Friday 22 April 2022

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन


२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन.

संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो. त्यामुळे आज सकाळपासूनच सोशल मीडियावर #World Book Day हा हॅशटॅग ट्रेण्ड होतांना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे. खरंतर अनेकांना आजच्या दिवशी 'वर्ल्ड बूक डे' का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.

२३ एप्रिल याच तारखेची निवड का ?

विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन २३ एप्रिल याच दिवशी झालं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस प्रथम २३ एप्रिल १९२३ मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

फोटो स्त्रोत गुगल -

मिलिंद आरोलकर.

Saturday 9 April 2022

७२ वर्षांपूर्वीचे चैत्र गौरीचे आमंत्रण

७२ वर्षापुर्वीची चैत्रगौरी हळदीकुंकवाची आमंत्रण पत्रीका …किती रसिकतेनी काव्यमय पद्धतीने महिलांची जगण्याची रित होती ते या मधुन दिसुन येते . जीवनाचा उत्साह भरण्याची रित यांतुन दिसुन येते.


७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी

 ७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी.


 ७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी



इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९५ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं....
आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे 'एम', 'आय नो ', 'होम लाईट','शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत.


मिलिंद आरोलकर -

Wednesday 24 November 2021

जनहित याचिका, म्हणजेच ‘PIL’ कशी दाखल करता येते?



जनहित याचिका, म्हणजेच ‘PIL’ कशी दाखल करता येते?
 
 

आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचतो किंवा बातम्यांमध्ये ऐकतो की अमुक एखाद्या व्यक्तीने ह्या ह्या कारणासाठी जनहित याचिका कोर्टात दाखल केली आहे. आपल्यापैकी अनेकांना ही जनहित याचिका का आणि केव्हा दाखल केली जाते ह्याबाबत माहिती नसते. भारतीय कायद्यात अशी तरतूद आहे की सार्वजनिक हितासाठी कुठलाही सर्वसामान्य माणूस कोर्टात जनहित याचिका दाखल करू शकतो.

इतर याचिकांप्रमाणे ह्या याचिकेसाठी पीडित पक्षाला स्वत: कोर्टात जाण्याची अट नाही.

 *जनहित याचिका ही भारतीय नागरिकाने न्यायासाठी कोर्टात दाद मागण्याची एक प्रक्रिया आहे.*

ही योजना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे प्रमुख न्यायाधीश पी. एन. भगवती ह्यांनी प्रस्थापित केली.

आपली न्यायव्यवस्था ही लोकाभिमुख असावी ह्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातलीच ही एक महत्वाची उपाययोजना आहे. लोकशाहीतील एक महत्वाचा मुद्दा असलेल्या जनहित याचिकेबाबत आज आपण जाणून घेऊया.

*पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन* म्हणजेच जनहित याचिकेचे कामकाज इतर न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा वेगळे चालते. ही याचिका दाखल करण्यासाठी आपल्याला कोर्टात स्वत: जाण्याची गरज नसून केवळ एखाद्या टपाल कार्ड किंवा अर्जाद्वारे किंवा आजच्या डिजिटल युगात एका इ मेल द्वारे सुद्धा आपण ही याचिका दाखल करू शकतो.

प्रसंगी न्यायालय सुद्धा काही गोष्टीत स्वत: हस्तक्षेप करून अश्या याचिका दाखल करू शकते. घटनेमधील ह्या तरतुदीचा अनेक सजग नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी वेळोवेळी सामाजिक हितासाठी वापर केला आहे.

ह्या याचिकेचा सर्वप्रथम विचार अमेरिकेत केला गेला अमेरिकेत ह्या याचिकेला “सामाजिक कार्यवाही याचिका” असे म्हणतात.

अमेरिकेत व आपल्याकडेही ह्या याचिकेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना जलद तसेच कमी खर्चात न्याय मिळवून देणे हा आहे. तसेच जर ह्या याचिकेचा दुरुपयोग केलेला आढळून आला तर याचिका दाखल करण्याऱ्याला दंड केला जातो. जनहित याचिका स्वीकारणे किंवा फेटाळण्याचा निर्णय न्यायालय घेते.

*ही याचिका दाखल कारण्यासंबंधी उच्च न्यायालयाने काही नियम लागू केले आहेत.* ते म्हणजे ह्या याचिकेसाठी लागणारे “सामान्य न्यायालय शुल्क” कोर्ट माफ करू शकते. तसेच ही याचिका शासकीय तसेच एखाद्या खाजगी संस्थेविरुद्ध सुद्धा दाखल करता येते.

कोर्टाला पाठवलेले टपाल कार्ड सुद्धा ग्राह्य धरून त्याला रिट याचिका मानून ही याचिका दाखल करता येऊ शकते व सामाजिक हितासाठी कुठलीही सामान्य व्यक्ती किंवा संघटना जनहित याचिका दाखल करू शकते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तसेच घटना लागू झाल्यानंतर सुरुवातीला जनहित याचिकेला घटनेत स्थान नव्हते. घटनेत ही तरतूद नंतर करण्यात आली. अनेक न्यायिक व राजनैतिक कारणे ह्या प्रक्रियेच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. ढोबळमानाने बोलायचे झाल्यास सत्तरच्या दशकात सुरु झालेली ही प्रक्रिया ऐंशीचे दशक उजाडता उजाडता पक्की झाली.

*जनहित याचिकेच्या प्रसिद्ध न्यायालयीन खटल्याचे उदाहरण म्हणून १९७९ सालच्या हुसेनआरा खातून व बिहार राज्य ह्या खटल्याकडे बघता येईल.*

ही केस ट्रायलवर असलेल्या कैद्यांना तुरुंगात मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल होती.

इंडियन एक्स्प्रेस ह्या वर्तमानपत्रात बिहारमधील तुरुंगांत खितपत पडलेल्या ट्रायल वर असलेल्या हजारो कैद्यांची वाईट अवस्था वर्णन करणारी एक बातमी प्रकाशित झाली होती. ह्या बातमीच्या आधारावर जनहित याचिका दाखल करण्यात आली. ह्या खटल्याच्या निकालानंतर चाळीस हजार पेक्षाही जास्त कैद्यांना सोडून देण्यात आले. ऍडव्होकेट कपिल हिंगोरानी ह्यांनी ही याचिका दाखल केली होती.

*९ मार्च १९७९ रोजी कोर्टाने म्हटले की प्रत्येक आरोपी स्वतःच्या बचावासाठी वकील नियुक्त करू शकत नाही.*

ह्या परिस्थितीत अश्या आरोपींना मोफत कायद्याची सुविधा मिळाली पाहिजे. व ह्या सुविधेचा खर्च राज्य सरकार करेल. “त्वरित न्याय” हा घटनेत एक मूलभूत हक्क मानण्यात आला. तसेच हा सिद्धांत त्यानंतरच्या खटल्यांसाठी सुद्धा स्वीकार करण्यात आला.

अशीच जनहित याचिका पुढे एसपी गुप्ता विरुद्ध भारतीय संघराज्य ह्या केसमध्ये सुद्धा दाखल करण्यात आली. हा खटला “द जजेस ट्रान्सफर केस’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती पी एन भगवती ह्यांनी दिला.

ह्या केसमध्ये असे नमूद केले गेले की समाजातील कुठलीही प्रामाणिक व्यक्ती किंवा संस्था कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन झाल्याबद्दल न्याय मागण्यासाठी कुठल्याही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करू शकते.

न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे जेव्हा जेव्हा सरकार किंवा शासनाद्वारे समाजातील वंचित घटकांवर अन्याय झाला तेव्हा जनहित याचिका हे समाजातील वंचित किंवा पीडित घटकांसाठी न्याय मागण्याचे एक प्रभावी साधन बनले.

*जनहित याचिका ही एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा एखादी संघटना दाखल करू शकते. किंवा त्यांच्या वतीने एखादा वकील सुद्धा ही याचिका दाखल करू शकतो.* ही याचिका दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्याचा त्या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असायलाच हवा ही अट नाही. एखादी तटस्थ व्यक्ती सुद्धा समाजातील एखाद्या अन्यायकारक घटनेविरुद्ध स्वतः किंवा वकिलांमार्फत जनहित याचिका दाखल करू शकते. १९८१ साली पोलिसांनी कैद्यांवर केलेला अत्याचार “अनिल यादव विरुद्ध बिहार शासन” ह्या केसदरम्यान उघडकीस आला.

ह्या केस बद्दल एक बातमी प्रसिद्ध झाली. ह्या बातमीमुळे हे उघडकीला आले की पोलिसांनी तब्बल ३३ संशयित कैद्यांच्या डोळ्यात ऍसिड ओतून त्यांना आंधळे केले.

ही घटना समोर आल्यानंतर ऍपेक्स कोर्टाने आदेश दिले की त्या ३३ पीडितांना दिल्ली येथे उपचारांसाठी आणण्यात यावे आणि ह्या घटनेतील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर जलद कारवाई करण्यात यावी. ह्या केस मध्ये कोर्टाने आरोपींना मोफत कायदेशीर मदत मिळणे हा प्रत्येक आरोपीचा मूलभूत हक्क आहे हे मान्य केले.

याचिकाकर्ते अनिल यादव ह्यांनी सोशल ऍक्टिव्हिजम व इन्वेस्टिगेटिव्ह खटल्याची सुरुवात केली.

*ब्लॅक्स लॉ डिक्शनरीमध्ये PILचा अर्थ पुढीलप्रमाणे दिलेला आहे,*

“a legal action initiated in a court of law for the enforcement of certain rights that are in the interest of the public where the class of community may or may not have a pecuniary interest or any other interest by which their legal rights are affected”

भारतीय संविधानाच्या ३२व्या अनुच्छेदामध्ये असे दिले आहे की केवळ पीडित व्यक्तीलाच कोर्टात रिट दाखल करण्याचा अधिकार आहे. आपल्या संविधानाचा ३२व्या अनुच्छेदात असे म्हटले गेले आहे की भारतीय नागरिकास अधिकार किंवा कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही करून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.

न्यायमूर्ती पी एन भगवती ह्यांनी १९८१ साली एस पी गुप्ता विरुद्ध भारतीय संघराज्य ह्या केसचा निर्णय देताना पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा सिद्धांत उलगडताना असे म्हटले आहे की,

*“जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजातील एखाद्या घटकाच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो किंवा एखादा कायदेशीर अपराध घडतो किंवा गरिबी, अपंगत्व, असहाय्यता, कमकुवत आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे एखाद्या व्यक्तीचे कायदेशीर नुकसान झाल्यास किंवा कुणीही कोणावर बेकायदेशीर ओझे टाकून अन्याय केल्यास आणि अश्या परिस्थितीत पीडितांना न्यायालयाकडे दाद मागता येणे शक्य नसेल तर समाजातील कुठलाही सदस्य संविधानातील २२६व्या अनुच्छेदाच्या अंतर्गत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो.*

अश्या व्यक्तींच्या किंवा सामाजिक घटकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास संविधानाच्या कलम ३२ नुसार सुप्रीम कोर्टात दाद मिळू शकते.

*खालीलपैकी कुठल्याही कारणावरून जनहित याचिका दाखल करता येते. किंवा सामाजिक स्वास्थ्यासाठी किंवा हितासाठी हानिकारक असलेल्या कुठल्याही घटनेविरुद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करता येते.*

दंगलपीडितांकडून दाखल होणारी याचिका, पर्यावरणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय असंतुलन, अन्नात भेसळ, वारसा -वस्तू संरक्षण, संस्कृती, जंगले आणि वन्यजीव संरक्षण, बालकल्याण, आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचे शोषण किंवा अन्याय, सामाजिक हितासंदर्भात अन्य काही बाबी ह्या विषयांवरून साधारणपणे जनहित याचिका दाखल करता येतात.

*भारताचा नागरिक केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, शासकीय मंडळे, शासकीय संस्था आणि इतर प्राधिकरणांविरुद्ध जनहित याचिका दाखल करू शकतो.*

कधी कधी काही लोक मात्र प्रकाशझोतात येण्यासाठी, किंवा पब्लिसिटी स्टंट म्हणून सुद्धा ह्या अधिकाराचा दुरुपयोग करतात. मात्र ही तरतूद सामान्य नागरिकांना जलद न्याय मिळावा म्हणून करण्यात आली आहे.

जनहित याचिका ही सामाजिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरली आहे. PIL प्रत्येकासाठी आहे, मग ती व्यक्ती कुठल्याही जाती धर्माची, वंशाची किंवा आर्थिक परिस्थितीतली असो. ह्या मुळे आपल्या विकसनशील देशाचा फायदाच झाला आहे. समाजातल्या दुर्बल व पिचलेल्या घटकांवरील होणारा अन्याय दूर करण्यामध्ये ह्या तरतुदीचा खूप मोलाचा सहभाग आहे.

अर्थात ह्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच खरी जनहित याचिका व खोटी याचिका ह्यांच्यातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.


 संकलित माहिती -


मिलिंद आरोलकर-

Wednesday 27 October 2021

"हिन्दू " शब्दाचा अर्थ.





"हिन्दू!" 

"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.
खरे म्हणजे 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती 'वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे.म्हणून हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे अवश्य जाणून घेऊयात.कारण
गेली कित्त्येक वर्षं असा भ्रम पसरविला गेलाय की,'हिन्दू' हा शब्द 'सिन्धू' या फारसी शब्दापासून निर्माण झालाय.खरे म्हणजे हे धादान्त असत्य आहे.
आपल्या 'वेद' आणि 'पुराणात'ही 'हिन्दू' या शब्दाचा उल्लेख सापडतो.
आज आपण 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूयात.
'बृहस्पति अग्यम'(ऋग्वेद)मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे.
“हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l"
म्हणजे-
'हिमालयापासून इन्दू सरोवरा(हिन्दी महासागर)पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान('हिन्दूं'चे स्थान)होय.
केवळ 'वेदांत'च नव्हे,पण 'शैव' ग्रंथातही 'हिन्दू' शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो-
"हीनं च दूष्यतेव्,हिन्दुरित्युच्च ते प्रिये।”
म्हणजेच-"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय."
कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक 'कल्पद्रुमा'तही आढळतो-
"हीनं दुष्यति इति हिन्दूः।”
म्हणजे-
"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते."
"पारिजात हरण"या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-
"हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्टं।
हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुर्भिधियते।।”
म्हणजे-
"जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय."
"माधव दिग्विजय,"मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय-
“ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन्म द्रढ़ाश्य:।
गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।"
म्हणजे-
"जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो,
तो हिन्दू आहे."
केवळ एव्हढेच नव्हे,तर आपल्या
ऋग्वेदात(८:२:४१)विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे,ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि 'ऋग्वेद मंडला'तही त्याचा उल्लेख येतो.
"हिनस्तु दुरिताम्।"
'वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच
आहेत.'



मिलिंद आरोलकर.





         
    

Monday 25 October 2021

भारतातील साबणाचा प्रवेश आणि त्याचा दिवाळीशी असलेल्या संबंधा बद्दल .




  भारतातील साबणाचा प्रवेश आणि त्याचा दिवाळीशी असलेल्या संबंधा बद्दल ..


“साबणाचा जन्म !

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही.! 

     अंघोळीची अशी तऱ्हा होती, तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, सनलाईट सोप नावाचा.! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स.! हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही.! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.! 

    या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.! 

     आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता,.टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेलतर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत, १० रुपयांना १०० वड्या.! 

     नावही ठरलं..५०१..बार.! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिश.! टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.! लिव्हर ची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची.! आणि त्या साबणाच नाव होतं ५००.! ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले... मग आपल्या साबणाचे नाव ५०१.! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.! 

     बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला.! त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली.! त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता.! टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती.! टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.! टाटा या स्पर्धेत तरले.! या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम... तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो... त्या मोती साबणाची निर्मिती केली.! ✍🏻

     इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही माहिती महत्त्वाची.!


मिलिंद आरोलकर.-

Wednesday 29 September 2021

पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा कोणी सुरू केली.



."पुणेरी पाट्या लावण्याची"
परंपरा या कोणी सुरू केली...
      
मला कधी कधी प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी ह्या व्यक्तीची आठवण काढतो आणि 
मस्त फ्रेश होतो.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. 
*कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करून, घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ, पुणे!*

     आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली,  
या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील. 
पण पहिली फेमस पाटी कोणी लावली, 
त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

     *प्रभाकर बाळकृष्ण जोग*
*म्हणजे प्र.बा.जोग.* 

*विद्वान माणूस विक्षिप्त असतो, अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे.*

*प्र. बा. जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते!*

     ते मूळचे *वकील.* शिवाय 
*क्रिकेट सामन्याचे अंपायर,* 
*पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा.*

पण त्यांचा सगळ्यात 
*आवडता छंद "भांडणे"* होता.

    पेशाने ते वकील , 
त्यात सदाशिव पेठ त्यात 
भांडण्याची खुमखुमी असलेले . 

*म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा!*

    भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. 
अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली,  
या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. 

*पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून, तात्विक असायची.*

    गंमत म्हणजे यातूनच त्यांनी 
*'मी हा असा भांडतो'* नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं. 
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी 
*घरात प्रवेश करतानाच काही "पाट्या" लिहून ठेवल्या होत्या.*

*माझ्यावर विश्वास असेल तर या,* 
*नाही तर कायमचे कटा!* (गणगोतासह).
या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून *‘कटण्याचा मार्ग’ही* दाखवलेला! 
अशी पाटी पाहून, 
आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, 
तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. 
त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

*‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’*

*‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.*
     
*तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.*
*खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,*
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :-

*“वरील सूचना सर्वासाठी आहेत.* 
*गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!”*
– प्र. बा. जोग

     प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.

सगळेजण त्यांना घाबरायचे,
पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

*पुण्यात पाट्यांचा आद्य जनक, म्हणून त्यांना ओळखलं गेलं.*

     त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. 
पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची,
*पण त्यांना बोलू दिलं जात नसे!*

     *त्यामुळे चिडून त्यांनी आपल्या चार चाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता!*

आणि स्वतःची 
*"पसंत व्याख्यानमाला"* 
सुरू केली.
      
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत 
व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

     त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

     स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता. 
तिथे काही तरी राजकारण करून, प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, 
एवढंच काय तर ते येऊन, 
भांडतील म्हणून मैदानात सुद्धा 
प्रवेश करू दिला नाही.

     यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरी पेक्षाही उंच असे मचाण बांधले.
      आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून, लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. 
जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

     त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. 
मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 
दारुबंदी केली आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

     *‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’*
अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. 
या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला की,
त्यांनी आपल्या घराला 
*‘मोरारजी कृपा’* } नाव दिले.
     
त्यांनी विधानसभेच्या अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. 
पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. 
सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

     पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. 
पी जोग क्लासेस चे सुहास जोग, 
अस्थि शल्यविशारद विलास जोग, 
बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग, 
ही प्र.बा. जोग यांची मुले होत. 
बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र. बा. जोग यांचा नातू.

     आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल 
प्र. बा. जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. 
ते प्रचंड हुशार होते, 
त्यांच्या कडक शिस्तीचा,
त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल 
*पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता!*

*त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून, पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला!*

*तेच ते तेच ते पेक्षा...
*बरंय थोडं वेगळं.....


मिलिंद आरोलकर -

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...