Wednesday, 4 November 2020

कराचीला जुळी मुंबई का म्हटले जात असे.


कराचीला “जुळी मुंबई” म्हटलं जायचं, ती मराठी माणसाची होती हे तुम्हाला माहिती आहे का? मग वाचा हा लेख…

कराचीला “जुळी मुंबई” म्हणलं जायचं

ब्रिटिशांच्या काळात १९३६ साल पर्यंत कराची हे मुंबई प्रांतात होतं. मुंबईचा गव्हर्नरची सत्ता थेट कराची पर्यंत चालायची.
कराचीला “जुळी मुंबई” म्हणून ओळखलं जायचं. तशी एकार्थी लोक वस्ती हिंदू बहुसंख्य होती. मराठी कुटुंब तर अनेक होती.
आजही मुंबईत अनेक कुटुंबे आपले आजोबा-पणजोबा कराचीला सरकारी नोकरीत होते, फाळणीच्या वेळी आपले वडील कराचीहून आले असं सांगणारे आढळतात.
काही कराचीकरांनी तर मुंबईत एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था ही बांधल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव गावचे एक नाईक कुटुंब पिढ्यानपिढ्या कराचीला स्थायिक झाले आहे.
त्यापैकी कराचीच्या एका हॉटेलात कर्मचारी असलेल्या नाईकांची मुलाखत काही वर्षांपूर्वी वाचनात आली होती.

सिंध प्रांताची फाळणी

सुमारे १९३६ साली सिंध प्रांत हा मुंबई इलाखा पासून वेगळा करण्यात आला एका अर्थी तेव्हाच फाळणीची बीजं रोवली गेली होती. लोकसंख्येचे गुणोत्तर यानंतर वेगाने बदलत गेले.
आपल्याच कुटुंबात, जातीत, जमातीत, व्यापारात, धनदौलतीत रमलेल्या हिंदू समाजाला आपल्या इस्टेटी बाहेर सिंध प्रांतात मुस्लिम बहुसंख्य कधी झाले हे कळतच नाही.
त्यामुळे फाळणीच्या वेळी सगळ्यात कमी संघर्ष सिंध प्रांतात झाला,
नेसत्या वस्त्रानिशी  भारतात पलायन करण्यावाचून हिंदू समाजाला पर्यायच नव्हता कारण लोकसंख्येच्या अनुपाता प्रमाणे हिंदू समाजात संघर्षाचं त्राणच उरलं नव्हतं. असो.
पाकिस्तानातल्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शहा यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी कराचीतल्या आपल्या शाळेला भेट दिली.
शाळेच्या जुन्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. शाळेचे नाव आहे NJV हायस्कूल.

NJV… आद्याक्षरांवरून आपल्याला शाळेच्या नावाचा पूर्ण उलगडा होत नाही.

NJV म्हणजे नारायण जगन्नाथ वैद्य. शाळेचे पूर्ण नाव घ्यायला
गेलं तर ते आहे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल.

आश्चर्याचा धक्का बसला ना?

नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूलचा इतिहास

ही शाळा सिंध प्रांतातील पहिली सरकारी शाळा आहे. १८५५ साली ६८ मुलांना घेऊन हि सिंधी माध्यमातली शाळा सरकारतर्फे सुरू करण्यात आली होती.

त्यावेळी नारायण जगन्नाथ वैद्य हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील उच्चविद्याविभूषित गृहस्थ सिंधचे शिक्षण उपनिरीक्षक होते.

पुढे १८७६ साली शाळेचे स्थलांतर करण्यात आले व नारायण जगन्नाथ वैद्य यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

१९१६ साली शाळेत ४७७ विद्यार्थी शिकत होते पैकी फक्त १२ विद्यार्थी मुसलमान होते. शिवाय पारशी व यहुदी विद्यार्थीही शाळेत शिक्षण घेत होते.

१९३३ साली कराची महानगर पालिकेचे पहिले महापौर, पारशी समाजाचे जमशेदजी मेहता हे याच शाळेचे विद्यार्थी होते.

सिंध विधानसभेचे अधिवेशन भरण्याचा मानही या शाळेच्या वास्तूला मिळालेला आहे.

कराचीच्या शाळेत हिंदू मुख्याध्यापक


१९१० साली २५० विद्यार्थी शिकत असलेल्या या हायस्कूलला राज्य सरकार कडून ४०२० रुपयाचे अनुदान मिळत होते.

उच्चविद्याविभूषित व शिक्षण तज्ञ असलेल्या नारायण जगन्नाथ वैद्य यांनी सिंध भागात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

शाळेच्या सुरुवातीच्या काळात सातत्याने मराठी भाषिक मुख्याध्यापक तर १९४० पर्यंत हिंदू मुख्याध्यापक शाळेला लाभले होते.

मात्र त्यानंतर सामाजिक परिस्थिती बदलली ती आजतागायत.

हजारो विद्यार्थ्यांना आज शिक्षण देणारी ही शाळा पाकिस्तानच्या मानबिंदू पैकी एक आहे.

या शाळेची इमारत जागतिक वारसा अर्थात हेरीटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट केलेली आहे.

मुंबईतील सोन्याचांदीचे प्रथितयश व्यापारी पोपली यांच्यापासून चंदू पंजाबी हलवाई कराचीवाला यांच्यापर्यंत लक्षावधींच्या संख्येने फाळणीच्या वेळी सिंधी बांधव हिंदुस्थानात मुसलमानांच्या अत्याचारामुळे स्थलांतरित झाले.

फाळणीच्या जखमा काळाने भरल्या गेल्या परंतु व्रण मात्र कायम आहेत.

सिंध प्रांतातल्या शैक्षणिक क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटवणारे शिक्षण तज्ञ जगन्नाथ नारायण वैद्य यांचे कर्तृत्व मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला काहीही करून मिटवता आले नाही

मिलिंद आरोलकर --

No comments:

Post a Comment

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...