालविणाऱ्या  विद्यार्थ्यात जागृती  करण्याची आज गरज बनली आहे.
देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक माणसे मूत्यूमुखी पडत असून , यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उघडी पडत आहेत .शहरात वाहतुकीचे नियम न पाळता अल्पवयीध मुले,विद्यार्थी-विद्यार्थीनी  राजरोसपणे मोटारसायकल चालविताना दिसतात. धूमस्टाईल हायस्पीड चालविण्याची रस्त्यावर जणू स्पर्धाच लागलेली असते.अनेक शाळा महाविद्यालयाच्या  परिसरामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी विनापरवाना  वाहने चालवित आहेत. अशा अल्पवयीन मुलांमुळे बेदरकार वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे त्यांचा जीव धोक्यात असतोच , मात्र त्यासोबत अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांनाही  धोका निर्माण होतो , अशा घटनांना आळा घालण्यासाठी  वाहनचालकांवर केवळ दंडात्मक  शिक्षा न करता  गाडीमालक व पालकांवर  कारवाई झाल्यास जरब बसविता येईल . विनापरवाना व विद्यार्थ्यानीं चालविलेल्या वाहनांच्या धडकेत अनेक मूत्यू पावल्याचे व कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना पहावयास मिळतात. त्यामुळे वाहन अपघात हा सध्या गंभीर चिंतेचा  विषय झाला आहे. त्यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना मोटारसायकली देण्याचे  टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्यास पालकांनी प्रवूत्त करण्याची अपेक्षा आहे. धूमस्टाईल हायसहायस्पीडने मोटारसायकल चालवणाऱ्या विद्यार्थी व तरुणांवर आता कडक बंधने घालणे गरजेचे आहे. अन्यथा कुटूंबचा आधार नाहीसा होईल.


मिलिंद आरोलकर.

Sunday, 30 December 2018

कामगार चळवळीत बदलांची आवश्यकता.



प्रस्थापित बुध्दीमंताच्या शब्दात सांगायच झाल तर कामगार चळवळ हा संपलेला विषय मानला जातो.परंतु आजही ही चळवळ  आपल्या भारतात टिकवण्याचा जगवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. शासकीय पातळीवरून यास कुठलही पाठबळ नाही ,कारण नव्या व्यवस्थेला कामगार चळवळीची आवश्यकता नाही. मग शासन तरी याकडे कशाला लक्ष देईल उलट शासनाची धोरणेच ही चळवळ संपावयाला मदत करणारी आहेत. 
आज आमच्या देशातल्या तरुण पिढीला कामगार चळवळ म्हणजे काय ?  हे देखिल माहित नाही., देशात आजमितीला सुमारे ६५,००० ( पासष्ठ हजार ) नोंदणीकृत  लहान-मोठ्या कामगार संघटना या देशात आहेत . या संघटना आपल अस्तित्व टिकवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करताना दिसतात. कामगार संघटनांचे कार्य आजपर्यंत कामगारांना अधिक वेतनमान मिळवून देणे,बोनस.भत्ते आदी सवलती मिळवून देणे  हेच सर्वसामान्यांच्या शब्दांत सांगितलं जात परंतु त्याच बरोबर त्यांच जीवनमान  उंचावण सामाजिकदृष्ट्या, व्यसनविरहित समाजव्यवस्था बनविण्यास मदत करणे ह्या बाबींकडे कोणीही लक्ष देत नाहीत.
   २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील शतकाच्या शेवटच्या काहीवर्षात  २१ व्या शतकातील कामगार चळवळ  कशी असेल यावर बराच उहापोह त्यावेळी संघटना पातळीवर  मोठ्या प्रमाणावर झाला. आज २१ व्या शतकातल्या १८  व्या वर्षातून १९ व्या वर्षात आपण प्रवेश करीत आहोत  मागे वळून पाहता ज्या कल्पना केल्या गेल्या आराखडे बांधले गेले होते ,आज २१ व्या शतकात ते स्वप्नरंजन होत असं म्हणाव लागेल. अत्याधुनिकिकरण ,संगणकीकरणाचा नवा अवतार अंकियकरण ज्याला इंग्रजीत  ' डिजिटलाईजेशन ' असे म्हणतो ते आज पहावयास मिळतेय  . यात पुढे जाउन ,A.I म्हणजे आर्टिफिशियल इटेलिजन्स् ,रोबोट तंत्रज्ञान यांचा वापर आस्थापनात मोठ्या प्रमाणावर करण्याचे योजत आहे. वाहन उद्योगात आजही  स्वयंचलित यंत्रमानव तंत्राव्दारे  गाड्यांची जोडणी (असेंब्लिंग) केली जाते.स्वयंचलित यंत्रमानव तंत्र हळू हळू सर्वच क्षेत्रात आणणे व जवळ जवळ माधवी श्रमाचा वापर उद्योगधंद्यात कमी करणे तसेच कार्यालयीन कामकाजातही याच तंत्रज्ञानाचा वापर करुन माहितीचे विश्लेषण करुन त्याआधारे कमी श्रमात अधिक फायदा करवून  घेण्याची तयारी जवळ जवळ सर्वच आस्थापनांंची आहे.
मग जिता जागता माणूस पाहिजे कि यंत्रमानव आम्ही म्हणतो  यंत्रमानव म्हणजे "  सांगकाम्या "  सांगितलेलीच कामे करणार ,पण ज्या व्यवस्थेला  यंत्रमानवच हवा आहे , कारण यंत्रमानव कितीही तास काम करावयास तयार ,तो पगार मागत नाही, बोनस,सुट्टी मागत नाही  शिवाय अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकतो. मग अशावेळी बेकार कामगार -कर्मचाऱ्यांचे  काय ?  यातच नव्याने येणाऱ्या चौथ्या पिढीची औद्योगिक क्रांन्ती l.4.0  इंन्डस्टीची सुरुवात यादेशात सुरु करण्याची तयारी जोशात सुरु आहे.यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात कायद्यात बदल केला जातोय ,आज देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत ते यापदी का आहेत याची अनेक कारणे सांगितली जातात.त्यातीलच एक कारण आद्यापि सामान्याच्या लक्षात आलेल नाही ते म्हणजे ४ थ्या पिढीच तंत्रज्ञान व औद्योगिकीकरण यांस यादेशात चालना देणे.याचकरिता त्यांना पंतप्रधान पदावर बसविण्यात आले आहे.अर्थातच येथील नामवंत अर्थतज्ञांनाही याची कल्पना आहे .व्यवस्था बदलताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणारे बदल तसेच  दबाव यादेशातील व्यवस्थेत बदल अनेकदा घडवून आणले आहेत.हे अनेक वेळा पाहिल गेल आहे.सर्वसामान्य माणसांच्या दूष्टीकोनातून  अर्थशास्त्र , धोरणनिश्चिती समजण्याबाहेरचे असले.तरी त्यांना गुंगवणारे व गुंतवणारे , झुलवणारे नेते मिळालेका जनता बाकिच बघत नाही.चौथ्या औद्योगिक क़ांन्तीतीमुळे जे बदल आर्थिक व सामाजिक स्तरावर होणार आहेत ते कशाप्रकारे याबाबतच अंधूकस चित्र तज्ञ मंडळी मांडतांना दिसतात.तर काहीजण नेमक काय कसं बदलेल याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत आहोत असेच दाखवतात.परंतु सामाजिक धोरणनिश्चिती या विषयान्वये एखाद्या विकसनशील देशातील सामाजिक व आर्थिक व्य्यवस्था बदलावयाची असेल तर,प्रथम येथील लहान मोठे कायदे बदला म्हणजे लोकांची मानसिकता  बदलावयास वेळ लागत नाही शिवाय व्यवस्था बदलीकरण सोपे जाते.जनमानसात आरुढ  असलेली राजकिय प्रतिके, स्मूतिचिन्हे बदला  म्हणजे व्यवस्था बदलणे  आणखी सोपे  जाते हा प्रकार सध्या आमच्याकडे मोठ्या जोशात  सध्या चालू आहेत. तंत्रज्ञानाच्यादूष्टीने त्या देशात ज्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले  लहान मोठे  सुक्ष्म स्वरुपातले लघुउद्योग आहेत  त्यात नव्या तंत्रज्ञानापैकी लोकांच्या जीवनमानावर प्रभाव टाकणाऱ्या व गरजेच्या तंत्रज्ञानात बदलांची सुरुवात पहिली  करा अर्थातच या तंत्रज्ञावर आधारित असणारे उद्योग व त्यावर अवलंबून असणारे कामगार यांस विरोध  याला करतात हा ही प्रकार आज आमच्याकडे आज चालू आहे . नवीन रोजगार निर्माण होणार त्यात मानव कि यंत्रमानव काम करेल आदी प्रश्न आजच्या कामगारांना पडतात . आपण नोकरी करुन चार पैसे कमावतो ,उद्या आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील का ? ही चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज दिसते.
कामगार संघटनांची धोरणे आजपर्यंत कामगारांना आस्थापनांशी झगडून  हक्क मिळवून देणे इथपर्यंत होती .बदलत्या काळात कामगारांना वेतनवाढीबरोबरच जीवनमान बदलणे ,कामगारानां सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे यासारखे उपक्रम कामगार संघटनांनी राबवले, तसेच कामगार शिक्षणाबरोबरच कामगारांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी  विविध विषयातील तंत्रशिक्षणावर भर देण्यास त्यायोगे त्या त्या क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी संघटना पातळीवर रोजगार केंद्र ही सुरु केली आहेत  ही चांगली गोष्ट जरी असली तरी कामगार संघटनांतील अंतर्गत राजकिय हेवेदावे , शक्तीप्रदर्शन, गटातटात विभागलेले प्रतिनिधी ,यामुळे बऱ्याच संघटना अंतर्गत एकीचबळ दिसत नाही. आक़ास्ताळेपणा आगाऊपणा जास्त दिसण्यात येतो. यामुळे कामगार चळवळीचा पाया डळमळीत होतोय.९० च्या दशकात कामगार संघटना काढून पोट भरण्याचा धंदा बऱ्यापैकी चालला. यावर सरकारने कायद्याचा अंकूश आणल्यामळे ही दुकानदारी बरीचशी बंद झालेली दिसते. परंतु या दुकानांचा आपला राजकीय व आर्थिक स्वार्थ  साधण्यासाठी अनेकांनी उपयोग करवून घेतला विशेष म्हणजे १९९१ सालु आपल्या देशात जागतिकीकरणाची व्यवस्था सुरु झाली याव्यवस्थेतले फायदे  झटपट उचलण्यासाठी अनेक राजकिय नेत्यांनी व उद्योजकांनी  मोठ्या खुशलतेने उचलला. पण यामुळेकामगार चळवळीची अपरिमित हानी झाली ,चळवळ सामान्य कामगाराच्या मनातून उतरली  नव्या औद्योगिक क़ांन्तीत यागोष्टीचा विचार कामगार संघटनाना करावा लागणार आहे.
येणाऱ्या काळात रोजगार टिकवण्यासाठी काळाची गरज ओळखून कामगारांचे स्वयंसहाय्यता गट,बचत गट तयार करवून रोजगार टिकवावा लागणार आहे.
आल्बर्ट आइस्टाइन या शा्स्त्रज्ञाने म्हटलेल आहे  संगणक हा  वेगवान अचूक काम करणारा  तितकाच मुर्ख आहे,पण मानव कमी वेगवान चूका करणारा पण सर्जनशील  आहे. यादोघांचा वापर सुनियोजित पध्दतीने  झाला तर विश्वाच कल्याण होईल. अगदी महात्मा गांधीनी देखील कामगार संघटना हा विचार आहे ,विचारात रोज नवे प्रयोग झाले पाहिजे  कामगार,चळवळ, आस्थापना  व देश यांच भल होईल येणाऱ्या काळात या दोन महापुरुषांच्या या विचारातून बोध घेतल्यास  कामगार चळवळ सक्षम करता येईल,पुढे नेता येईल.


मिलिंद आरोलकर .

Sunday, 23 December 2018

तुरुंगातही " सुविधा शुल्क "

तुरुंगात कुणाला विशेष अधिकार आहे का ? तिहार कारागृहाबाबत एका वर्तमानपतत्रात  प्रसिद्ध झालेल्या वूत्तांताचा उल्लेख करून न्या.मदन  लोकूर यांनी गंभीर आक्षेप नोंदविले .कारागृहात काहीजण सोफा,टी.व्हीचा आनंद घेतात यावर सरकारचे काय उत्तर आहे, असा प्रश्न उपस्थित केला . " आम्ही केंद्र सरकार आहोत आणि हा राज्यांचा विषय आहे, असेच उत्तर  याप्रश्नाला देणार का," याप्रश्नातून न्या.मदन लोकूर यांची उव्दिग्नता दिसून  येते. त्यानंतर अतिरिक्त महाभियोक्ता  अमन लेखी यांनी हा विषय तातडीने लक्ष घालण्याजोगा हा विषय आहे, हे मान्य केले आणि पुढील सुनावणीवेळी सरकार यावर उत्तर देईल असेही सांगितले तिहार कारागृहातील परिस्थितीबाबत वूत्तपत्रात जो वूत्तात प्रसिद्ध झालाहोता, त्यात म्हटले होतेकी, युनिटेकचे प्रमोटर संजय चंद्र  त्यांच्या भावाला सोफा,टी.व्ही आदी पुरविण्या आले आहे.त्याचबरोबर दुसरीकडे तुरुंगात असलेल्या असंख्य कैद्यांची दुर्दशा झाली आहे. याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.कैद्यांना राहण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येत नाही. वर्षानुवर्षे तुरुंगाची साधी रंगरंगोटीही केली जात नाही.स्वच्छछतागूहे  आणि मलनिःसरण यंत्रणेची सफाई ही केली जात नाही. महिला कैदी व त्यांच्या मुलांना राहण्याच्या योग्य सुविधा तुरुंगात नाहीत, याचीही न्यायालयाने दखल घेतली. व्हीआयपी कैद्यांना मात्र ज्या सुविधा दिल्या जातात,ते ऐकून न्यायाधिशही सुन्न झाले.कायद्याने ज्या वस्तू तुरुंगात प्रतिबंधित आहेत , त्या कैद्यांना सहजासहजी उपलब्ध होतात कशा ?  उंच भिंती आणि लोखंडी दरवाजे असताना या वस्तू तुरुगांत पोहचतातच कशा ?  अशा शब्दांत न्यायमूर्तीतीनी कारागृह प्रशासनाचे वाभाडे काढले .अर्थात सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली माहिती केवळ तिहार तुरुगांतील परिस्थितीची आहे . देशभरातील  अनेक कारागृहांमध्ये अशीच परिस्थिती आहे. " सुविधा शुल्क " दिल्यावर तुरुगांचा दरवाजाही खुल्या दिलाने व्हीआयपी कैद्यांचे स्वागत करतो आणि घरासारखेच सुख  तुरुंगातही मिळते , हे उघड गुपित आहे.धनाढ्य व्यक्तींंना ते तुरुंगात आहेत कि बाहेर ,यामुळे काहीच फरक पडत नाही. ते जिथे असतील ,तिथे पैशाच्या जोरावर सुविधा मिळवतात.बिहार च्या शहाबुद्दीनचा तुरुंगात दरबार भरत असे. लाचखोरीवर पोसलेली ही व्यवस्था देशातील कायद्यांना ही जुमानत नाही. या अहवालात तुरु्ंग प्रशासनावर कारवाई करण्याबाबतचे भाष्य केले आहे.अर्थातच,हीच सुधारणेची योग्य वेळ असू शकते. अर्थात , एखाद्या विशिष्ट तुरुंगापुरती ही कारवाई सिमित राहता कामा नये. देशातील सर्वच  तुरुंगात निरीक्षणाची एक यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे.याच वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने या त्रिसदस्यीय समिती नियुक्ती करण्याचे निर्देश  दिले होते.तुरुगांतील कैद्यांची गर्दी कमी करणे किंवा खुल्या तुरुगांच्या पर्यायावर विचार करणे हे या समितीचे प्रमुख कार्य मानले गेले झालेली विषमता तसेच कायद्याशी खेळण्याची प्रवूत्ती या बाबीही गांभिर्याने घेण्याची वेळ आली आहे.


मिलिंद आरोलकर

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...