Sunday, 9 May 2021

विड्याच्या पानाच्या मागील दडलेल्या रंजक गोष्टी.!

विड्याच्या पानाच्या मागील दडलेल्या रंजक गोष्टी.!! 

पान खाणारा माणूस सोशिक असतो असं म्हणतात. चुका करणाऱ्या माणसाविषयी व्यसनी माणसाला जरा अधिकचा कळवळा असतो. खरंतर पानाने हॅबिट फॉर्मेशन होत नाही. पानात असं कुठलंही केमिकल नाही की ज्यामुळे सवय लागेल. पण नागवेलीच्या पानांचा जेव्हा विडा होतो तेव्हा त्याची चटक लागल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पान हा सवयीचा प्रकार मानला जातो.

मुळात ते एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपल्या मेंदूत विशिष्ट भाग असतो. सवय लागलेला प्रकार आपण खाल्ला की तिथून समाधानाचं केमिकल बाहेर पडतं. छान वाटतं. लेखकाच्या हातून एखादा सुंदर पॅराग्राफ लिहून झाला की त्याला एकदोन मिनिटं छान वाटतं. बाळाला दूध पाजल्यानंतर आईला जे समाधान मिळतं, आनंद मिळतो, ते फीलिंग ऑफ वेल बीइंग असतं. तो सुखद आस्वाद व्यसनातून वारंवार मिळतो. कारण तेच केमिकल वारंवार पाझरत राहातं. म्हणून आपल्याला व्यसन लागतं. मेंदूचा तो भाग तुम्हाला काहीतरी रिव्हर्ट करतो. मज्जातंतूंना त्याची सवय लागते आणि वारंवार छान छान वाटायला पाहिजे असं वाटतं राहातं. मग फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे सवय होते. चांगल्या गोष्टीची ती सवय आणि वाईट गोष्टीचं ते व्यसन. दोन्ही एकच.

पण विडा किंवा पान खाणं हे फक्त व्यसन किंवा सवयीच्या भिंगातून नाही बघता येत. विडा हा आपल्या संस्कृतीचा जीवनशैलीचाच एक भाग. मराठी लग्नांमध्ये विडे तोडण्याचा एक रोमॅण्टिक समारंभ असतो. तामिळ लग्नांमध्ये तांबुल चर्वणम् हा विधी आहे. आधी तांबुल होतं. नंतर पान झालं. तांबुलात काय काय टाकायचं, त्याची घडी घालण्याची पद्धत कुठली त्यावरून कोणत्या विडय़ाला काय म्हणतात, याचे पूर्वापार वेगवेगळे प्रकार आहेत.

देवस्थानात देवाला विडा देण्याचा प्रकारही आहे. आपण पान खातो तर आपल्या देवालाही तो देतो. देवाला पान देण्याचे हक्कही काही कुटुंबांना वाटून दिलेले आहेत. पूजा-नैवेद्य झाल्यावर देवाच्या तोंडाला विडा लावला जातो. मग कुटलेलं पान प्रसाद म्हणून दिला जातो. आंबेजोगाईच्या मंदिरात ही प्रथा आहे. दक्षिणेत कर्पूरयुक्त पान देवाला अर्पण केलं जातं. तांबुलाची पद्धत मोहंजोदडोपासून आहे. मुघलकालीन जेवढी पेण्टिंग आहे त्यात पान देणं, पान खाणं आहेच.
एकेकाळी पान खाणं कुणालाही चुकीचं वाटत नव्हतं. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पान खात. घरातले पुरुष जेवण झालं की ते पान खात ओसरीत बसायचे. तोपर्यंत बायका जेवून घेत. बायकांचं जेवण झालं की मग एखाद्या लहान मुलाला पाठवून पानाचं तबक आत पाठवलं जायचं.

वऱ्हाडात तर एकवेळ कुणी जेवण विचारलं नाही तरी काही वाटायचं नाही, पण घरात आल्यावर पानदान समोर ठेवलं नाही तर तो सगळ्यात मोठा अपमान समजला जायचा. त्यामुळे विडा किंवा तांबुल हा मानाचा भाग होता आणि आहे. म्हणूनच विडा उचलणं वगैरे वाक्प्रचार रूढ झाले असावेत. विडा उचलण्याऐवजी आता ‘सुपाऱ्या’ घेतात.

आयुर्वेदातही तांबुल होताच. त्याचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केलेलं होतं. प्रत्येक प्रकारचा रस आपल्या अन्नात असायला हवा असं आयुर्वेद सांगतं. आपल्या आहारात सगळं आहे, फक्त तुरट रस जेवणात येत नाही. ज्याला कषाय रस म्हणतात तो जवळपास नाहीच. मग हा तुरटपणा कुठून आणायचा, तर पानातून! तसा तो आवळ्याच्या सुपारीतून पण येतो. पण जेवणानंतर पान खाल्ल्यावर छान वाटतं. मुखशुद्धी होते. ओरल कॅव्हिटी स्वच्छ राहते. श्वासाला दरुगधी येत नाही.

एवढंच नाही तर जखम भरून आणण्याची क्षमताही पानात आहे. जखमेवर पान बांधलं जातं. नवजात बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून नाळ कापलेल्या ठिकाणी जो पोटपट्टा बांधतात त्यातही नागवेलीचं पान बांधलं जातं

पान थोडं अ‍ॅसिडिक असतं. पण इतकं नाही की त्याचा त्रास होईल. कच्च पान खाल्लं की बेंबीच्या आसपास थोडं जळजळतं. त्यामुळे भूक लागते. पानात मेन्थॉलही असतं, त्यामुळे खरं तर वेगळी ठंडक घालण्याची आवश्यकता नसते.

पान कामोत्तेजक म्हणूनही वापरलं जातं. पानात अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक असतात असं परंपरेतून मानलं जातं. आयुर्वेदातही तसं सांगितलं आहे. म्हणूनच पलंगतोड पान वगैरे प्रकार विकसित झाले असावेत. पानात आणखी काही अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक टाकून त्याचं कामोत्तेजक स्वरूप आणखी वाढवताही येतं. शिवाय त्याच्याशी थोडा रोमान्सही जोडला गेला, त्यामुळे पानाला चांदीचा-सोन्याचा वर्ख आला. पानाच्या अनुषंगाने अनेक प्रेमकथा, गूढकथा आणि चावटिका निर्माण झाल्या.

 लखनौचा नवाब वाजिद अली शाहच्या पान खाण्यासंदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्याच्या अनेक बेगमा होत्या. त्यामुळे त्याच्या पानात असे कामोत्तेजक घटक घातल्याचे दाखले सांगितले जातात. अशीही एक कथा आहे की, त्याने खाऊन टाकलेला चोथा त्याच्या भंग्याने खाल्ला आणि त्याचा असा काही परिणाम झाला की शेवटी त्या भंग्याच्या बायकोला वैद्याकडे न्यावं लागलं

मेहंदीप्रमाणेच पानाच्या बाबतीतही काही समज आहेत. नवऱ्याचं प्रेम खरं असेल नवऱ्याने भरवलेला विडा रंगतो, असंही महटलं जातं. पानासोबत रोमान्स आला आणि मग प्रेमाची पानं वेगळी झाली. मिठा पान विकसित झालं. त्यात गुलकंद आला. काही लोकांनी चुन्याला देखील नटवण्याचा प्रयत्न केला. पानात गुलाबाचा आणि केवडय़ाचाही सुगंधी एसेन्स आला.

‘देवदास’ कादंबरीतली देवदास-पारोची पहिली भेट होते तेव्हा देवदास पान खात असतो आणि हुक्का ओढत असतो, तेही शाळेला दांडी मारून. ‘शतरंज के खिलाडी’मध्ये दोघे बुद्धिबळाचा पट घेऊन बाहेर खेळायला जातात तेव्हा दिवसभराची पानं बांधून घेतात, असाही उल्लेख आहे. जुनेच नाही तर नवे उल्लेखही विडय़ाचं कौतुक करणारे आहेत.


संगीतकार एस.डी. बर्मन एकदा फुटबॉलची मॅच बघायला जात होते. एक सिने निर्माता गाणं मागण्यासाठी आला होता, त्यांनी त्यालाही गाडीत बसवलं. बर्मनदांनी सवयीने गाडीत बसून पान लावायला घेतलं. पण त्या निर्मात्याच्या प्रश्नांची सरबत्ती काही कमी होईना. शेवटी कंटाळून बर्मनदांनी त्याला गाडीतून उतरवलं. कुणीतरी विचारलं, ‘दादा तो तर पैसे घेऊन आला होता. त्याला कशाला उतरवलं?’ त्यावर ते म्हणाले, ‘जो आदमी मला पानही नीट खाऊ देत नाही, तो मला काम काय करू देणार?’

मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात अनेक संस्थानिकांमुळे पानसंस्कृती आणि अय्याशी यांचं नातं निर्माण झालं. जिथे आरामशीर, जमीनदारीचं आयुष्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला पानाचं प्रस्थ जास्त दिसेल. बनारसमध्ये दिसेल, कलकत्त्यात दिसेल. कलकत्त्याइतकं पान कुठेच खाल्लं जात नाही.

मुंबईत अय्याशी दिसत नाही. कारण मुंबई हे वर्किंग कम्युनिटीचा प्रकार आहे. तरीही मुंबईत पानाचा मोठा बाजार नळबाजारात असायचा. पहाटे चार वाजता हे पानांचं मार्केट सुरू व्हायचं. आता पानाचं मार्केट चुनाभट्टीला आलंय. मोठा गुंडाळा असतो, त्यात पाच हजारांपर्यंत पानं असतात. पानाचं शेल्फ लाइफ कमी असतं. त्यामुळे पानवाला कधीही पान वाया घालवत नाही. थोडं लागलेलं पान असेल तर तो कातरीने तेवढा भाग कापून टाकतो.


पान खाण्यामध्ये थोडी रंगबाजी आली. पान घ्या, ते नखला; अंगठय़ाच्या नखाने पातळ शीर आणि पापुद्रा निघाला पाहिजे. पानाच्या जातींप्रमाणे शीर कमी जास्त असते. पूना पान पातळ. पानाच्या गादीवर मिळतं. पूना पानात चोथा भरपूर असतो. पानात जेवढा चोथा कमी तेवढी पानाची प्रत चांगली. पानात जेवढा तिखटपणा अधिक त्याप्रमाणे पानाची प्रत ठरते. काही जणांना पिवळं जर्द पान लागतं. काहींना हिरवंगार पान लागतं. कलकत्ता पान तिखट आहे. त्याला बांगला पान असंही म्हणतात. पूना पानात तो तिखटपणा नाही. पण पानाला चव आहे. बांगला पान मोठं, तिखट आणि चोथा कमी असतो. मघई हे जोडीने खायचं पान. एकावेळी दोन पानं खावी लागतात. त्यात एकही शीर नसते. तोंडात विरघळून जातं. पण शेल्फ लाइफ कमी. पानाची उपज कमी. भरघोस येत नाहीत. त्यामुळे ते महाग असतं.


पान खाण्याच्या संस्कृतीबरोबर पान लावण्याचे प्रकारही विकसित झाले आणि त्यासोबतचे शिष्टाचारही. आपल्याकडे पानाच्या चटण्या बोटाने फिरवतात. उत्तरेत ते अशिष्ट समजतात. तिथे दांडीने किंवा पानाला पान लावून चुना, काथ आणि चटण्या एकत्रित केल्या जातात. पानाच्या या शिष्टतेच्या संस्कृतीसह रसिकताही येऊन चिकटली. त्यामुळे साहित्यात त्याचे रंग उमटले नसते तरच नवल.

ना. धों. महानोरांच्या ‘भलताच रंगला काथ लाल ओठांत’ या कवितेतला ठसका बघा..
त्या दिसी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा, कहर भलताच

तसंच कवी शैलेंद्रच्या गाजलेल्या ‘पान खाये सैंयाँ हमारो’ मध्ये ‘ले आया जालीम बनारस का जर्दा’ला मिळणारा शिट्टय़ांचा प्रतिसाद विलक्षण असतो. राजा बढेंची ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान’ ही लावणी असू द्या किंवा माजघरात म्हटलेले पाळणे, ओव्या, गीतं असू द्या त्यात विडय़ाचे उल्लेख अपरिहार्य असायचे.

सुपारी

पानाची सवय लागते ती सुपारीमुळे. कारण सुपारीमध्ये अल्कलॉइड्स असतात. हीच अल्कलॉइड्स अफूमध्येही असतात. फक्त श्रेणीमध्ये फरक असतो. सुपारीतलं अल्कलॉइडस् हे शेवटच्या दर्जाचं असतं. त्यामुळे त्याची नशा होत नाही. पण सवय जरूर लागते. ही अल्कलॉइड्स जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा जास्त असतात. सुपारी वाळत जाते तसे ते सुपारीच्या आतला पांढरा गाभा आहे त्यात जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रत बदलते. श्रीवर्धनची सुपारी म्हणजे दिवेआगर, आंबेत, हरिहरेश्वर या पट्टय़ातली सुपारी. ती बाजारभावापेक्षा २०० रुपये अधिक प्रीमिअम खाऊन जाते. त्याचं कारण पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीला चव जास्त. एरव्ही सुपारीला चव काडीची नाही. सुपारी ही अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. नैसर्गिकरीत्या ती कुणालाही आवडणार नाही. दोन-तीनदा खाल्ल्यानंतर तिची चव विकसित होत जाते. जशी वाइनची चव विकसित व्हावी लागते. सुपारी जेवढी कच्ची तेवढे तुमचे कान लाल होतात. सुपारीचा ठोठरा बसणे हा अनुभव घ्यायचा असेल तर कच्ची सुपारी खावी. आख्खं खानदान आठवतं. गुजरातमध्ये तिला काची सुपारी म्हणतात. नेपाळीत काचो सुपारी म्हणतात. उफाडय़ाच्या दिल घायाळ करणाऱ्या तरुण मुलीलाही काचो सुपारी अशीच उपमा आहे. तिथल्या लोकसाहित्यात ही प्रतिमा येते.

सुपारी किनारपट्टीवर केरळपासून आढळते. लाल-तांबडी माती सुपारीला धार्जिणी. मातीनुसार सुपारीची चव बदलते. सुपारीचं उत्पादन मँगलोरमध्ये जास्त होतं. आपल्याकडच्या सुपारीला श्रीवर्धनचा रोठा म्हणतात. यात मग खूप बारीक बारीक प्रकार येतात. मद्रासची चिकणी सुपारीही लोकप्रिय आहे. पण ती काथाच्या पाण्यात प्रोसेस केलेली असते. त्यामानाने तिचा कमी ठोठरा बसतो. सुपारी श्रीलंका, बांगलादेश, कलकत्ता या भागातही होते.

सुपारीत काहीतरी अद्भुत गुण आहेत अशी पहिल्यापासून धारणा आहे. तिच्यात काही मिस्टिक गुणधर्म आहेत. लग्नापासून ते मर्तिकापर्यंत जेवढे समारभं आहेत त्या प्रत्येकात सुपारी आहे.
बिहारी लग्नात पहिल्यांदा जी परात येते त्यात परात भरून सुपाऱ्या असतात.

मग सुपारीत नाना तऱ्हेचे ढंग सुरू झाले. उत्तर प्रदेशात वेगळे आणि दक्षिण भारतात वेगळे. दक्षिणेत सुपारीला कापराचा फ्लेवर मिळाला. त्यांच्या पानात कापूर घालतात. आपल्याला बुंदीच्या लाडवाला कापराचा वास आलेला चालणार नाही.   बुंदीच्या लाडवाला कापराचा वास नसेल तर ते अशिष्ट मानलं जातं.

सुपारीला ठोठरा बसतो, काथाचा कडवटपणा, चुन्याने जीभ भाजू शकते. यावर उतारा काय तर मग खोबऱ्याचा शिरकाव झाला, त्याने उग्रपणा थोडा कमी होतो. चवीला लवंग आले. (हे सगळे किनारपट्टीवरचे) नागवेल, सुपारीचं खांड, लवंगा, वेलदोडे, खोबरं. उत्तरेत केशर आलं. दक्षिणेत कापूर, क्वचित कस्तुरीचा उल्लेख आहे. पण ती कवीकल्पना असावी.

धार्मिक कार्यक्रमाला प्रथम यजमान पुरोहिताला एक सुपारी देतो. ही कशासाठी तर तुम्ही आमचे काम चालवा. आज वेगळ्या कारणासाठी सुपारी दिली जाते. काम झाल्यानंतर आशीर्वचनासह ती सुपारी यजमानाला परत दिली जाते. या प्रत्येक टप्प्याला आपण नाव दिलेलं आहे. लग्नातही पान-सुपारीच देण्याची पद्धत आहे.

काथ

आपल्याकडे खैराचं झाड तोडण्यावर बंदी आल्यानंतर काथ मिळवणं कठीण झालं. काथ महाग होऊ लागला आणि पानात परवडेनासा झाला. आता मलेशियातल्या जंगलातल्या गंबीर झाडाचा काथ आपल्याकडे येतो. तो फार चांगला नसतो.

तंबाखू

तांबुल भ्रष्ट केला तो तंबाखूने. तंबाखूने व्यसन पूर्णत्वाला नेलं. तंबाखू आल्यामुळे पानाचं नैतिक स्खलन झालं. सात्विक गृहिणीनं पटकन डोळा मारल्यावर जसं वाटेल तसं झालं. पोर्तुगीजांनी तंबाखू आणला. तंबाखूही मृत करून पानात वापरला जातो. त्याशिवाय त्याला नशा येत नाही. तंबाखूची हिरवी पानं गठ्ठे बांधून जमिनीत पुरून ठेवली जातात. त्यातलं क्लोरोफिल संपूर्ण संपल्यानंतर ती पिवळी पडल्यानंतर मग ती नशा येते. आजही गादीवर संपूर्ण तंबाखूचं वाळलेलं पान घेणारे शौकिन आहेत. 

खाण्याचा तंबाखू चवीला कडवट असतो. सुपारी आणि पान मिळून मग त्याचा कडवटपणा मरतो. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुवास आले. पहिला केशर आला, काहींनी केवडा वापरला. सुगंधी तंबाखूला जर्दा म्हणतात. तीन गोष्टींसाठी भोपाळ प्रसिद्ध आहे. जर्दा, गर्दा आणि नामर्दा. सुगंधी तंबाखूची नशा आणि अतिसेवन अखेरीस वंध्यत्व आणते, असा अर्थ त्यातून ध्वनित होतो.

तंबाखूचे १२०, १६०, ३०० हे मुळात प्रकार नसून हे तेव्हाचे किलोचे भाव आहे. डीएस नावाची एक कंपनी परफ्यूम्ड तंबाखू बनवायची. त्यांचे दर हेच पुढे त्या तंबाखूच्या प्रकारांचे नाव झाले. या पानात टाकून खायच्या सुगंधी तंबाखूने क्रांती केली. जर्दा कुणी वेगळा खात नाही. हा पानात खायचा तंबाखू. यात भोलानाथ केसरवानी यांचं नाव फार फेमस आहे. पानाच्या ठेल्यावर भोला तंबाखू टाक, असं म्हटल्यावर तो एक हिरवा डबा काढतो. त्यावर एक मुच्छड माणूस दिसतो. हाच तो भोलानाथ केसरवानी. या भोलानाथने हा पहिला तंबाखू अजरामर केला. भोला, मग १२०, मग १६० लोकप्रिय होत गेले. तंबाखूचं सुगंधी मिश्रण तयार झालं.

किवाम

कजरारे गाण्यात एक ओळ आहे.. ‘तेरे बातों में किवाम की खुशबू हैं.’ किवाम म्हणजे तंबाखूचा चुरा वाया न घालवता त्याचं कूट करून जे मिश्रण केलं जातं ते किवाम. त्यातही नवरतन किवाम सगळ्यात फेमस. त्यानंतर राजरतन आला. यातला तंबाखूबरोबर जाणारा परफ्यूम महत्त्वाचा. दुसरा कोणताही सुगंध त्याबरोबर जात नाही. चार्ली वापरून तर कुणी खाणार नाही. या परफ्यूम शोधून काढणाऱ्यांनी कोटय़वधी रुपये कमावले.
पुलंनी लिहिल्याप्रमाणे खरा गाणारा फक्त पखवाज, तंबोरा आणि गळा यावर स्वर्ग उभा करतो. तसा बेसिक खाणारा पान, चुना, काथ, खातो. सुपारी वेगळी कातरून तोंडात टाकतो. मग तंबाखू खातो. मग पाच मिनिटांनी पिंक टाकतो.

पान अ‍ॅसिडिक, चुना अल्कलाइन, काथ म्युच्युअल, सुपारीत अल्कलॉइड्स. तरीही हे बेसिक चार घटक म्हणजे तंबोऱ्याच्या तारांसारखे मानले जातात. चांगल्या लावलेल्या तंबोऱ्यातून शुद्ध गंधार उमटतो. या चार घटकांचा एकत्र स्वाद गंधारासारखाच असतो. तो एक प्रकारचं सुखद फीलिंग देतो.

तरीही वाटतं की या तांबुल फॅमिलीत सगळं मारूनच तयार होतं. चुना भाजला की तयार होतो. काथ जिवंत झाड कापून त्याच्या गाभ्यातला रस काढून तयार होतो. काथाची भट्टी लावावी लागते. सुपारी सुकवावी लागते, तर तंबाखू जमिनीत गाडून ठेवावा लागतो. कुणाला तरी मारून, जाळून मग हे पदार्थ तयार होतात. पान सोडलं तर या तांबुलात रसरशीत काही नाही. पानाशी निगडित सगळे जिंदगी से हारे हुए लोक इथे जमा झाले आहेत. पण एकत्र आले तर वेगळंच रसायन होतं.

पण, पानातून रामायण कधीच तयार होणार नाही. झालंच तर महाभारतच. पान सोज्वळ नाही. खूप वेगवेगळ्या अफेअर्सनी तयार झालेली ही स्टोरी आहे.



मिलिंद आरोलकर

Friday, 7 May 2021

आरे दूध केंद्र एक स्निग्ध आठवण.


आरे दूध केंद्र एक स्निग्ध आठवण.



त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड.. 

हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे.
  
दुधाची गाडी आली की मुंबई खऱ्या अर्थानं जागी व्हायची. सकाळच्या शांत प्रहरी काचेच्या बाटल्यांचा नाद कानावर पडायचा. घाई गडबडीत एखादी बाटली फुटली की रस्ता दुधी रंगाचा होऊन जायचा. सूर्य उगवतीला येईपर्यंत दूध केंद्रावरील रांगा कमी व्हायच्या. घरी नेलेल्या बाटलीच्या बुचाला आतून असलेली घट्ट साय लहान मुलं आवडीनं चाटून घ्यायची. बदलत्या काळात ही केंद्रं ओस पडू लागली. पण, आजही बाटल्यांचा नाद कानात घुमत आहे.
मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या अनेक ‘ब्रँड’चं दूध सर्रास उपलब्ध आहे. हायफाय मॉलमध्ये गेलात तर अगदी ‘इम्पोर्टेड’ दुधाचे टेट्रापॅकही सहज मिळतात. दुधाविषयी किंवा ते विकत घेण्याविषयी आजच्या पिढीला काहीही अप्रूप नाही. मात्र, साधारण सन १९५०पासून मुंबईत संसार सुरू केलेल्या पिढीच्या आठ‌वणींच्या कप्प्यात एक स्निग्ध आठवण घर करून आहे. ती म्हणजे सरकारी दूध आणि ते पुरवणारी दूधकेंद्रं.

मुंबई म्हणजे न झोपणारं शहर. अगदी सुरुवातीपासूनच ते तसं होतं. पण, आताची ‘नाइट लाइफ’ तेव्हा नव्हती. डिस्को, पबमधील दणदणाटाऐवजी रात्री कारखाने आणि कापड गिरण्यातील यंत्रांची रात्रपाळीतील धडधड सुरू असायची. सकाळचा भोंगा वाजला की सगळ्याच मुंबईला जाग येऊ लागे. शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या जोडीला लगबग असे कामावर जाणाऱ्या मोठ्या मंडळींचीही. त्यासाठी पहिली धाव घेतली जाई नाक्यावरच्या दूधकेंद्राकडे. व्हीटी, चर्चगेटहून सुटणाऱ्या पहिल्या लोकल गाड्या, कुलाब्याहून निघणारी पहिली बेस्ट बस यांच्या जोडीला आणखी एक गाडी मुंबईकरांच्या सेवेसाठी भल्या पहाटे निघे. ती असे सरकारी दूध योजनेची गाडी. वरळी दुग्धशाळेतून अशा अनेक गाड्या मुंबईभर पसरलेल्या सरकारी दूधकेंद्रांवर दूध पोहोचवण्यासाठी बाहेर पडत. दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची.बऱ्याचदा घरातल्या ज्येष्ठांचं हे काम असे. आजोबा नसले तर बाबा, काका, दादा अशी मंडळी ते पार पाडत. दुधाची बाटली किंवा बाटल्या घरी आल्या की त्यांच्यावर पहिला हक्क बच्चेकंपनीचा. बाटलीचं बूच उघडून थंडगार मलईचा थर चाटण्यात मजा असायची. जणू आईस्क्रीमच. बाटली उघडण्याचे हे सोपस्कार पार पडले की दूधाची शुभ्र धार पातेल्यात पडे. चहाबरोबर चपाती , बिस्किटं किंवा खारी-बटर खाऊन मुलं शाळेसाठी आणि मोठी मंडळी कामासाठी रवाना होत’, .
‘पाऊस आणि थंडीच्या दिवसांत मात्र दूधकेंद्रावर जाण्याचा उत्साह कमालीचा मावळे. या दिवसांत आधार असे दुपारी येणाऱ्या दुधाच्या गाडीचा’, असायचा.
त्या काळी मुंबईत धान्य आणि दुधाची प्रचंड टंचाई जा‌णवत असे. त्यामुळे सरकारनं तेव्हा धान्य आणि दुधाचं रेशनिंग सुरू केलं होतं. १९५१मध्ये आरेमध्ये आशियातील पहिली दुग्धशाळा उभारण्यात आली. शासनाचा स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सन १९५८मध्ये स्थापन करण्यात आला. राज्यात ३८ दुग्धशाळा आणि ८१ शीतकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील दुधाचं संकलन करून ते शहरी भागात आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक साखळी निर्माण करण्यात आली. गावस्तरावर प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका व जिल्हा स्तरावर दूध संघ व त्यांच्यामार्फत शासनाकडे दूधपुरवठा अशी ही यंत्रणा होती. आता दूध प्लास्टिकच्या पिशव्यांतून मिळतं. तेव्हा सरकारी दूधही प्लास्टिक पिशव्यांतून मिळू लागलं होतं. पण, त्यापूर्वी हे दूध काचेच्या जाड बाटल्यांतून वितरित केलं जाई. ‘होल’ आणि ‘टोन्ड’ असे त्याचे दोन प्रकार होते. ‘होल’ दूध अधिक मलईदार आणि महाग. त्यामुळे ते सधन कुटुंबालाच घेणं परवडे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबं स्वस्त ‘टोन्ड’ दूध घेत. ‘होल’ दुधाच्या बाटलीचे बूच निळं असं आणि ‘टोन्ड’ दुधाच्या बाटलीचं पांढरं. नंतर ‘स्टँडर्ड’ हा आणखी प्रकार सुरू झाला. त्या दुधाच्या बाटलीचं बूच नारिंगी रंगाचं असे.

प्रत्येक कुटुंबाला ठरावीक प्रमाणातच दूध मिळावं, म्हणून सरकारी कार्ड असत. त्या कार्डावर कुटुंबप्रमुखाचं नाव आणि त्याचा दूध कोट्याची नोंद असे. अगदी सुरुवातीला पुठ्ठ्याचे कार्ड मिळायचे. नंतर प्लास्टिकचं कार्ड आलं आणि त्यानंतर अ‍ॅल्युमिनिअमचं. त्या काळी पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी पोषक आहार म्हणून चिक्की, एखादं फळ आणि सरकारी दूध रोज मिळेल याची व्यवस्था होती. पांढऱ्या बुचाच्या बाटलीतलं पाव लिटर दूध प्रत्येक विद्यार्थ्यांला मधल्या सुट्टीत प्यायला मिळे.
सन १९९१मध्ये सरकारी दूध योजना सहकारी दूध संघांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामती, कोल्हापूर, संगमनेर, पंढरपूर येथील सहकारी दूध संघांकडे ही योजना गेली. त्यानंतर १९९२मध्ये केंद्र सरकारनं दूध व्यवसाय खासगी उद्योग क्षेत्रासाठी खुला केला. त्यामुळे सरकार आणि सहकार क्षेत्राबरोबर खासगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले. १९८५ ते १९९५ हा काळ महाराष्ट्रात ‘धवल क्रांती’चा ठरला. सहकारी दूध संघाची शिखर संस्था कार्यान्वित होऊन महासंघाची दुग्धशाळा मुंबईत सुरू झाली आणि सरकारी दुधाची मुंबई-महाराष्ट्रातील बाजारपेठ आणखी आटली. मुंबईत आजही दूधक्रेंद्रे आहेत; पण, निळ्या, पांढऱ्या, नारिंगी बुचांच्या बाटल्या नाहीत. त्यांची जागा घेतलीय केशर-पिस्ता, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी अशा ‘फ्लेवर्ड’ दुधाच्या बाटल्या आणि टेट्रापॅकनी. हे दूध गोड आणि सुगंधी आहे, पण दूधकेंद्रांवरील बाटलीतल्या दाट मलईचा गोडवा त्यात नाही. ती चव चाखलेले कोणीही ते सांगेल!

आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल. पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती...


मिलिंद आरोलकर

Tuesday, 4 May 2021

पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!



पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!

अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला! ही नेमकी भानगड काय आहे? पण राव पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात.. म्हणून चला तर शोधूया या सर्व प्रश्नांची उत्तर.

पावसाची मोजणी होते तरी कशी ?
पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे :

पर्जन्यमापक यंत्राचे दोन प्रकार असतात.


१. रेकोर्डिंग पर्जन्यमापक
हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते.

२. नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक

नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं.

सर्वात आधी आपण नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापकं बघुयात :
या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडलं जातं. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी जेव्हा भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जातं. हे ठराविक प्रमाण भरत आल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. या सिस्टममुळे २४ तासात पडलेल्या पावसाचं अचूक प्रमाण मोजता येतं. 



१. दैनंदिन पर्जन्यमापक

हे यंत्र थेट पावसाचे थेंब मोजण्याचं काम करतं. खास सेन्सरद्वारे परिसरात किती पावसाचे थेंब पडत आहेत हे मोजलं जातं आणि प्रत्येकी थांबाचे मापन करून एकूण किती पाऊस पडला असावा याचा अंदाज लावला जातो.

रेकोर्डिंग पर्जन्यमापकं.

हे यंत्र दैनंदिन यंत्रापेक्षा थोडं वेगळं असतं. यात वजनाद्वारे पाऊस मोजला जातो. पावसाच्या वजनावरून पावसाचं प्रमाण ठरवलं जातं.
 
 
१. टिपिंग बकेट रेन-गेज
रेकोर्डिंग पर्जन्यमापकं

या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडलं जातं. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी जेव्हा भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जातं. हे ठराविक प्रमाण भरत आल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. या सिस्टममुळे २४ तासात पडलेल्या पावसाचं अचूक प्रमाण मोजता येतं. 
 
.

२. ध्वनिद्वारे पर्जन्यमापन !

हे यंत्र थेट पावसाचे थेंब मोजण्याचं काम करतं. खास सेन्सरद्वारे परिसरात किती पावसाचे थेंब पडत आहेत हे मोजलं जातं आणि प्रत्येकी थांबाचे मापन करून एकूण किती पाऊस पडला असावा याचा अंदाज लावला जातो.
 
 
३. ऑप्टीकल रेन गेज !

ऑप्टीकल रेन गेज हे एक अॅडव्हांस यंत्र असून याला लेझर डायोड आणि फोटो ट्रांजिस्टर डिटेक्टर जोडलेले असतात. एका ठराविक पातळीपर्यंत पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी भांड्यात उलटले जाते. उलटणाऱ्या पाण्यामुळे भांड्यात लावलेली लेझर बीम अॅक्टीवेट होते आणि या लेझर बीम मुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या सहाय्याने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सर मुळे अचूक नोंद घेण्यात हे यंत्र विश्वासार्ह मानलं जातं.

 
 
आता शेवटचा प्रश्न : पाऊस का मोजतात ?

या प्रश्नाचं उत्तर असं की वर्षभरात किती पाउस पडला यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल आणि यावर्षीच्या मानाने गेल्या वर्षी किती पाऊस पडला होता याचा अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो. पावसाचे कमी जास्त होणारे प्रमाण याविषयी यावरून अंदाज लावणे सोप्पे जाते. पावसाच्या प्रमाणामुळे भूगर्भात पाण्याची पातळी किती असेल आणि पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरेल की नाही याचाही अंदाज लावता येतो.



अर्थात या सर्व यंत्राद्वारे एक ठराविक अंदाज येत असला तरी पूर्णपणे अचूक माहिती देणारं यंत्र अजूनही बनलेलं नाही आणि म्हणूनच हवामान खात्याचे अंदाज काहीवेळा चुकतात.


मिलिंद आरोलकर

Monday, 3 May 2021

मुंबईतील दादरमधील मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या श्री शिवाजी मंदिराचा आज ३ मे वर्धापन दिन.


आज ३ मे
मुंबईतील दादरमधील मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या श्री शिवाजी मंदिराचा वर्धापन दिन.
 श्री शिवाजी मंदिर चा शुभारंभ झाला तो ३ मे १९६५ रोजी.
मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या *श्री शिवाजी मंदिर* वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण *श्री शिवाजी मंदिरच्या* मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी *श्री शिवाजी मंदिर* बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु  श्री शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा श्री शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत *श्री शिवाजी मंदिरचा* कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. श्री शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण *श्री शिवाजी मंदिर* पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि श्री शिवाजी मंदिर चे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज *श्री शिवाजी मंदिर* मध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. श्री शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण *श्री शिवाजी मंदिर* चा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. *श्री शिवाजी मंदिर* मध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच श्री शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. श्री शिवाजी मंदिराच्या  रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. श्री शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे. 
१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी श्री शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने श्री शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच श्री शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.


मिलिंद आरोलकर .

Saturday, 1 May 2021

संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता.


संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता .

"जुहू".

मुंबईमधली स्वप्ननगरी.

पर्यटकांनी भरलेला जुहू बीच आणि डोक्यावरून टोपी खाली पडेल अशा उंच उंच इमारती. इथल्या भेळपुरीपासून ते अमिताभ बच्चनच्या घरापर्यंतच्या अनेक कथा दंतकथा आपण ऐकलेल्या असतात. इथल्या शांत निवांत गल्ल्यांमध्ये मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणारे अतिउच्चभ्रू सेलिब्रिटी श्रीमंत लोक राहतात.

पण त्यांना काय ठाऊक या सेलिब्रिटीच्या जुहूचा मालक एक माणूस होता. नाव *रघुनाथराव राणे.*

जुहूचा इतिहास पहायचा झाला तर कमीत कमी हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. 

बिम्बाख्यान नावाच्या बखरी नुसार ११३८ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजाने महिकावती (आजचे *केळवे माहीम*) हा भाग जिंकून घेतला. त्याने आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशीला *वाळकेश्वर* येथे पाठवल आणि या नव्या भागाचा सर्व्हे करायला सांगितला.

या बाळकृष्ण सोमवंशीने *केळवे माहीम, ठाणे, मढ, जुहू, वेसावे(व्ह्र्सोवा),* *वहिनाळे* आणि अखेर *वाळकेश्वर* या भागात तो फिरला. 
हाच जुहूचा पहिला उल्लेख. 

*अगदी शंभर वर्षापूर्वी पर्यंत जुहू हे एक बेट होतं.* अल्लाउद्दिन खिलजीकडून पराभूत झालेला सोरठचा मुरारराज या भागात आला. त्याच्या मुलाने बलदेवराजने बिंबराजाचे राज्य मुंबई भागात प्रस्थापित केले.

*१३०० च्या शतकात बलदेवराजचा मुलगा म्हणजे हैबतराव राणे.* 

*वांद्र्याच्या रन्वार खेड्यात तो राहू लागला. येथेच त्याने माहेश्वरी देवीच मंदिर बांधलं. याच हैबतरावाचे वंशज लक्ष्मणराव जुहूला वसले.*

पुढे दिल्लीच्या सुलतानीच्या काळात लक्ष्मणराव राणेंना जुहू गावाची पाटीलकी मिळाली. त्यांचा वार्षिक पगार होता ५० रुपये.

पुढे मुंबई प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य आले. त्यांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली मात्र उत्तरेतील भाग मात्र स्वतःच्या हाती ठेवला. त्यांनी जुहूला जुवेम नाव दिले होते. तेथे भंडारी, मीठ व्यापारी शेती करणाऱ्यांच्या छोट्या वसाहती होत्या. जुहूचे रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. पोर्तुगीजांनी येथे १८५३ साली चर्च ऑफ सेंट जोसेफ हे चर्च बांधले.

अस म्हणतात की या राणेंच्या पैकी कोणी तरी पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा आरमाराला मदत केली होती. पुन्हा तसे होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आणि हे सुनिश्चित केले की राणे कुटुंब जुहूमध्ये राहील.

पण तरीही जेव्हा १७३७ साली पोर्तुगीज आणि मराठा युद्ध सुरु झाले तेव्हा राणेनी मराठ्यांची बाजू घेतली.
पुढच्या दोनच वर्षात चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांचा पराभव केला आणि साळशेत, ठाणेचा परिसर पेशव्यांच्या अधिपत्या खाली आला.
*त्यांनी राणेंना जुहूची सनद आणि तिथे नारळाची लागवड करण्याची परवानगी दिली.*

पुढे हा भाग मराठ्यांच्या कडून इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र त्यांनी देखील राणेंच जुहूंवरचे हक्क मान्य केले.

याच राणेंचे वंशज रघुनाथराव पुतळाजी राणे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे हेड सर्व्हेअर म्हणून काम पहात होते. 

१८६८ साली जुहूमधील जुन्या मुक्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना त्यांना मध्ययुगीन पुरावे सापडले.

काही वर्षांनी जेव्हा त्यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस ब्रम्हकुंड नावाच्या बंधिस्त कुंडाची निर्मिती करण्यासाठी खड्डा काढला तेव्हा त्यात त्यांना *गजलक्ष्मीची मूर्ती* सापडली.
हिलाच आज *शितलादेवी* म्हणून पूजले जाते व जुहू बीच जवळ मिळालेल्या मूर्तीला जुहूची ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. जुहूमध्ये उत्खनन करत असताना एक हाडांचा सांगाडा सापडला ज्याच्या तोंडात एक सोन्याच नाणं होतं ज्यावर देवनागरी मध्ये *‘रा’* असे कोरलेले आढळले. अशा अनेक गोष्टी राणे कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.

रघुनाथ राव राणेंचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार कृष्णराव राणेंनी या ऐतिहासिक पुराव्यांचे म्युजियम मध्ये रुपांतर केलं. पण १९५५ साली आलेल्या चक्रीवादळात या म्युजियमच प्रचंड नुकसान झाल व ते आता बंद आहे. 

*मात्र आजही इस्कॉन टेम्पल समोरच्या राणे बंगल्यात यातील अनेक वस्तू आपल्याला पाहता येऊ शकतात.*

आज गगनचुंबी इमारतींचे जंगल बनलेल जुहू १०० वर्षापूर्वी पर्यंत एका छोट्याशा बेटावरील खेड होतं.

जमशेदजी टाटानी १८९० च्या दशकात येथे जमीन खरेदी केली आणि तिथे एक बंगला बांधला. पुढे इथे १२०० एकर जमीन घेऊन तिथे रिसोर्ट बांधायचा त्यांचा प्लॅन होता. कालव्यांनी जोडून जुहू बेटाचं व्हेनिसमध्ये रुपांतर करायचं टाटांच स्वप्न होतं. पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्युनंतर ही योजना मागे पडली.

१९१९ साली जुहूमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी सांताक्रूझ जुहू रस्ता बनवला आणि या भागाला मुंबईशी जोडून टाकले. याच जुहूमध्ये भारतातील पहिले विमानतळ सुरु झाले. मिठाचा सत्याग्रह व इतर आंदोलनातून जुहूनेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. गांधीजींचे इथे बरेच काळ वांस्तव्य देखील होते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे अनेक धनिकांनी, फिल्मस्टारनी जागा घेतली. भारतातील सर्वात महागडे दराच्या जमिनीमध्ये वरच स्थान जुहूने पटकावल. मात्र याच बरोबर इथला स्थानिक कोळी हळूहळू आपल्याच हक्काच्या घरातून हद्दपार होत गेला.


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 28 April 2021

गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर




गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर

महाराष्ट्रातील शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेले कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदि‍र आणि आश्रम परिसर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदि‍र आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही. 

बेट कोपरगांव ) हे ब्रम्हदेव पुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र  
व दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्‍थान असून त्‍यांनी तप व वास्‍तव्‍य केलेला हा परिसर आहे. त्‍यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्‍त्‍व प्राप्‍त झाले असून त्‍याची आख्यायिका अशी आहे. 
समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्‍यामुळे देवांना अमरत्‍व प्राप्‍त झाले. त्‍यामुळे दैत्‍य कुळांचा नाश हा निश्‍चित झाला. तो होऊ नये व दैत्‍य कुळ पुढेही चालू रहावे त्‍यासाठी दैत्‍यांनाही अमरत्‍व प्राप्‍तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्‍याने दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्‍चर्या करुन गायत्री व महामृत्‍यूंजया पासून तयार झालेला " संजीवनी " मंत्र की , ज्‍या योगे मृत झालेली व्‍यक्‍ती पुन्‍हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्‍त करुन घेतला व त्‍या मंत्राच्‍या आधारे ते मृत झालेल्‍या दैत्‍यांना पुन्‍हा जिवंत करुन देवांविरुध्‍द युध्‍दासाठी संजीवन करत असत. त्‍यामुळे दैत्‍यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्‍तच झाले. त्‍यासाठी देवांनी बृहस्‍पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्‍पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्‍य पुन्‍हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्‍हणून सर्व देव व बृहस्‍पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्‍तगत करण्‍यासाठी बृहस्‍पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्‍यास गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्‍तीसाठी आला ते हे स्‍थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्‍थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्‍या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्‍थान गोदावरीच्‍या पैलतीरावर होते. ते स्‍थान कचेश्‍वर मंदीर म्‍हणून प्रसिध्‍द असून ते शुक्‍लेश्‍वर मंदीराच्‍या उत्‍तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्‍वर यांचे एकत्रित पिंडीच्‍या स्‍वरुपात स्‍थापित आहे. गोदावरीच्‍या ऐलतीरावर गुरुचे स्‍थान व पैलतीरावर शिष्‍याचे स्‍थान आहे. पूर्वीच्‍या नदीवरील घाट व त्‍याच्‍या खुणा अजूनही मंदीराच्‍या समोरील श्री विष्‍णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्‍याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडून कच व देवयानी यांना हा " संजीवनी " मंत्र मिळविल्‍याचे संजीवनी पाराचे स्‍थान असून त्‍यात मंत्र मिळाल्‍यानंतर स्‍वर्गातील देवगण कचेश्‍वरावर पुष्‍पवृष्‍टी करण्‍यासाठी आले. त्‍यामुळे इतर देवांच्‍याही पिंडीच्‍या स्‍वरुपात प्रतिकात्‍मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्‍थान अत्‍यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्‍तांची धारणा आहे. 

गुरुची सेवा करण्‍यासाठी सर्व शिष्‍य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्‍हणजे हल्‍लीच्‍या शुक्‍लेश्‍वर मंदीराचे स्‍थानावर नित्‍यनियमाने येत असत. या शिष्‍यांना नदीच्‍या विशाल पात्रातून येण्‍या -जाण्‍याचा त्रास होऊ नये म्‍हणून शुक्राचार्यांनी आपल्‍या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्‍या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्‍यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्‍याची आख्‍यायिका आहे. 

सर्व शिष्‍यांमध्‍ये कच हा अत्‍यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्‍यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्‍यांमध्‍ये गुरुचा लाडका शिष्‍य होता. ही गोष्‍ट इतर दानवांना सहन होत नसे. त्‍यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्‍टी होती. द्वेषापोटी त्‍यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्‍या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्‍यामुळे तिने कचास दोन्‍ही वेळा वडि‍लांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परि‍णामी सर्व दैत्‍य संतापले व त्‍यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्‍याचे ठरविले. पुन्‍हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्‍यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्‍यांचे गुरु असल्‍यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्‍याचा गैरफायदा घेवून दैत्‍यांनी डाव साधला. कच दिसेना म्‍हणून देवयानीने आपल्‍या वडिलांकडे कचासाठी पुन्‍हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्‍यानंतर त्‍यांच्‍या असे लक्षात आले की कच हा आपल्‍याच पोटात आहे. ही गोष्‍ट त्‍यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्‍या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्‍याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्‍यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्‍यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्‍यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्‍या योगे मी तो मंत्र म्‍हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्‍या हट्टाने व मद्य व्‍यसनामुळे जी गोष्‍ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्‍या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्‍या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्‍हा त्‍यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदि‍रासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्‍यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्‍लक न राहि‍ल्‍यामुळे दैत्‍यांना पुन्‍हा-पुन्‍हा जिवंत करण्‍याची शक्‍ती शुक्राचार्यांमध्‍ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्‍य झाल्‍यामुळे मूळ देवलोकी जाण्‍यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्‍यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्‍यामुळे तिने त्‍यास लग्‍नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडि‍लाच्‍या उदरातून बाहेर आल्‍यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्‍यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्‍टीचा राग येवून वअपेक्षाभंगाच्‍या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्‍त करुन चाललास त्‍या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकूल आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे यावर क्रोधीत होऊन कचदेव हि देवयानीस शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल. अशारितीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावतो व कचदेव हे देवलोकी निघून जातात. 

पुढे ही शापवाणी खरी ठरुन शुक्राचार्य ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील " ययाती " राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे. 
कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते. एकदा वनविहारास गेली असताना असूर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानी एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते. आपला जीव वाचविण्यासाठी धावा करित असताना तेथे शिकारीसाठी आलेले महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती' आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवितात. हात हातात घेतल्याने त्यांच्यावर 'पाणीग्रहण संस्कार' होतात. (पाणिग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीया कुठल्याही परपुरुषांच्या हातात आपला हात देत नसत. जर चुकूनहि हात हातात घेतला गेला तरि त्यांचे 'पाणिग्रहण संस्कार' झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे.) पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हिस क्षत्रिय राजा ययाती यांच्या बरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते. पाणीग्रहण झाले त्यावेळी ग्रह, नक्षत्र अनुकूल नव्हते व सिंहस्थ काळ असल्यामुळे कुठलाहि शुभमुहूर्त निघत नव्हता. म्हणून गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातीरी 'विवाह सिद्ध होम' करुन आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करुन ग्रह नक्षत्र अनुकूल करुन घेतले व या पावन भूमीस असे वरदान दिले की, यापुढे केव्हाही या भूमीत कोणतेही पवित्र कार्य (विवाह, इत्यादी शुभकार्य) करण्यास कुठलाही मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वेळ व सिंहस्थकाळ पहावा लागणार नाही व येथे केलेले शुभकार्य हे विशेष यशस्वी होतील.

हि कथा हजारो-हजारो वर्षापूर्वी घडलेली असून गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या तपाने पावन झालेली हल्लीची बेट कोपरगांव पावन भूमी आहे. अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज व परम शिष्य कचदेव यांच्या कोटीकोटी आशिर्वादास प्राप्त व्हावे. 

महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती यांचेशी विवाहबद्ध झाली त्यांच्या पुढील झालेल्या यदु वंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती आणि त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य, पांडव, कौरव यांचा जन्म झालेला आहे. 

आजही शुक्राचार्यांचे हे स्‍थान त्‍यांच्‍या तपोबलाने पुनीत झाल्‍यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्‍यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्‍हाही विवाह होतात.  

या सर्व गोष्‍टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्‍या ओव-या पूर्वी येथे असलेल्‍या पेशव्‍यांच्‍या वाडयाच्‍या अवशेषातून बांधलेल्‍या आहेत. तसेच समोर श्री विष्‍णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्‍णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्‍या पायथ्‍याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्‍याच्‍या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्‍ही मंदि‍राच्‍या मध्‍यात " संजीवनी पार " म्‍हणजे येथे कचास " संजीवनी " विद्या प्राप्‍त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्‍याचे हे स्‍थान असून याचे उत्‍तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्‍य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्‍वर मंदिर) असून त्‍या स्‍थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्‍वर) गुप्‍त रुपाने तेथे आल्‍यामुळे त्‍यांचेही श्री त्रिंबकेश्‍वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्‍त रुपाने आल्‍यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्‍थापना झालेली नाही. कचेश्‍वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्‍याचा रिवाज आहे. 

( लेखक वि.स .खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मुळ शुक्राचार्य ,कच आणि देवयानी यांच्या जीवनावर आधारित असून कोपरगाव येथे गुरु शुक्राचार्य मंदिर परीसरात या सर्व घडलेल्या प्राचीन घटनास्थळ आजही अस्तित्व दाखवत आहे. )


मिलिंद आरोलकर -

Saturday, 10 April 2021

10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन





भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे. ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वताचे पासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण 37 वर्षात पूर्ण झाले.सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी मराठयांकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एलन्फिस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला.
40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त
ई-मोजणी, ई-फेरफार,
ई-चावडी,ई-अभिलेख,
ई-अभिलेख, ई-नकाशा,
ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई-भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.


मिलिंद आरोलकर -

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...