Saturday, 1 May 2021

संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता.


संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता .

"जुहू".

मुंबईमधली स्वप्ननगरी.

पर्यटकांनी भरलेला जुहू बीच आणि डोक्यावरून टोपी खाली पडेल अशा उंच उंच इमारती. इथल्या भेळपुरीपासून ते अमिताभ बच्चनच्या घरापर्यंतच्या अनेक कथा दंतकथा आपण ऐकलेल्या असतात. इथल्या शांत निवांत गल्ल्यांमध्ये मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणारे अतिउच्चभ्रू सेलिब्रिटी श्रीमंत लोक राहतात.

पण त्यांना काय ठाऊक या सेलिब्रिटीच्या जुहूचा मालक एक माणूस होता. नाव *रघुनाथराव राणे.*

जुहूचा इतिहास पहायचा झाला तर कमीत कमी हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. 

बिम्बाख्यान नावाच्या बखरी नुसार ११३८ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजाने महिकावती (आजचे *केळवे माहीम*) हा भाग जिंकून घेतला. त्याने आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशीला *वाळकेश्वर* येथे पाठवल आणि या नव्या भागाचा सर्व्हे करायला सांगितला.

या बाळकृष्ण सोमवंशीने *केळवे माहीम, ठाणे, मढ, जुहू, वेसावे(व्ह्र्सोवा),* *वहिनाळे* आणि अखेर *वाळकेश्वर* या भागात तो फिरला. 
हाच जुहूचा पहिला उल्लेख. 

*अगदी शंभर वर्षापूर्वी पर्यंत जुहू हे एक बेट होतं.* अल्लाउद्दिन खिलजीकडून पराभूत झालेला सोरठचा मुरारराज या भागात आला. त्याच्या मुलाने बलदेवराजने बिंबराजाचे राज्य मुंबई भागात प्रस्थापित केले.

*१३०० च्या शतकात बलदेवराजचा मुलगा म्हणजे हैबतराव राणे.* 

*वांद्र्याच्या रन्वार खेड्यात तो राहू लागला. येथेच त्याने माहेश्वरी देवीच मंदिर बांधलं. याच हैबतरावाचे वंशज लक्ष्मणराव जुहूला वसले.*

पुढे दिल्लीच्या सुलतानीच्या काळात लक्ष्मणराव राणेंना जुहू गावाची पाटीलकी मिळाली. त्यांचा वार्षिक पगार होता ५० रुपये.

पुढे मुंबई प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य आले. त्यांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली मात्र उत्तरेतील भाग मात्र स्वतःच्या हाती ठेवला. त्यांनी जुहूला जुवेम नाव दिले होते. तेथे भंडारी, मीठ व्यापारी शेती करणाऱ्यांच्या छोट्या वसाहती होत्या. जुहूचे रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. पोर्तुगीजांनी येथे १८५३ साली चर्च ऑफ सेंट जोसेफ हे चर्च बांधले.

अस म्हणतात की या राणेंच्या पैकी कोणी तरी पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा आरमाराला मदत केली होती. पुन्हा तसे होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आणि हे सुनिश्चित केले की राणे कुटुंब जुहूमध्ये राहील.

पण तरीही जेव्हा १७३७ साली पोर्तुगीज आणि मराठा युद्ध सुरु झाले तेव्हा राणेनी मराठ्यांची बाजू घेतली.
पुढच्या दोनच वर्षात चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांचा पराभव केला आणि साळशेत, ठाणेचा परिसर पेशव्यांच्या अधिपत्या खाली आला.
*त्यांनी राणेंना जुहूची सनद आणि तिथे नारळाची लागवड करण्याची परवानगी दिली.*

पुढे हा भाग मराठ्यांच्या कडून इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र त्यांनी देखील राणेंच जुहूंवरचे हक्क मान्य केले.

याच राणेंचे वंशज रघुनाथराव पुतळाजी राणे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे हेड सर्व्हेअर म्हणून काम पहात होते. 

१८६८ साली जुहूमधील जुन्या मुक्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना त्यांना मध्ययुगीन पुरावे सापडले.

काही वर्षांनी जेव्हा त्यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस ब्रम्हकुंड नावाच्या बंधिस्त कुंडाची निर्मिती करण्यासाठी खड्डा काढला तेव्हा त्यात त्यांना *गजलक्ष्मीची मूर्ती* सापडली.
हिलाच आज *शितलादेवी* म्हणून पूजले जाते व जुहू बीच जवळ मिळालेल्या मूर्तीला जुहूची ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. जुहूमध्ये उत्खनन करत असताना एक हाडांचा सांगाडा सापडला ज्याच्या तोंडात एक सोन्याच नाणं होतं ज्यावर देवनागरी मध्ये *‘रा’* असे कोरलेले आढळले. अशा अनेक गोष्टी राणे कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.

रघुनाथ राव राणेंचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार कृष्णराव राणेंनी या ऐतिहासिक पुराव्यांचे म्युजियम मध्ये रुपांतर केलं. पण १९५५ साली आलेल्या चक्रीवादळात या म्युजियमच प्रचंड नुकसान झाल व ते आता बंद आहे. 

*मात्र आजही इस्कॉन टेम्पल समोरच्या राणे बंगल्यात यातील अनेक वस्तू आपल्याला पाहता येऊ शकतात.*

आज गगनचुंबी इमारतींचे जंगल बनलेल जुहू १०० वर्षापूर्वी पर्यंत एका छोट्याशा बेटावरील खेड होतं.

जमशेदजी टाटानी १८९० च्या दशकात येथे जमीन खरेदी केली आणि तिथे एक बंगला बांधला. पुढे इथे १२०० एकर जमीन घेऊन तिथे रिसोर्ट बांधायचा त्यांचा प्लॅन होता. कालव्यांनी जोडून जुहू बेटाचं व्हेनिसमध्ये रुपांतर करायचं टाटांच स्वप्न होतं. पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्युनंतर ही योजना मागे पडली.

१९१९ साली जुहूमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी सांताक्रूझ जुहू रस्ता बनवला आणि या भागाला मुंबईशी जोडून टाकले. याच जुहूमध्ये भारतातील पहिले विमानतळ सुरु झाले. मिठाचा सत्याग्रह व इतर आंदोलनातून जुहूनेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. गांधीजींचे इथे बरेच काळ वांस्तव्य देखील होते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे अनेक धनिकांनी, फिल्मस्टारनी जागा घेतली. भारतातील सर्वात महागडे दराच्या जमिनीमध्ये वरच स्थान जुहूने पटकावल. मात्र याच बरोबर इथला स्थानिक कोळी हळूहळू आपल्याच हक्काच्या घरातून हद्दपार होत गेला.


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 28 April 2021

गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर




गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर

महाराष्ट्रातील शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेले कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदि‍र आणि आश्रम परिसर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदि‍र आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही. 

बेट कोपरगांव ) हे ब्रम्हदेव पुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र  
व दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्‍थान असून त्‍यांनी तप व वास्‍तव्‍य केलेला हा परिसर आहे. त्‍यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्‍त्‍व प्राप्‍त झाले असून त्‍याची आख्यायिका अशी आहे. 
समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्‍यामुळे देवांना अमरत्‍व प्राप्‍त झाले. त्‍यामुळे दैत्‍य कुळांचा नाश हा निश्‍चित झाला. तो होऊ नये व दैत्‍य कुळ पुढेही चालू रहावे त्‍यासाठी दैत्‍यांनाही अमरत्‍व प्राप्‍तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्‍याने दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्‍चर्या करुन गायत्री व महामृत्‍यूंजया पासून तयार झालेला " संजीवनी " मंत्र की , ज्‍या योगे मृत झालेली व्‍यक्‍ती पुन्‍हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्‍त करुन घेतला व त्‍या मंत्राच्‍या आधारे ते मृत झालेल्‍या दैत्‍यांना पुन्‍हा जिवंत करुन देवांविरुध्‍द युध्‍दासाठी संजीवन करत असत. त्‍यामुळे दैत्‍यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्‍तच झाले. त्‍यासाठी देवांनी बृहस्‍पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्‍पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्‍य पुन्‍हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्‍हणून सर्व देव व बृहस्‍पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्‍तगत करण्‍यासाठी बृहस्‍पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्‍यास गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्‍तीसाठी आला ते हे स्‍थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्‍थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्‍या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्‍थान गोदावरीच्‍या पैलतीरावर होते. ते स्‍थान कचेश्‍वर मंदीर म्‍हणून प्रसिध्‍द असून ते शुक्‍लेश्‍वर मंदीराच्‍या उत्‍तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्‍वर यांचे एकत्रित पिंडीच्‍या स्‍वरुपात स्‍थापित आहे. गोदावरीच्‍या ऐलतीरावर गुरुचे स्‍थान व पैलतीरावर शिष्‍याचे स्‍थान आहे. पूर्वीच्‍या नदीवरील घाट व त्‍याच्‍या खुणा अजूनही मंदीराच्‍या समोरील श्री विष्‍णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्‍याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडून कच व देवयानी यांना हा " संजीवनी " मंत्र मिळविल्‍याचे संजीवनी पाराचे स्‍थान असून त्‍यात मंत्र मिळाल्‍यानंतर स्‍वर्गातील देवगण कचेश्‍वरावर पुष्‍पवृष्‍टी करण्‍यासाठी आले. त्‍यामुळे इतर देवांच्‍याही पिंडीच्‍या स्‍वरुपात प्रतिकात्‍मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्‍थान अत्‍यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्‍तांची धारणा आहे. 

गुरुची सेवा करण्‍यासाठी सर्व शिष्‍य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्‍हणजे हल्‍लीच्‍या शुक्‍लेश्‍वर मंदीराचे स्‍थानावर नित्‍यनियमाने येत असत. या शिष्‍यांना नदीच्‍या विशाल पात्रातून येण्‍या -जाण्‍याचा त्रास होऊ नये म्‍हणून शुक्राचार्यांनी आपल्‍या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्‍या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्‍यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्‍याची आख्‍यायिका आहे. 

सर्व शिष्‍यांमध्‍ये कच हा अत्‍यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्‍यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्‍यांमध्‍ये गुरुचा लाडका शिष्‍य होता. ही गोष्‍ट इतर दानवांना सहन होत नसे. त्‍यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्‍टी होती. द्वेषापोटी त्‍यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्‍या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्‍यामुळे तिने कचास दोन्‍ही वेळा वडि‍लांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परि‍णामी सर्व दैत्‍य संतापले व त्‍यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्‍याचे ठरविले. पुन्‍हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्‍यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्‍यांचे गुरु असल्‍यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्‍याचा गैरफायदा घेवून दैत्‍यांनी डाव साधला. कच दिसेना म्‍हणून देवयानीने आपल्‍या वडिलांकडे कचासाठी पुन्‍हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्‍यानंतर त्‍यांच्‍या असे लक्षात आले की कच हा आपल्‍याच पोटात आहे. ही गोष्‍ट त्‍यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्‍या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्‍याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्‍यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्‍यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्‍यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्‍या योगे मी तो मंत्र म्‍हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्‍या हट्टाने व मद्य व्‍यसनामुळे जी गोष्‍ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्‍या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्‍या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्‍हा त्‍यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदि‍रासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्‍यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्‍लक न राहि‍ल्‍यामुळे दैत्‍यांना पुन्‍हा-पुन्‍हा जिवंत करण्‍याची शक्‍ती शुक्राचार्यांमध्‍ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्‍य झाल्‍यामुळे मूळ देवलोकी जाण्‍यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्‍यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्‍यामुळे तिने त्‍यास लग्‍नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडि‍लाच्‍या उदरातून बाहेर आल्‍यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्‍यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्‍टीचा राग येवून वअपेक्षाभंगाच्‍या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्‍त करुन चाललास त्‍या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकूल आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे यावर क्रोधीत होऊन कचदेव हि देवयानीस शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल. अशारितीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावतो व कचदेव हे देवलोकी निघून जातात. 

पुढे ही शापवाणी खरी ठरुन शुक्राचार्य ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील " ययाती " राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे. 
कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते. एकदा वनविहारास गेली असताना असूर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानी एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते. आपला जीव वाचविण्यासाठी धावा करित असताना तेथे शिकारीसाठी आलेले महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती' आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवितात. हात हातात घेतल्याने त्यांच्यावर 'पाणीग्रहण संस्कार' होतात. (पाणिग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीया कुठल्याही परपुरुषांच्या हातात आपला हात देत नसत. जर चुकूनहि हात हातात घेतला गेला तरि त्यांचे 'पाणिग्रहण संस्कार' झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे.) पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हिस क्षत्रिय राजा ययाती यांच्या बरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते. पाणीग्रहण झाले त्यावेळी ग्रह, नक्षत्र अनुकूल नव्हते व सिंहस्थ काळ असल्यामुळे कुठलाहि शुभमुहूर्त निघत नव्हता. म्हणून गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातीरी 'विवाह सिद्ध होम' करुन आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करुन ग्रह नक्षत्र अनुकूल करुन घेतले व या पावन भूमीस असे वरदान दिले की, यापुढे केव्हाही या भूमीत कोणतेही पवित्र कार्य (विवाह, इत्यादी शुभकार्य) करण्यास कुठलाही मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वेळ व सिंहस्थकाळ पहावा लागणार नाही व येथे केलेले शुभकार्य हे विशेष यशस्वी होतील.

हि कथा हजारो-हजारो वर्षापूर्वी घडलेली असून गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या तपाने पावन झालेली हल्लीची बेट कोपरगांव पावन भूमी आहे. अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज व परम शिष्य कचदेव यांच्या कोटीकोटी आशिर्वादास प्राप्त व्हावे. 

महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती यांचेशी विवाहबद्ध झाली त्यांच्या पुढील झालेल्या यदु वंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती आणि त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य, पांडव, कौरव यांचा जन्म झालेला आहे. 

आजही शुक्राचार्यांचे हे स्‍थान त्‍यांच्‍या तपोबलाने पुनीत झाल्‍यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्‍यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्‍हाही विवाह होतात.  

या सर्व गोष्‍टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्‍या ओव-या पूर्वी येथे असलेल्‍या पेशव्‍यांच्‍या वाडयाच्‍या अवशेषातून बांधलेल्‍या आहेत. तसेच समोर श्री विष्‍णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्‍णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्‍या पायथ्‍याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्‍याच्‍या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्‍ही मंदि‍राच्‍या मध्‍यात " संजीवनी पार " म्‍हणजे येथे कचास " संजीवनी " विद्या प्राप्‍त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्‍याचे हे स्‍थान असून याचे उत्‍तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्‍य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्‍वर मंदिर) असून त्‍या स्‍थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्‍वर) गुप्‍त रुपाने तेथे आल्‍यामुळे त्‍यांचेही श्री त्रिंबकेश्‍वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्‍त रुपाने आल्‍यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्‍थापना झालेली नाही. कचेश्‍वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्‍याचा रिवाज आहे. 

( लेखक वि.स .खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मुळ शुक्राचार्य ,कच आणि देवयानी यांच्या जीवनावर आधारित असून कोपरगाव येथे गुरु शुक्राचार्य मंदिर परीसरात या सर्व घडलेल्या प्राचीन घटनास्थळ आजही अस्तित्व दाखवत आहे. )


मिलिंद आरोलकर -

Saturday, 10 April 2021

10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन





भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे. ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वताचे पासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण 37 वर्षात पूर्ण झाले.सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी मराठयांकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एलन्फिस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला.
40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त
ई-मोजणी, ई-फेरफार,
ई-चावडी,ई-अभिलेख,
ई-अभिलेख, ई-नकाशा,
ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई-भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 4 November 2020

कराचीला जुळी मुंबई का म्हटले जात असे.


कराचीला “जुळी मुंबई” म्हटलं जायचं, ती मराठी माणसाची होती हे तुम्हाला माहिती आहे का? मग वाचा हा लेख…

कराचीला “जुळी मुंबई” म्हणलं जायचं

ब्रिटिशांच्या काळात १९३६ साल पर्यंत कराची हे मुंबई प्रांतात होतं. मुंबईचा गव्हर्नरची सत्ता थेट कराची पर्यंत चालायची.
कराचीला “जुळी मुंबई” म्हणून ओळखलं जायचं. तशी एकार्थी लोक वस्ती हिंदू बहुसंख्य होती. मराठी कुटुंब तर अनेक होती.
आजही मुंबईत अनेक कुटुंबे आपले आजोबा-पणजोबा कराचीला सरकारी नोकरीत होते, फाळणीच्या वेळी आपले वडील कराचीहून आले असं सांगणारे आढळतात.
काही कराचीकरांनी तर मुंबईत एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था ही बांधल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव गावचे एक नाईक कुटुंब पिढ्यानपिढ्या कराचीला स्थायिक झाले आहे.
त्यापैकी कराचीच्या एका हॉटेलात कर्मचारी असलेल्या नाईकांची मुलाखत काही वर्षांपूर्वी वाचनात आली होती.

सिंध प्रांताची फाळणी

सुमारे १९३६ साली सिंध प्रांत हा मुंबई इलाखा पासून वेगळा करण्यात आला एका अर्थी तेव्हाच फाळणीची बीजं रोवली गेली होती. लोकसंख्येचे गुणोत्तर यानंतर वेगाने बदलत गेले.
आपल्याच कुटुंबात, जातीत, जमातीत, व्यापारात, धनदौलतीत रमलेल्या हिंदू समाजाला आपल्या इस्टेटी बाहेर सिंध प्रांतात मुस्लिम बहुसंख्य कधी झाले हे कळतच नाही.
त्यामुळे फाळणीच्या वेळी सगळ्यात कमी संघर्ष सिंध प्रांतात झाला,
नेसत्या वस्त्रानिशी  भारतात पलायन करण्यावाचून हिंदू समाजाला पर्यायच नव्हता कारण लोकसंख्येच्या अनुपाता प्रमाणे हिंदू समाजात संघर्षाचं त्राणच उरलं नव्हतं. असो.
पाकिस्तानातल्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शहा यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी कराचीतल्या आपल्या शाळेला भेट दिली.
शाळेच्या जुन्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. शाळेचे नाव आहे NJV हायस्कूल.

NJV… आद्याक्षरांवरून आपल्याला शाळेच्या नावाचा पूर्ण उलगडा होत नाही.

NJV म्हणजे नारायण जगन्नाथ वैद्य. शाळेचे पूर्ण नाव घ्यायला
गेलं तर ते आहे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल.

आश्चर्याचा धक्का बसला ना?

नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूलचा इतिहास

ही शाळा सिंध प्रांतातील पहिली सरकारी शाळा आहे. १८५५ साली ६८ मुलांना घेऊन हि सिंधी माध्यमातली शाळा सरकारतर्फे सुरू करण्यात आली होती.

त्यावेळी नारायण जगन्नाथ वैद्य हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील उच्चविद्याविभूषित गृहस्थ सिंधचे शिक्षण उपनिरीक्षक होते.

पुढे १८७६ साली शाळेचे स्थलांतर करण्यात आले व नारायण जगन्नाथ वैद्य यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

१९१६ साली शाळेत ४७७ विद्यार्थी शिकत होते पैकी फक्त १२ विद्यार्थी मुसलमान होते. शिवाय पारशी व यहुदी विद्यार्थीही शाळेत शिक्षण घेत होते.

१९३३ साली कराची महानगर पालिकेचे पहिले महापौर, पारशी समाजाचे जमशेदजी मेहता हे याच शाळेचे विद्यार्थी होते.

सिंध विधानसभेचे अधिवेशन भरण्याचा मानही या शाळेच्या वास्तूला मिळालेला आहे.

कराचीच्या शाळेत हिंदू मुख्याध्यापक


१९१० साली २५० विद्यार्थी शिकत असलेल्या या हायस्कूलला राज्य सरकार कडून ४०२० रुपयाचे अनुदान मिळत होते.

उच्चविद्याविभूषित व शिक्षण तज्ञ असलेल्या नारायण जगन्नाथ वैद्य यांनी सिंध भागात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

शाळेच्या सुरुवातीच्या काळात सातत्याने मराठी भाषिक मुख्याध्यापक तर १९४० पर्यंत हिंदू मुख्याध्यापक शाळेला लाभले होते.

मात्र त्यानंतर सामाजिक परिस्थिती बदलली ती आजतागायत.

हजारो विद्यार्थ्यांना आज शिक्षण देणारी ही शाळा पाकिस्तानच्या मानबिंदू पैकी एक आहे.

या शाळेची इमारत जागतिक वारसा अर्थात हेरीटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट केलेली आहे.

मुंबईतील सोन्याचांदीचे प्रथितयश व्यापारी पोपली यांच्यापासून चंदू पंजाबी हलवाई कराचीवाला यांच्यापर्यंत लक्षावधींच्या संख्येने फाळणीच्या वेळी सिंधी बांधव हिंदुस्थानात मुसलमानांच्या अत्याचारामुळे स्थलांतरित झाले.

फाळणीच्या जखमा काळाने भरल्या गेल्या परंतु व्रण मात्र कायम आहेत.

सिंध प्रांतातल्या शैक्षणिक क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटवणारे शिक्षण तज्ञ जगन्नाथ नारायण वैद्य यांचे कर्तृत्व मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला काहीही करून मिटवता आले नाही

मिलिंद आरोलकर --

Monday, 26 October 2020

बंगाल मधील दुर्गापूजेचा प्लासीच्या लढाईशी सबंध...

दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!


गणेशोत्सव असावा तर महाराष्ट्रासारखा आणि नवरात्रोत्सव असावा तर पश्चिम बंगालरखा. कालपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे. भारतात कुठेही होत नसेल एवढ्या धामधुमीत बंगालमध्ये नवरात्र साजरं केलं जातं. पण कधी विचार केलाय का की पश्चिम बंगालमध्येच दुर्गापूजा इतकी प्रसिद्ध का आहे ? या मागचं कारण काय असेल ?मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारताच्या इतिहासातील एका निर्णायक लढाईत आहे. चला तर नवरात्रीच्या निमित्ताने हा इतिहास जाणून घेऊया.मंडळी, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक महत्त्वाचं युद्ध म्हणजे बंगालमधली ‘प्लासीची लढाई’. या लढाईने बंगाल प्रांत संपूर्णपणे इंग्रजांच्या घशात घातला. असं म्हणतात, प्लासीच्या लढाईने भारतावर इंग्रजांचं राज्य यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो काळ होता १७५७ चा.प्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्यावतीने लढलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यानं या विजयाचं श्रेय ‘गॉड’ला दिलं. पण त्यांचे खास (आणि भारताचे ‘गद्दार’) ‘नबकृष्ण डेब’ यांनी एक वेगळाच तर्क काढला. ते म्हणाले नवाबाने प्लासी भागातलं चर्च उध्वस्त केल्याने तुम्ही माझ्या घरी येऊन दुर्गेची पूजा करा व तिचेच या विजयाबद्दल आभार माना. तेव्हा नबकृष्ण यांनी नुकताच  ‘शोभाबाझार राजबाडी’ (राजवाडी) नावाचा बंगला काय, चक्क महालच बांधला होता आणि  या महालात बंगालवर ब्रिटिश हुकूमत आल्याच्या आनंदातून त्यांनी दुर्गापूजेचं भव्य आयोजन केलं होतं. या पूजेला रॉबर्ट क्लाईव्ह यांना बोलावण्यात आलं. पूजा उरकली गेली. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी देवीचे आभारही मानले. पुढे इंग्रजांशी जवळचा संबंध असल्याने या पूजेला ‘कंपनी पूजा’ हे नाव पडलं.असं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.असं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.मंडळी, ही झाली दंतकथा. खरं तर प्लासीच्या लढाईच्या अगोदरपासून बंगालमध्ये दुर्गापूजा होत आली आहे, मग प्लासीच्या लढाईनंतर असं काय बदललं की दुर्गा पूजेला एवढं महत्व आलं ?त्याचं झालं असं की, प्लासीच्या लढाईने जमीनदारीला चांगले दिवस आले. या जमीनदारांचा ब्रिटिश हुकुमतीत मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार जमीनदारांच्या बाजूने असल्याने जमीनदार गब्बर झाले. त्यांनी आपल्याकडच्या मालमत्तेला शोभेल असं दुर्गा पूजेचं डोळे दिपवणारं आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या महालांना १० दिवसांसाठी राजवाड्याचं रूप यायचं. या प्रकारे जमीनदार आपल्या मालमत्तेचं आणि सत्तेचं प्रदर्शन भरवायचे.बारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.बारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.मंडळी, दुर्गापूजेला धनिकांच्या घरातून सर्वसामान्य जनतेत आणण्यात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. ही संकल्पना बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. आज बंगालमध्ये जे भव्य ‘पंडाल’ पाहायला मिळतात त्याची पाळेमुळे ‘बाघबाझार’ पूजेत आहेत.

मिलिंद आरोलकर --

Friday, 23 October 2020

मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज

BSE आणि राजाबाई टॉवर वसवणारा 'प्रेमचंद रायचंद' होता मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज!!


मंडळी, शेअरबाजार घोटाळा म्हटलं की बहुतेकांना पहिलं नाव आठवतं हर्षद मेहताचं!! सर्व सामान्य माणसांपर्यंत शेअर बाजार पोहचला तो हर्षद मेहेतामुळेच. त्याआधी हा बाजार काही मोजक्या सामाजिक वर्तुळापुरताच मर्यादित होता. जी काही अफरातफर व्हायची ती या वर्तुळाच्या परिघाच्या आतच व्हायची. हर्षद मेहताने हा परिघ राष्ट्रीय पातळीवर नेला आणि त्यामुळे घोटाळा म्हटलं की त्याचंच नाव पहिल्यांदा आठवतं. पण मंडळी, आज आम्ही तुम्हाला तब्बल दिडशे वर्षं जुनी अशी मुंबई शेअर बाजाराच्या एका 'आद्य 'घोटाळेबाजाची कथा सांगणार आहोत. "इतकी जुनी कथा ऐकण्यात काय मजा आहे आहे?" असं तुम्ही म्हणालही. पण गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आता वाचू या मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

(प्रेमचंद रायचंद)
या कथेला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती शेअरबाजाराबद्दल जाणून घ्या. या बाजारात नफा नुकसान ज्या पद्धतीने होते त्याला ' झिरो सम गेम असे म्हणतात. याचा अर्थ असा की एकाने गमावल्याखेरीज दुसर्‍याचा फायदा होत नाही. थोडक्यात नफा आणि नुकसान यांची बेरीज केली तर उत्तर शून्यच येईल. दुसरे असे की, प्रत्येक अफरातफरीत कमीतकमी एका बँकेचा तरी बळी जातोच. हर्षद मेहतामुळे कराड बँक गेली, केतन पारेखमुळे माधवपुरा बँक आणि ग्लोबल ट्रस्ट या दोन बँका बुडल्या, तर ज्या प्रेमचंद रायचंदबद्दल आपण वाचणार आहोत, त्यांच्यामुळे बाँबे बँक बुडली. आता वळू या मुख्य कथेकडे !
प्रेमचंद रायचंद हा रायचंद दिपचंद या श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा होता. त्याची आणखी ओळख म्हणजे बाँबे स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला तेव्हा नेटीव्ह स्टॉक एक्सचेंज म्हणायचे त्याच्या स्थापनेत हातभार लावला आणि आपल्या आईचं- राजाबाईचं नांव मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला दिलं जावं म्हणून एकूण ५,५०,००० खर्चापैकी २ लाख रुपयांची भरभक्कम देणगी दिली. जात्याच हुषार असलेल्या या मुलाने जर इंग्रजी शिक्षण घेतले तर व्यापारात फायदा होईल या विचाराने वडिलांनी त्याला एल्फिन्स्टन महाविद्यालयात घातले. अपेक्षेप्रमाणे प्रेमचंद रायचंद हा मुंबई शेअर बाजारातला अस्खलित इंग्रजीतून व्यवहार करणारा पहिला स्टॉकब्रोकर झाला. काही दिवसांतच एक नंबरचा "बुलियन ट्रेडर" (सोने चांदीचा व्यापारी) आणि कमोडीटी ट्रेडर (त्यावेळी मुख्यतः कापूस आणि अफू) असे नाव पण त्याने कमावले. आता या सगळ्याचा मूळ कथेशी काय संबंध आहे ते बघू या!!

हा कालखंड साधारण १८६२ ते १८६६ चा होता. या काळात ब्रिटिशांना भारतातून कापूस आणि चीनमधून चहा मोठ्या प्रमाणात लागायचा. चीनला त्या मोबदल्यात अफू आणि चांदी हवी असायची. मँचेस्टरच्या कापडगिरण्यांसाठी ब्रिटनला कापूस हवा असायचा. पण या व्यवहारात ब्रिटनमधली चांदी संपुष्टात यायला लागली. साहजिकच भारतात चांदीचे भाव भडकले. अमेरिकन यादवीमुळे कापसाचे भाव भडकले. या दोन्हीत तेजी आल्यावर त्यात सट्टा सुरु झाला. हा सट्टा प्रेमचंद रायचंदच्या हातात होता. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हुंडीवर चालायचे. प्रेमचंद रायचंदच्या पेढीची हुंडी म्हणजे शंभर ट्क्के विश्वासार्ह, अशी ख्याती असल्याने कोणताही व्यवहार प्रेमचंद रायचंदच्या मध्यस्थीशिवाय पार पाडायचा नाही. थोडक्यात, मार्केट कोणतेही असो, त्या मार्केटच्या नाड्या किंवा सूत्रे एकाच माणसाच्या म्हणजे प्रेमचंद रायचंदच्या हातातच असायची!! अतिशय हुशार, धूर्त आणि दानशूर अशा या माणसाला त्याच्या कॉटन मार्केटच्या आणि शेअर बाजारातील यशस्वी सट्टय़ांमुळे मुंबईचा सगळ्यात मोठा सटोडिया हा किताब मिळाला होता. या प्रेमचंद रायचंद माणसाची खासियत अशीही होती की त्यांने घेतलेले शेअर्स त्याच्या नावावर कधीच नसायचे. मुनीम, मेहता, कारकून यांच्या नावावर तो सगळी गुंतवणूक करत असे.

असा धूर्त, हुशार आणि कावेबाज माणूस नेहेमी एखाद्या 'वन्स इन लाइफ टाइम 'मोक्याच्या शोधात असतो आणि संधी प्रेमचंद रायचंदच्या आयुष्यात अब्राहम लिंकनमुळे आली!! १८६० साली अब्राहम लिंकनने अमेरिकेतली गुलामगिरीला संपवली आणि अमेरिकेत यादवी सुरु झाली. मँचेस्टरला येणारा कापूस बंद पडला. भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. न्यूयॉर्कच्या कापसाच्या भावावर सट्टा सुरु झाला. भारतात तर न्यूयॉर्क कॉटनवर आकडा लावण्याची साथच आली. लोक त्यांच्याकडे आहे नाही ते सगळं काही विकून सट्टा खेळायला लागले. खेळीया अर्थातच एकच होता- तो म्हणजे प्रेमचंद रायचंद!! या सट्ट्यात प्रेमचंद रायचंदने इतके पैसे कमावले की त्याने चक्क एक बँकच विकत घेतली. त्या बँकेचं नाव होतं बाँबे बँक. एकदा बँक हातात आल्यावर त्याला आकाश मो़कळे झाले आणि जन्माला आली बॅकबे रेक्लेमेशन कंपनी!

तर, त्याकाळात मुंबईत कापसाच्या सट्टय़ात लोकांनी लाखो रुपये कमवायला सुरुवात केली होती. तेव्हाच मुंबईत नव्या कंपन्यांचे पेव फुटले. त्या एका वर्षामध्ये एकूण सत्तेचाळीस कंपन्यांची नोंदणी झाली. बँका तेव्हा शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास कर्ज द्यायच्या नाहीत. प्रेमचंद रायचंदनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन या बाँबे बँकेला कर्ज दिले आणि हळूहळू बँक ताब्यात घेतली. यानंतर इतर बँकांनीही शेअर्समध्ये सट्टा करण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. सोबत स्वत:साठीही प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले. पेपरमधली जाहिरात पूर्ण न वाचताच शेकडो अर्ज कंपन्यांकडे पैशांसकट येऊन पडायचे. शेअर्सची अलॉटमेंट होण्याआधीच त्यात सौदे लिहायला सुरुवात व्हायची. त्यावरचे प्रीमियम जाहीर व्हायला लागले. सगळ्या कंपन्यांना एकच दलाल हवा असायचा- प्रेमचंद रायचंद. बऱ्याच वेळा कंपन्या सटोडियाला पैशाऐवजी आणखी शेअर्स द्यायच्या. सटोडियाचं आणखी फावायचं. 

(कॉटन बाजार)
या सगळ्या नवीन उदयाला येणाऱ्या कंपन्यांत अशीच एक नवी कंपनी आली. बॉम्बे लँड रेक्लेमेशन कंपनी. या कंपनीला बॅकबे कंपनी म्हणून पण ओळखलं जायचं. आता जिथे नरिमन पॉइंट आहे, ती सगळी जमीन भराव टाकून ताब्यात घेण्याचं काम ही कंपनी करणार होती. त्याच वेळी भायखळा माझगाव परिसरात आणखी एक कंपनी आली. माझगावच्या बाजूला असलेला समुद्र हटवून जमीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही कंपनी तयार झाली होती. प्रेमचंद रायचंद यांच्या हुशारीचा एक किस्सा सांगितल्याशिवाय ही कथा पुढे सांगणं कठीण आहे. माझगावच्या डेव्हलपिंग राइट्सची किंमत साधारण पाच लाख गृहित धरली गेली होती. प्रेमचंद रायचंदनी हे राइट्स चाळीस लाख रुपये देऊन सकाळी विकत घेतले आणि संध्याकाळी साठ लाखाला विकून टाकले. सहा तासांत वीस लाख रुपये, तेही १८६४ सालचे वीस लाख रुपये या माणसाने कमावले होते. 
तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते..

(प्रेमचंद रायचंदचा बंगला)
हळूहळू मुंबईला तेजीच्या ज्वरांनी पछाडलं. जे शेठ करेल, तेच मुनीम करायला लागला, मुनीम करेल तेच मेहता म्हणजे अकाऊंटंट करेल, मेहता करेल ते कारकून कारकून करेल ते ड्रायव्हर आणि माळी. मुंबई शेअर बाजार तापून लाल झाला. आधी बॅकबे कंपनीचे चारशे शेअर्स सरकार घेणार होते, पण तो इरादा ऐनवेळी सरकारने बदलला. मग त्या चारशे शेअर्सचा लिलाव करण्यात आला आणि मग दोन लाख रुपयांचे शेअर्स दहा कोटी पाच लाखाच्या बोलीस विकले गेले.
आणि एक दिवस अमेरिकेतलं युद्ध संपलं. कापसाच्या व्यापाराला मंदीचं ग्रहण लागलं. सटोडिये पैसे चुकवायला टाळाटाळ करायला लागले. दिवाळखोरीची लाट आली. शेअर बाजार तीन दिवस बंद ठेवला गेला. पण पैशाची तरतूद होईना. एकामागोमाग कंपन्या बंद पडायला लागल्या. बॅकबे कंपनीसकट सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली. एकेक करून सगळे ब्रोकर दिवाळखोर झाले. आपले कथानायक प्रेमचंद रायचंद यांची सगळी मालमत्ता विकल्यावर एकूण देण्याच्या फक्त दीड टक्के रक्कम वसूल झाली. अशा तऱ्हेने बाँबे बँकही बुडाली.

(बँक ऑफ बॉम्बे)
वाचकांना एक विनंती... प्रेमचंद रायचंद यांच्या वर लिहिलेल्या कथेत फक्त हर्षद मेहता हे नाव टाका, कथा तशीच्या तशीच आहे. केतन पारेखचं नाव टाकून बघा, कथा तशीच आहे. तशीच तेजी! तसंच वारं डोक्यात जाणं! तसाच अंत!! फरक एवढाच की, हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी फ्रॉड करताना एक पायरी पुढे जाऊन खोटी कागदपत्र वापरली. या सटोडियांमध्ये साम्य असं की त्यांना आपण कुणीतरी महान झाल्याचा साक्षात्कार झाला होता. प्रेमचंद रायचंदने बांधलेला मुंबईचा राजाबाई टॉवर आजही याची साक्ष देतो आहे.
हे फ्रॉडस् कसे आणि का घडतात?

(हर्षद मेहता, प्रेमचंद रायचंद आणि केतन पारेख)
तर, छोटे छोटे गुंतवणूकदार असेच अल्पकाळाची स्मरणशक्ती असलेले असतात. एक फ्रॉड संपला की दुसरा घडेपर्यंत सगळेजण सगळं काही विसरलेले असतात. याआधीचे सगळे घोटाळे झाले तेव्हा आपण ग्लोबल नव्हतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या आपल्या खाजगी होत्या. आता ग्लोबल झाल्यावर जागतिक समस्या पण आपल्याच समस्या आहेत किंवा आपल्या समस्या जागतिक आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपले आहेत.

मिलिंद आरोलकर --

Thursday, 3 September 2020

मुंबईच्या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा...!

म्हणून मुंबईच्या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा उभारण्यात आला - 

मुंबईच्या फोर्टमध्ये एक चर्च आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल ॲंग्लीयन नावाचं हे चर्च. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये संगमरवरी शिल्प आहे.

धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी असलेला ब्राम्हण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून उभा आहे. व ते वडाचे झाड शोक करत असल्याचं दिसून येत आहे. एका चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुर्णाकृती पुतळा असणारं हे जगातील एकमेव चर्च आहे.

साहजिक तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशामुळे आणि का..? 
चर्चमधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला जोनाथन डंकन नावाचा माणूस माहित हवा. जोनाथन डंकन हा मुंबईचा गव्हर्नर होता. इसवी सन १७९५ ते १८११ या काळात तो मुंबईचा गव्हर्नर राहिला.

मुंबईचा सर्वाधिक काळासाठी म्हणजे १६ वर्ष तो गव्हर्नर होता. १८११ साली त्याचा मृत्यू झाला, नाहीतर तो अजून काहीकाळ गव्हर्नर राहिला असता अस सांगितलं जातं. 

जोनाथन डंकन भारतात आला ते साल होतं १७७२. वयाच्या १६ व्या वर्षी तो भारतात आला आणि वयाच्या ५५ व्या वर्षी तो गेला. तो भारतात असतानाच गेला. इतक्या काळात तो इंग्लडला कधीच गेला नाही. १६ व्या वर्षी त्याने इंग्लड सोडलं ते कायमचं.

या काळात काय झालं तर १६ व्या कोलकत्त्याला आल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीत छोट्या पदावर काम करू लागला. १७८८ या आठ वर्षात तो हलक्या दर्जाचं काम करत राहिला त्यानंतरच्या काळात तो तत्कालीन व्हाईसरॉय कॉर्नव्हालिसच्या नजरेत आला. कार्नवालिसने त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बनारसचा रेसिडेन्ट केलं.

रेसिडेन्ट हा त्या भागाचा प्रमुख असायचा. त्याला तिथले कर गोळा करण्यापासून ते युद्ध करण्यापर्यन्तचे अधिकार असायचे. पण या माणसाने बनारसच्या विकासाचा अध्याय सुरू केला. 

त्याला समजलं की इथे असणाऱ्या राजकुमार जातीत स्त्रीभ्रूण हत्या करण्याची अमानवीय प्रथा आहे. त्या काळात या जमातीची लोकसंख्या ४००० च्या आसपास होती पण मुलींच प्रमाण नगण्य होतं. डंकनने कंबर कसली या प्रथेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर त्याला कळालं की, हुडांप्रथेमुळं स्त्रीभ्रूण हत्या करण्यात येते. तो या हत्या बंद करण्याच्या मागे लागला. त्यासाठी कायदा आणण्याची शिफारस त्याने कॉर्नवालिसला पत्र लिहलं.

बनारसला संस्कृत विद्यापीठ उभा करण्याची गोष्ट. 

डंकन या इंग्रज माणसाने बनारसमध्ये संस्कृत विद्यापीठ उभा केले. १७९१ मध्ये त्याने हा प्रस्ताव कॉर्नवालिसला दिला. त्याच्या संमतीनंतर संस्कृत विद्यापीठ बनारसमध्ये उभा करण्यात आले. या विद्यापीठातून वेद, वेदांत, पुराणे, आयुर्वेद, साहित्य, ज्योतिष्यशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय अशा विषयांबाबत शिक्षण देण्यास सुरवात करण्यात आली.

त्याच्या या योगदानाची साक्ष देणारा शिलालेख आजही बनारसच्या संस्कृत विद्यापीठात आहे.

त्याच्या कामावर खूष होवून त्याला मुंबईचे गव्हर्नर करण्यात आलं. 

मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकापासून ते गुजरातपर्यन्तचा भाग येत होता. या सर्व भागाचा मुख्य कारभार डंकनच्या हाती आला. मुंबईचा गव्हर्नर असताना गुजरातच्या पोरबंदर, बडोदा भागातल्या स्त्रीभ्रूण हत्येबाबत त्याला माहिती मिळाली. याचा मागोवा घेत तो बडोद्याला पोहचला.

त्याला समजलं की जडेजा समाजात मुलगी जन्माला आली की नवजात मुलीला नदीकाठी घेवून जातात तिथे एक खड्डा खोदून तो खड्डा दूधाने भरण्यात येतो. याच खड्यात लहान मुलीला बुडवून मारण्याची अमानुष प्रथा आहे.

या अमानवीय प्रथेविरोधात त्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्याने जडेजा समाजाबरोबर बोलणी करून तूम्ही ही प्रथा बंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला काही खास अधिकार देईल अस सांगितलं. त्याची बोलणी कामी आली. त्यानंतरच्या काळात जडेजा समाजातून ही प्रथा नष्ट होण्यास मदत झाली. 

स्त्रीभ्रूण हत्येसाठी लढणारा या डंकनचा मृत्यू १८११ साली झाला. वरती आपण ज्या चर्चचा उल्लेख केला त्याच चर्चमध्ये त्याचे पार्थिव पुरण्यात आले. व त्याच्या गौरवार्थ त्याच्या मृत्यूचा शोक करणारे शिल्प या चर्चमध्ये कोरण्यात आले.

संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकनच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना झाल्याचं या शिल्पातून साकारण्यात आलं. त्यामुळे जगातील एकमेव चर्चमध्ये ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा साकारण्यात आला.

मिलिंद आरोलकर --


मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...